बजेटमध्ये जाहीर केलेला ई- पासपोर्ट म्हणजे नक्की काय ?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल १ फेब्रुवारीला २०२२ -२३ या आर्थिक वर्षाचं बजेट जाहीर केलं. सभागृहात आपल्या भाषणा दरम्यान त्यांनी क्रिप्टो, एमएसपी, स्पोर्ट्ससाठीच्या अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली. यासोबतच त्यांनी ई- पासपोर्ट या नवीन सिस्टीमची घोषणा सुद्धा केली.
आता तसं पाहिलं तर बजेट जाहीर होण्याच्या कित्येक दिवस आधीच सरकार ई-पासपोर्टची घोषणा करेल, असे अंदाज बांधले जात होते. जगभरातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये ही ई-पासपोर्टची सिस्टीम आहे. त्यात आशियात सुद्धा जवळपास ५ देशांमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे. त्यात आता भारताचा सुद्धा समावेश होईल.
आता ही ई-पासपोर्ट टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर, इथून पुढे परदेश प्रवास करताना ई-पासपोर्टचा वापर करण्यात येणार आहे. हा पासपोर्ट दिसायला तर आधीसारख्या पासपोर्ट सारखाच असेल, पण त्यात एक छोटी इलेक्ट्रॉनिक चिप असेल. या पासपोर्टमध्ये ६४ केबी स्टोरेज असेल. या चिपमध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि बाकीची सगळी बायोमॅट्रिक माहिती असेल.
चिपच्या मदतीने, इमिग्रेशन काउंटरवर पासपोर्ट सहज स्कॅन होईल आणि प्रवाशांच्या डिटेल्स फार कमी वेळात व्हिरिफाइड केल्या जातील. तसेच या सिस्टीममुळे डेटा सिक्युरिटीत मदत होईल. त्यामुळे बनावट पासपोर्टला सुद्धा आळा बसणार आहे. या ई-पासपोर्टच्या माध्यमातून परदेशात जाणाऱ्या लोकांचा प्रवास सोपा होणार आहे.
या ई-पासपोर्टची कन्सेप्ट सगळ्यात आधी लागू करण्यात आली मलेशियामध्ये. जे १९९८ मध्ये लाँच केले गेले. भारतात, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून २००८ मध्ये २०,००० ई-पासपोर्ट राजनयिकांसाठी जारी करण्यात आले होते.आणि भारतात सध्या म्हणाल तर ५ प्रकारचे पासपोर्ट आहेत.
त्यातला पहिला असतो सामान्य पासपोर्ट जो निळ्या रंगाचा असतो. त्याला टुरिस्ट पासपोर्ट असंही म्हणतात. दुसरा असतो अधिकृत पासपोर्ट, याला सर्व्हिस पासपोर्ट असेही म्हणतात. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला काही सरकारी कामासाठी परदेशात पाठवल्यावर त्याचा वापर केला जातो.
डिप्लोमॅटिक पासपोर्ट, वाणिज्य दूतावास किंवा राजनयिकांना हे पासपोर्ट दिले जाते. जो मरून रंगाचा असतो. त्यांना इमिग्रेशनमध्ये स्पेशल ट्रीटमेंट मिळते. हा पासपोर्ट वापरणाऱ्यांना परदेश प्रवासादरम्यान स्पेशल दर्जाही मिळतो. त्यांनतर असतो तात्पुरता पासपोर्ट जो आपला मेन पासपोर्ट हरवल्यावर तयार केला जातो. हा पासपोर्ट पर्यटक त्यांच्या देशात परत येईपर्यंतच काम करतो.
यासोबतच असतो फॅमिली पासपोर्ट, जो अर्थातच फॅमिलीसाठी बनविला जातो. ज्यात फॅमिलीतल्या प्रत्येक सदस्याला पासपोर्ट न देता सगळ्या फॅमिलीचा मिळून एकचं पासपोर्ट बनवला जातो.
या सगळ्यात भारतात सामान्य पासपोर्टचा जास्त वापर होतो. हा पासपोर्ट एक बुकमध्ये प्रिंट केला असतो. ज्यात प्रवाश्याचं नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, विवाहित लोकांसाठी पती-पत्नीचे नाव, जन्म ठिकाण अशी सगळी माहिती असते. यासोबतच तुमचा फोटो आणि साइन सुद्धा असते. आपल्या महत्वाच्या कागद पत्रांमध्ये पासपोर्टचा समावेश असतो.
आता हे ई- पासपोर्ट सिस्टीम येणार म्हंटल्यावर त्या पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत सुद्धा बदल होईल, असं म्हंटल जातंय. पण सध्या तरी सरकारकडून अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हे ई-पासपोर्ट या वर्षात किंवा पुढच्या वर्षापर्यंत येतील. पण तोपर्यंत पासपोर्टसाठी अप्लाय करण्याची प्रोसेस आधीसारखीचं असेल.
हे ही वाच भिडू :
- रवांडा आणि युगांडा या देशांपेक्षाही भारताचा पासपोर्ट एवढा कमजोर आहे असं का म्हणतात?
- कुस्तीच्या प्रेमापायी कोल्हापूरचा वाघ बिना पासपोर्ट पाकिस्तानात घुसला होता
- अंधेरा हटेगा और पासपोर्ट पर ‘कमल’ खिलेगा !!