उडत्या बस, पेट्रोल बंद नंतर आता ‘इ-हायवे’ ; गडकरींचा ‘इलेक्ट्रिक हायवे’ नक्की कसा असणार आहे ?

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी सतत नवीन नवीन योजनांच्या घोषणा करण्यात आणि ते राबवण्यात अग्रेसर असतात. मागे एकदा हवेत उडणारी बस भारतात आणणार अशी घोषणा त्यांनी केली होती. तसेच आता काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलला कायमचं हद्दपार करणार असा विडा देखील त्यांनी उचललाय.

त्याचाच एक भाग म्हणून ते ग्रीन इंधनाला कायम प्रमोट करताना दिसतात. आता सुद्धा त्यांनी ‘हायड्रोलिक ट्रेलर ओनर्स असोसिएशनच्या’ एका कार्यक्रमात बोलताना भारतात लवकरच ‘इलेक्ट्रिक हायवेची’ निर्मिती करणार असल्याची घोषणा केलीये.

आत्ताच नाही तर याआधी २०१६ आणि २०२१ ला सुद्धा गडकरींनी असा ई हायवे भारतात बनवणार असल्याची घोषणा केली होती. असं बोललं जातं की हा प्रकल्प नितिन गडकरींचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. त्यामुळे आपण प्रकल्पा बद्दल सविस्तर माहिती घेऊया..

सगळ्यात आधी हा इलेक्ट्रिक हायवे म्हणजे नक्की काय भानगड आहे ते बघू..

तुम्ही लोकल ट्रेन बघितली असेल तर त्याच्या वरच्या बाजूला काही तारा असतात आणि त्या लोकलच्या इंजिनला आणि काही डब्यांशी त्यांचा संपर्क येत असतो. या लोकलला वीज पुरवण्याचं काम ह्या तारा करत असतात आणि त्यावर ही ट्रेन धावत असते.

आता हा इलेक्ट्रिक हायवे सुद्धा काहीसा असाच असणार आहे. हायवेवर तशाच इलेक्ट्रिक तारा लावण्यात येतील जेणेकरून हायवे वरुन जाणाऱ्या वाहनांना याच तारांमधून वीज मिळेल. मग ही वाहनं आपोआप चार्ज होतील आणि धावतील, या संकल्पनेलाच ई-हायवे म्हणतात.

पूर्ण जगात ३ पद्धतींनी असे एलेक्ट्रिक हायवे बनवले जातात.

१. पॅन्टोग्राफ मॉडेल  २. कंडक्शन  मॉडेल ३. इंडक्शन मॉडेल

रस्त्याच्या वरच्या बाजूला असणार्‍या वायर मधून वाहनाला पेंटोग्राफद्वारे वीज पुरवली जाते. ही वीज वाहनाच्या इंजिनला उर्जा पुरवते. त्याने वाहनातली बॅटरी चार्ज होते. पॅन्टोग्राफ मॉडेल हे भारतातल्या लोकल ट्रेन्समध्ये देखील वापरले जाते.

इलेक्ट्रिक हायवेवर बर्‍याचदा कंडक्शन आणि इंडक्शन तंत्रज्ञान वापरले जाते. कंडक्शन मॉडेलमध्ये, वायर रस्त्याच्या खाली टाकली जाते, तर इंडक्शन मॉडेलमध्ये वायरचा वापर केला जात नाही, तर यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंटद्वारे वाहनाला ऊर्जेचा पुरवठा केला जातो.

 

अशा महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्यासाठी कमी अंतरावर चार्जिंग स्टेशन्स देखील उपलब्ध असतील. हे इलेक्ट्रिक हायवे इलेक्ट्रिक वाहनांनुसार डिझाइन केलेले असतील. या मार्गावर ट्रॉलीबस आणि ट्रॉली ट्रकही धावतील.

देशातला अशाप्रकारचा हा पहिलाच हायवे असणार आहे. हा रस्ता दिल्ली ते मुंबई असा असेल. दिल्ली- मुंबई एक्स्प्रेसवेच्या नवीन लेनवर हा मार्ग बांधला जाईल. ही लेन पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल आणि त्यावर फक्त इलेक्ट्रिक वाहने धावतील. असं  सांगण्यात येतंय की या प्रकल्पाच्या कामासाठी सध्या सरकार स्वीडिश कंपन्यांशी चर्चा करतंय.

काय असतील या हायवेचे फायदे ?

मालवाहतुक ट्रक्सच्या वाहतुकीचा वेग ताशी १२० किमी इतका असेल त्यामुळे लॉजिस्टिकचा येणारा खर्च ७० टक्क्यांनी कमी होणार आहे.

मालवाहतुकीसाठी असणार्‍या वेगवेगळ्या करांमुळे राज्यांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाढलेला  भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्व सेवा डिजिटल केल्या जातील, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल असं गडकरी म्हणाले.

हा पर्यावरणपूरक महामार्ग असेल, वाहने चालवण्यासाठी विजेचा वापर केला जाईल, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान होणार नाही.

या ई हायवेमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना इलेक्ट्रॉनिक वाहनं एक नवा पर्याय ठरतील असं बोललं जातय.

हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी काय अडचणी येऊ शकतील ते बघूया..

ईलेक्ट्रिक हायवे बांधण्यासाठीचा खर्च सामान्य हायवेपेक्षा खूप जास्त असणार आहे. देशभरात महामार्गांचं असं जाळं निर्माण करणं हे देखील एक मोठं आव्हान असणार आहे आणि त्यासोबतच हे काम खूप खर्चिक असणार आहे आणि हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होईपर्यंत बराच कालावधी जाऊ शकतो.

फक्त इलेक्ट्रिक हायवे बांधणं पुरेसं असणार नाही तर त्या हायवेवर चालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनंही तेवढ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसतायेत पण याचं प्रमाण वाढणं देखील गरजेचं आहे.

जगात आणखी कुठे कुठे आहेत असे ई हायवे..

सध्याच्या घडीला स्वीडन आणि जर्मनीमध्ये अशा प्रकारचे इलेक्ट्रिक हायवे आहेत. असा इलेक्ट्रिक हायवे सुरू करणारा स्वीडन हा जगातला पहिला देश आहे. स्वीडनने 2016 मध्ये पहिला ई-हायवे तयार केला होता.

स्वीडननंतर, जर्मनीने 2019 मध्ये असा महामार्ग तयार केला. हा महामार्ग ६ मैल इतक्या लांबीचा आहे. स्वीडन आणि जर्मनीमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प सुरू आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेतही अशा प्रकारच्या ई-हायवेची कामं सुरू आहेत.

तर असा हा ईलेक्ट्रिक महामार्गाचा प्रकल्प देशाच्या विकासात महत्वाचं योगदान देईल. याचं काम लवकरात लवकर मार्गी लागून वेळेत पूर्ण झालं तर हा प्रकल्प देशाला प्रगतिपथावर नेण्यात नक्कीच मोठा हातभार लावेल यात शंका नाही..

हे ही वाच भिडू..

Leave A Reply

Your email address will not be published.