प्राण्यांसोबत सेक्स करण्याची इच्छा होणं म्हणजे नक्की प्रकार काय ? सेक्सॉलॉजीस्ट सांगतात…

‘माणूस’ नावाची जी जात आहे ना ती काळाच्या कितीही पुढं जावो पण एका गोष्टींच्या बाबतीत कायमच मागे राहील आणि ते म्हणजे….

“महिलांवरील होत असलेला बलात्कार”

बलात्काराच्या घटना घडतात. त्याबद्दल अनेक मोर्चे, कँडल मार्च निघतात. पीडितेच्या बाजूने आवाज उठवले जातात. हे व्हायलाच हवे.. पण हेच अत्याचार जर मुक्या प्राण्यांवर होत असतील त्यांनी कुठं जावं ? माणूसच जर या मुक्या प्राण्यांवर अत्याचार करत असेल तर त्या मुक्या प्राण्यांनी कोणाकडून न्यायाची अपेक्षा ठेवावी?

थेट मुद्द्याला हात घालते, आजची बातमी. कोल्हापूरच्या जंगलात एका घोरपडीवर सामूहिक बलात्कार झाल्याची..

ऐकायला जरा किळसवाणं वाटेल. पण जरा खोलात जाऊन विचार कराल तर या गुन्हाचं गांभीर्य तितकंच आहे जेवढं एखाद्या बाईवर सामूहिक बलात्कार झाल्यावर असतं. कारण मुक्या प्राण्यांनाही मन आहे त्यांनाही वेदना होत असतात.

अशा मुक्या प्राण्यांना आपल्या वासनेची शिकार बनविणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा ट्रेंड देखील सोशल मीडियावर चालवला जातोय.

नेमकी घटना काय होती ?

कोल्हापूर जिल्ह्यात गोठणे बीटा भागात सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये ही घटना घडली. ही पीडित घोरपड एक बंगाल मॉनिटर जातीची घोरपड आहे. फॉरेस्ट ऑफिसरने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, चार जणांचा समूह कोकणातून सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये शिकार करण्याच्या उद्देशाने आला होता. तसं शिकारीचं सामान देखील त्यांच्यासोबत होतं. 

हा प्रकार ७ एप्रिल रोजीच समोर आला होता. पण तेव्हा या ४ पैकी एकाच व्यक्तीला लैंगिक अत्याचारासाठी दोषी ठरवलं होतं. मात्र चौकशीच्या दरम्यान त्या दोषींच्या मोबाईलमध्ये काही पुरावे सापडले. घोरपडीसोबत अश्लील कृती करतानाचं रेकॉर्डिग त्यांनी केलं होतं. तसेच तेथील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी केल्यास काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या होत्या. त्या आधारे या प्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे.

बंगाल मॉनिटर जातीची घोरपड फार दुर्मिळ जात समजली जाते

Bengal monitor lizard नावाची हि घोरपडीचे प्रजात असून ती जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा नामशेष होत असलेल्या प्राण्यांना कुठलीही इजा पोहोचवणं कायद्याने गुन्हा आहे. 

मागे देखील भटक्या कुत्रीवर बलात्कार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या…

२०२१ च्या ऑक्टोबर महिन्यात चंद्रपूर मध्ये एका तरुणाने भटक्या कुत्रीवर बलात्कार केलेला. त्याच्या आधी २०२० च्या डिसेंबर मध्ये मुंबईच्या ६८ वर्षाच्या एका विकृताने अनेक पाळीव तसंच भटक्या कुत्र्यांवर बलात्कार केला होता. मागे गाझियाबाद मध्ये एका ६० वर्षीय व्यक्तीने कुत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

पण प्राण्यांवर बलात्कार करण्याची असली कसली मानसिकता ?  

प्राण्यांसोबत सेक्स करण्याची इच्छा होणं म्हणजे नक्की प्रकार काय आहे ?

ते सेक्शुअली डिसॉर्डर आहेत का ?

याबाबतीत बोल भिडूने नामवंत सेक्सॉलॉजीस्ट डॉ. लीना मोहाडीकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी घोरपडीचे प्रकरण हे लैंगिक विकृतीचा प्रकार असल्याचं सांगितलं.

तसेच असं कृत्य करणारे लोकं ‘पशुसंभोगवादी’ असतात. पशुसंभोगवादी लोकांनाच पशूंसोबत सेक्स करायला आवडतं. त्याला ‘Bestality’ असं संबोधतात, म्हणजे मनुष्य आणि प्राणी यांच्यातील लैंगिक संबंध. जे अनैसर्गिक आहे. पण अशा विकृत लोकांना त्यात आनंद मिळतो. 

या लोकांचा प्रॉब्लेम असा होतो की, ते नॉर्मल सेक्स एन्जॉय करू शकत नाहीत.

दुसरं असं की, काही लोकांमध्ये हि विकृती मुळातच असते. ग्रामीण भागातील अनेक लोकं जी आपल्या शेळीसोबत, गाई-म्हशींसोबत देखील सेक्स करतात पण ती विकृती म्हणून पुढे यतेच नाही कारण पाळीव प्राणी मालकीचे असतात त्यामुळे ते फारसं उघडकीस येत नाही. 

पण खोलात जाऊन पाहिलं तर, काही तरुणांची अशी हिस्ट्री समोर येऊ शकते जे आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी नसतात किंव्हा त्यांना इंटरकोर्स करताच येत नाही. तीच लोकं अशी कृती करतात. 

आता घोरपडीच्या प्रकरणातील दोषी जे आहेत ते देखील अशाच काही प्रकारामध्ये गणले जातील.

त्या ४ व्यक्तींचं समुपदेशन करण्याच्या आधी आणि त्यांना आरोपी ठरविण्याच्या आधी, त्यांचं ‘हेल्थ सेक्शुअल ओरिएंटेशन’ समजून घेतलं पाहिजे. त्यांना असं का करावंसं वाटलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आता या दोषींचा विचार केला तर तेव्हा त्यांची भावना असू शकते आणि म्हणूनच त्यांच्याकडून हे कृत्य झालं. असं देखील डॉ. मोहाडीकर सांगतात.

शिवाय प्राण्यांवर देखील हा अत्याचारच आहे. खरं तर प्राणी असा अत्याचार सहन करत नाहीत. ते प्रतिकार करतात. पण दीनदुबळा प्राणी असेल तर तो कसा प्रतिकार करणार. पण हा प्रकार नक्कीच विचार करायला भाग पडतो.

 हे कायद्याने गुन्हा आहे का ? 

मानव आणि प्राणी यांच्यातील लैंगिक संबंध अनेक देशांमध्ये बेकायदेशीर आहे. तसेच भारतात देखील हा गुन्हाच ठरतो. 

भारतीय दंड विधानातील कलम ३७७ नुसार जर प्राण्याशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले तर तो गुन्हा ठरतो. १० वर्षांचा तुरुंगवास, आणि दंड अशी तरतूद देखील केली आहे. 

कोणत्याही प्राण्यांसोबत अनैसर्गिक संभोग करणे, त्यांना इजा पोहचवणे इत्यादी कृत्य हे याशिवाय प्राण्यांवरील क्रुरता प्रतिबंधक १९६० आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा ठरतो. या कायद्यांतर्गत वरील प्रकरणातील ४ ही दोषींना ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

 आकडेवारी सांगते की,

फेब्रुवारी २०२१ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन ॲनिमल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन आणि ऑल क्रिएचर्स ग्रेट अँड स्मॉल यांनी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, २०१७ ते २०२१ या कालावधीत एकूण ४,९३,९१० प्राणी मनुष्यांकडून केलेल्या गुन्ह्यांचे बळी ठरलेत.

या अहवालानुसार या सर्व प्रकरणामध्ये लैंगिक शोषणाची देखील प्रकरणं आहेत. 

त्यामुळे प्राणी प्रेमींकडून तसेच काही संस्थांकडून अशी शिफारस केली जातेय कि, 

“प्राणी कल्याण, संरक्षण आणि अधिकारांसाठी विशेष मंत्रालय स्थापन केलं जावं. तसेच प्राण्यांशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या आदेशात सुधारणा केली जावी, तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक १९६० (PCA ) या कायद्याच्या जागी नवीन नवीन कायदा तयार करण्याची शिफारस केली आहे.

आता घोरपडीवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण आणि त्यावर सेक्सॉलॉजीस्टने सांगितलेली माहिती याबाबत नक्कीच हा प्रकार साधा सरळ नाहीये हे तर खरंय…

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.