लतादीदींना रुग्णालयात ज्या लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवलं होतं ती नेमकी काय असते
प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ‘लताजींना जानेवारीमध्ये कोविड-१९ आणि न्यूमोनियाच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ८ जानेवारी रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते.
कोविडमधून बरे झाल्यानंतर शनिवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
त्याआधी त्यांना रुग्णालयात लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. जेव्हा पेशंटची तब्येत क्रिटिकल होते तेव्हा त्यांना लाइफ सपोर्ट वर ठेवतात. त्यामुळं एकदा पाहूच हे लाईफ सपोर्ट आणि व्हेंटिलेटर नक्की काय असतं आणि कसं काम करतं .
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी शरीरातील अनेक अवयव सतत काम करत असतात. यातील काही अवयवांची कार्ये इतकी महत्त्वाची असतात की त्यांनी काम करणे बंद केलं तर माणूस जगूच शकत नाही.
जेव्हा शरीराच्या हे महत्वाचे अवयव काम करणं बंद करतात तेव्हा त्या अवयवांना जिवंत ठेवण्यासाठी एक विशेष वैद्यकीय प्रक्रिया केली जाते, ज्याला लाईफ सपोर्ट म्हणतात.
लाईफ सपोर्ट ची गरज केव्हा लागते?
आपल्या शरीरातील हृदय, मेंदू, फुफ्फुसे आणि किडनी ही चार अत्यंत महत्वाची अवयव आहेत यापैकी कोणत्याही अवयवाने काम करणे थांबवल्यास लाईफ सपोर्टची गरज असते
आता जाणून घेऊ या लाइफ सपोर्टचे किती टाइप आहेत?
जेव्हा आपल्यातले बहुतेक लोक एखादा व्यक्ती लाइफ सपोर्ट सिस्टमवर असल्याबद्दल बोलतात, तेव्हा ते सहसा व्हेंटिलेटरबद्दल बोलत असतात. वास्तविक, लाइफ सपोर्ट सिस्टीम ही एक मोठी यंत्रणा आहे आणि व्हेंटिलेटर हा त्याचा एक भाग आहे. लाइफ सपोर्ट सिस्टीममध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो जसे-
व्हेंटिलेटर:
जेव्हा बुडणे, न्यूमोनिया, औषधांचा अतिरेक, रक्ताच्या गुठळ्या, फुफ्फुसाची गंभीर दुखापत किंवा आजार यामुळे फुफ्फुस निकामी होउ लागते तेव्हा वेंटिलेटरचा उपयोग होतो. व्हेंटिलेटर फुफ्फुसात हवा ढकलून संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह राखतो.
कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR ):
ज्या रुग्णांचे हृदय किंवा श्वास थांबतो अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सीपीआरचा वापर केला जातो.हृदयविकाराचा झटका किंवा बुडणे यांसारख्या प्रसंगात, तत्काळ उपचारांसाठी सीपीआरचा वापर जीव वाचवणारा ठरू शकतो.
कृत्रिम पोषण आणि हायड्रेशन:
जे रुग्ण अन्न आणि पाणी घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी याचा वापर केला जातो. यामध्ये, ट्यूब फीडिंग थेट पोटात, वरच्या आतड्यात किंवा नसांमध्ये घातली जाते आणि त्या ट्यूबद्वारे पोषक द्रव शरीरात पोहचवले जाते.
किडनी डायलिसिस:
जेव्हा किडनी फेल होऊ लागते तेव्हा डायलिसिसचा वापर शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करण्यासाठी केला जातो.
जेव्हा प्रमुख अवयव कार्य करणं थांबवतात तेव्हा डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य सेवक ताबडतोब लाइफ सपोर्ट सुरू करतात.सहसा, जेव्हा रुग्णाची बरे होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही आणि डॉक्टरांना असे वाटते की अवयव यापुढे स्वतःचे कार्य करू शकत नाहीत, तेव्हा ते लाइफ सपोर्ट बंद करण्याची शिफारस करतात.
हे ही वाच भिडू:
- लता दीदींच्या कठोर परिश्रम आणि रियाझामागे त्यांच्या लहानपणीची एक आठवण होती…
- मराठेशाहीचा जाज्वल्य इतिहास असणाऱ्या पुरंदर पासूनच अंजीराची लागवड सुरु झाली
- बाळासाहेबांची तब्येत बिघडली की एकच रामबाण उपाय असायचा. लतादीदींची गाणी….