मराठी अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न होतो तेव्हा या ‘महाराष्ट्र धर्माची’ आठवण करून दिली जाते

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचा निषेध केला आहे. या सगळ्यांमध्ये नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

यात सुषमा अंधारे म्हणाल्या कि, “राज्यापेक्षा भाजप सांभाळण्याची जबाबदारी राज्यपालांवर अधिक आहे. चला महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी, जपण्यासाठी, वाढवण्यासाठी आपण सगळे भावंडं एकत्र येऊया.” 

सुषमा अंधारे त्यांच्यासारखाच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बंडखोर आमदार सुरतमध्ये गेल्यांनतर महाराष्ट्र धर्माचा उच्चार केला होता. मात्र राजकीय नेत्यांकडून वारंवार उल्लेख केला जाणारा हा महाराष्ट्र धर्म नेमका काय आहे असा प्रश्न उपस्थित होतो..

मराठी अस्मितेवर टाच आली की महाराष्ट्र धर्मच आठवतो..

 जेव्हा जेव्हा महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, इतिहास, परंपरा यांचा कुणी अपमान केला जातो तेव्हा तेव्हा महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली जाते. 

जवळपास साडे तीनशे ते चारशे वर्षांत अनेक विचारवंतांनी आपापल्या परीने महाराष्ट्र धर्माची मांडणी केली आहे. समर्थ रामदासांनी रुजवलेला हा महाराष्ट्र धर्म आजच्या परिस्थितीत सुद्धा मराठी अस्मितेचे प्रतीक म्हणून अस्तित्वात आहे..

मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा..

सतराव्या शतकात समर्थ रामदासांनी ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ अशी हाक दिली. समर्थ रामदासांनी मांडलेली महाराष्ट्र धर्माची संकल्पना धर्म, स्वराज्य आणि त्या कालखंडातील राजकीय विचारांवर आधारलेली होती.

समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते कि नाही हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी त्या काळात प्रचलित असलेल्या राजकीय विचारांचा प्रचार आणि प्रसार समर्थ रामदास करत होते.

त्यामुळे त्या काळातल्या परकीय आणि स्वकीय या भावनांमधून आणि राजकीय विचारांमधून महाराष्ट्र धर्म मांडला गेला होता असे विश्लेषक सांगतात.

छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील महाराष्ट्र धर्म..

महाराष्ट्र धर्माचा स्पष्ट उल्लेख हा राजाराम महाराजांच्या काळात दिसतो. शिवाजी महाराजांच्या कालखंडासारखच  राजाराम महाराजांच्या कालखंडातही मराठी भागासाठी मुघल हे मोठे शत्रू होते.

त्यामुळे परकीय मुघल आणि स्वकीय मराठी बांधव अशी महाराष्ट्र धर्माची मांडणी झालेली दिसते. महाराष्ट्र धर्माची हीच मांडणी समोर सुद्धा तशीच असलेली दिसते. फक्त आधुनिक काळात परकीय बदललेले दिसतात. 

महाराष्ट्र धर्म नेमका तयार कसा झाला याबात जाणून घेण्यासाठी बोल भिडूने इतिहासाचे अभ्यासक प्रा. उमेश बगाडे यांच्याशी संपर्क साधला..

याबद्दल बोल भिडूशी बोलतांना प्रा. उमेश बागडे सांगतात..

“महाराष्ट्र धर्म ही एक वैचारिक संकल्पना आहे. ही संकल्पना कालानुरूप आणि व्यक्तीच्या समाजातील स्टेटस वरून बदलत गेलेली दिसून येते. भारतीय समाज जाती, वर्ग, भाषा या आधारावर विभागला असल्यामुळे स्वकीय आणि परकीय अशी भावना व्यक्तीनुसार बदलत जाते.”

पुढे बोलतांना ते सांगतात कि, “समर्थ रामदास यांची महाराष्ट्र धर्माची संकल्पना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील महाराष्ट्र धर्माची संकल्पना वेगवेगळी आहे. परंतु सध्याच्या काळात महाराष्ट्र धर्माच्या संकल्पनेचे एकप्रकारे एकत्रीकरण झालेले आहे. त्यामुळे मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी संस्कृती या तीन मुद्यांवर अवलंबून असलेली दिसते.” असे प्रा. बागडे सांगतात.

न्यायमूर्ती रानडे आणि राजारामशास्त्री भागवतांनी मांडलेला महाराष्ट्र धर्म..

न्यायमूर्ती गोविंद रानडे आणि राजारामशास्त्री भागवत यांनी मांडणी केलेला महाराष्ट्र धर्म हा आधुनिक काळात आणि आधुनिक विचारांच्या प्रभावाने मांडला आहे. मात्र यात इतिहासातील सुधारणावादी भूमिका घेतलेल्या आहे.

रानडे आणि भागवत यांनी मांडलेल्या महाराष्ट्र धर्मात वारकरी संप्रदायाच्या भक्ती आणि समतेच्या तत्वांना महत्व देण्यात आले होते. त्यात सोवळे-ओवळे, स्पृश्य-अस्पृश्यता, कर्मकांड, जातीव्यवस्था या गोष्टींना विरोध करण्यात आला होता.

त्यामुळे रानडे भागवतांनी मांडलेला महाराष्ट्र धर्म हा सामाजिक, सांस्कृतिक, आणि नैतिक सुधारणा घडवून आणणारा होता. यात कोणत्याही जातील किंवा धर्माला विशेष महत्व नव्हते. 

महाराष्ट्र धर्माच्या चौकटीपलीकडे महात्मा फुले यांची भूमिका

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य कसे होते आणि ते राज्य स्थापन करण्यामागे कोणता विचार होता यासाठी महात्मा फुले यांनी महाराष्ट्र धर्माची पारंपरिक चौकात वापरली नाही. त्यात महात्मा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मरक्षक, गोब्राह्मण प्रतिपालक ही प्रतिमा बदलली.

महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांची नवीन प्रतिमा तयार केली. त्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा  शेतकऱ्यांचा तारणहार, शूद्रांचा रक्षणकर्ता, निर्व्यसनी आणि पराक्रमी राजा अशा स्वरूपात मांडली. 

महात्मा फुले हे ज्या जाती समूहातून आणि वर्गातून येत होते त्यानुसार त्यांनी ही मांडणी केली असली तरी ती अतिशय ब्रॉड स्वरूपाची होती असे प्रा. उमेश बगाडे सांगतात.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र धर्म..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून पेशवाईपर्यंत मुघल हे परकीय होते. मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात गुजराती भाषिक मुख्यमंत्री आणि गुजराती भाषिक लोकं काही प्रमाणात परकीयांच्या चौकटीत बसले होते.

त्यातही एकमेकांचा विरोध करणारे अनेक पक्षांचे नेते या आंदोलनात एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. त्यात कॉम्रेड डांगे, सेनापती बापट, अण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे, सी डी देशमुख, यशवंतराव चव्हाण असे भिन्न विचारी यात एकत्र आलेले दिसतात.

त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या स्वकीय आणि परकीय अशा दोन्ही ठिकाणचे व्यक्ती बदललेले दिसतात. आणि सगळे मराठी लोकं केवळ मराठी या अस्मितेमुळे एकत्र आलेले दिसतात.

महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र धर्माची संकल्पना बरीच बदलली..

महाराष्ट्राच्या निर्मितींनंतर महाराष्ट्र धर्म ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर बदललेली दिसते. यात मराठी भाषा, मराठी माणूस आणि एकंदरीतच मराठी संस्कृती या घटकांच्या आधारावर महाराष्ट्र धर्म ही संकल्पना सर्वसामान्य लोकांच्या विचारांमध्ये आहे.

त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विविध राजकारण्यांनी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र धर्माची भूमिका घेतलीय तेव्हा तेव्हा महाराष्ट्र, महाराष्ट्राचा इतिहास, मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि परंपरा या मुद्यांच्या आधारावर ही भूमिका घेतलेली दिसते असे प्रा. उमेश बागडे सांगतात.  

समर्थ रामदास, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले यांच्यापासून संयुक्त महाराष्ट्राचा लढा देणाऱ्यांपर्यंत आलेली महाराष्ट्र धर्माची संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत चालत आलेली आहे.

मात्र सध्या अस्तित्वात असलेली सामान्य महाराष्ट्र धर्माची संकल्पना महाराष्ट्र, महाराष्ट्राचा इतिहास, मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि परंपरा या मुद्यांवर आधारलेली आहे. त्यामुळे या मुद्यांच्या आधारे वाद निर्माण होतो किंवा परराज्यातील लोकांचा मुद्दा येतो तेव्हा महाराष्ट्र धर्माची जाणीव होते. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.