रंगांवरून वाद होतो पण या रंगांचं मानसशास्त्र नेमकं काय असतं

पठाण सिनेमात दिपीका पदुकोणने घातलेल्या बिकीनीच्या रंगावरून सुरु झालेला वाद अजूनही सुरूच आहे. हिंदू धर्मीय संघटना बिकीनीचा रंग भगवा आहे असं सांगून विरोध करत आहेत तर मुस्लिम संघटना रंगाला चिश्ती रंग मानून आक्षेप घेत आहेत. यावर धार्मिक आणि राजकीय संघटना तर आक्षेप घेत आहेतच सोबतच याचे पडसाद संसदेत देखील उमटत आहेत. 

परंतु रंगांवरून वाद निर्माण होण्याचं हे काही पहिलं प्रकरण नाही. धार्मिक, राजकीय ध्वज आणि त्यांच्या रंगांवरून आजपर्यंत अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पण या वादांमागे रंग इतके कारणीभूत का असतात ?

तर यामागे रंगांचं मानशास्त्र कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. 

लोकं समाजात बोलतांना वेगवगेळ्या म्हणींचा आणि वाक्प्रचारांचा वापर करत असतात, ज्यात रंगांचा उल्लेख असतो. जसं, दुधाने धुतला आहे ?, तो तर सरड्यासारखा रंग बदलणारा आहे. अशी वाक्य अनेक वर्षांच्या अनुभवातून माणसाने विकसित केली आहेत. कारण माणसाला दिसणारे रंग आणि माणसाची चेतना यांच्या आधारावर माणसाने स्वतःचं रंगांचं मानसशास्त्र विकसित केलं आहे.

रंगांचं मानसशास्त्र हे माणसांच्या भावनांशी जुळलेलं असतं, रंग हे युनिवर्सल असतात त्यामुळे वेगेवगेळ्या रंगांना बघितल्यानंतर माणसाच्या वेगवगेळ्या भावना जागृत होतात. हे मानसशास्त्र वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक या वेगवगेळ्या पातळ्यांवर ठरत जातं आणि ते लहानपणापासून व्यक्तीच्या मनावर बिंबवलं जात असतं असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. 

वेगवगेळ्या रंगांबरोबर माणसाच्या वेगेवगेळ्या भावना जुळलेल्या असतात.

भगवा रंग

भगवा रंग बघितल्यानंतर अनेकांना धीर येतो, या रंगातून माणसाला स्वतःच्या भावना जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येतात. भगवा रंग शौर्य, त्याग, सेवा आणि यशस्वितेचं प्रतीक मानलं जातं. पूर्वीच्या काळातील हिंदू ऋषी मुनी निसार्गामुळे प्रेरित झाले होते. हवं पूजनात वापरली जाणारी अग्नी आणि संध्याकाळी असलेल्या सूर्याच्या रंगावरून त्यांनी भगवा रंग घेतला असं सांगितलं जातं.

पिवळा रंग

पिवळा रंग क्रिएटिव्हिटी, आनंद, उबदारपणा, स्मरणशक्ती दर्शवतो. पिकाच्या पक्वतेत, सूर्यकिरणांमध्ये असलेला पिवळा रंग संपन्नतेचं प्रतीक मानला जातो. उजेडात हा रंग अतिशय उठून दिसतो त्यामुळे क्रिएटिव्ह ब्रॅण्ड स्वतःचे लोगो बनवतांना पिवळ्या रंगाचा वापर करतात. उदा. मॅगी, मॅक्डोनाल्ड यांसारख्या ब्रँडचे लोगो पिवळ्या रंगाचे आहेत.

लाल रंग 

लाल रंग बघितल्यानंतर मनात कुतूहल वाढतं, स्त्री पुरुष एकमेकांकडे आकर्षित होतात, वैचारिक भूमिकेतून लाल रंग रक्ताच्या आधारवर होणारी क्रांती दाखवतो, त्याच्यामुळे लाल रंगाकडे पाहिल्यानंतर एक प्रकारचा हुरूप येतो. त्यामुळे लाल रंग व्हॅलेंटाईन डे, पार्टीमधील कपडे लाल रंगाचे असतात. तसेच मजुरांसाठी काम करणाऱ्या संघटना आणि पक्षांच्या झेंड्यांचा रंग हा लाल असतो. 

हिरवा रंग 

हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी आणि उत्साहाचा रंग मानला जातो. हिरवागार निसर्ग, शेती, उद्यान बघितल्यानंतर ताजेपणा वाटतो. यामुळेच ताज्या आणि टवटवीत गोष्टींना दाखवण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो.

अरेबियाच्या वाळवंटात हिरवेगार मृगजळ फार कमी असतात त्यामुळे हिरव्या रंगला इथे फार महत्व आहे. इस्लामचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांचा आवडता रंग हिरवा होता त्यामुळे ते हिरव्या रंगाचा फेटा बांधायचे. त्यामुळे हिरवा रंग इस्लामचा रंग म्हणून स्वीकारण्यात आला असं सांगितलं जातं.

त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी आणि देशांनी धार्मिक कारण म्हणून हिरव्या रंगाचा वापर स्वतःच्या ध्वजात केला आहे. तर अनेक शेतकरी संघटना, उत्तर भारतीय राजकीय पक्षांनी देखील स्वतःच्या ध्वजात हिरव्या रंगाचा वापर केला आहे.

जांभळा रंग 

जांभळा रंग हा रंग सहसा बनवता येत नव्हता, त्यामुळे जगातील कोणत्याही प्रकारच्या ध्वजांमध्ये जांभळ्या रंगाचा वापर झालेला दिसत नाही. हा रंग महागडा असल्यामुळे श्रीमंत लोकच जांभळ्या रंगाचा वापर करू शकत होते. त्यामुळे आजही जांभळा रंग राजेशाही आणि श्रीमंतीचं प्रतीक मानला जातो.

पांढरा रंग 

पांढरा रंग स्वच्छता, निर्मळता, पवित्रता आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं. भारतीय संस्कृतीत देखील पवित्रतेचं प्रतीक म्हणून पांढरे कपडे घातले जातात. ख्रिश्चन धर्मात देखील पांढऱ्या रंगालाच जास्त महत्व देण्यात आलं आहे. पांढरा रंग बघितल्यानंतर भावना उचंबळून येत नाहीत त्यामुळे सेल्समन, व्हिसिस्टर्स आणि ऑफिसमधील ड्रेसकोडमध्ये प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो असं सांगितलं जातं.

निळा रंग

निळा रंग राजेशाही आणि कुशाग्रतेचं प्रतीक देखील मानलं जातं, निळा रंग बनवण्याची सुरुवात सर्वात आधी इजिप्तमध्ये झाली. त्यानंतर भारतात देखील निळा रंग बनवला जाऊ लागला. निळा रंग मोठ्या प्रमाणावर भारतात बनवला जात होता त्यामुळे निळ्या रंगाला इंडिगो देखील म्हणतात.

आकाशाचा रंग निळा असतो आणि आकाश सगळ्यांसाठी सामान असतो त्याच्यामुळे निळ्या रंगाला समानतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी दलित क्रांतीला निळा रंग दिला असं सांगितलं जातं.

काळा रंग 

काळा रंग हा शक्ती, ताकद आणि प्रभावीपणाचा रंग मानला जातो, त्यामुळे प्रभावी आणि प्रमुख व्यक्ती काळ्या रंगाचे कपडे घालत असतात. परंतु धार्मिक मान्यतेनुसार काळ्या रंगला अशुभ देखील मानलं जातं. काळा रंग हा पांढऱ्या रंगाच्या एकदम विरुद्ध असल्यामुळे पांढऱ्या रंगाच्या उलट काळा रंग पवित्रता, अशुद्धता, अशुभ मानला जातो. याबाबत काही अपवाद देखील आहेत. 

वेगवगेळ्या रंगांचे माणसाच्या मनावर वेगवेगळे प्रभाव पडतात, प्रत्येकाचे आवडते आणि नावडते रंग वेगवगेळे असतात.

काही विशिष्ट रंगांमुळे माणसाचा हायपोथेलोमीस ट्रिगर होऊ शकतो, यामुळे माणसाला तो रंग बघितल्यानंतर राग येत असतो. त्यामुळेच दीपिकाची भगव्या रंगाची बिकनी बघून काहींना राग आला तर काहींना त्याचं काहीच वाटलं नाही. यामागे भगव्या रंगाबद्दलची धार्मिक मान्यतेच मानसिक कारण आहे असं सांगितलं जातं.

यासोबत रंगावर आधारित एक मानसिक आजार देखील असतो ज्याला क्रोमोफोबिया असं म्हणतात. 

या मानसिक आजाराने ग्रस्त असलेला व्यक्ती एक किंवा दोन रंगांना घाबरतो किंवा त्या रंगांचा प्रचंड राग येतो. हा मानसिक आजार जन्मजात किंवा सामाजिक असू शकतो. लहानपणी झालेले धार्मिक किंवा सामाजिक संस्कार, लहानपणी घडलेल्या घटनांमुळे व्यक्तीच्या मनात विशिष्ट रंगाबद्दल राग किंवा भीती निर्माण होते. हा आजार मानसोपचारतज्ञांच्या मदतीने बरा होऊ शकतो.

रंगांबद्दल काही महत्वाचे मानसिक फॅक्ट देखील आहेत.

  • पिवळा रंग बघितल्यामुळे काही जणांना चक्कर किंवा उलटी येऊ शकते. त्यामुळे विमानामध्ये पिवळ्या रंगाचा वापर केला जात नाही.
  • निळा रंग हा जगातील सर्वाधिक आवडता रंग मानला जातो. जगातील जवळपास ४० टक्के लोकांचा आवडता रंग निळा आहे तर भारतातील ६० टक्के लोकांचा रंग निळा आहे असं सांगितलं जातं.
  • काळा रंग ताकदीचा, शक्तीचा आणि प्रभावीपणाचा रंग मानला जातो. त्यामुळे प्रमुख व्यक्ती हे नेहमी काळ्या रंगाचे कपडे वापरत असतात. तसेच न्यायाधीश देखील काळया रंगाचे कपडे घालत असतात.
  • सगळ्यात महत्वाचा फॅक्ट म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या रंगातील आठवणी लवकर विसरतात असं सांगितलं जातं. रंग आणि मेमरीमध्ये रंगांना लक्षात ठेवण्यावरून एक कनेक्शन असतो. यात पांढरा आणि काळ्या रंगातील आठवणी अनेकांना स्पष्ट आठवण राहत नाहीत असं सांगितलं जातं.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.