नवाब मलिकांच्या अटकेमुळे चर्चेत आलेला मनी लॉन्ड्रिंग नेमका विषय काय असतो?

आज नवाब मलिकांना अटक झाली. आता अटक कुठं झाली ? कशी झाली ? पुढं काय होणार ? हे आपल्याला बातम्यांमधून समजतंच राहील. पण त्यांच्या अटकेची बेसिक कारण होतं मनी लॉन्ड्रिंग.

अर्थात काळा पैसा…

जरा नवाब मलिकांचा विषय बाजूला ठेवला ना तर अख्या जगात असे फारच कमी लोक असतील ज्यांनी लीगली पैसे कमावले असतील. कारण सध्याच्या काळात प्रामाणिकपणे न काम करणारे आणि बेकायदेशीर कमाई करून जगणारे टॉपला जातात. आणि मग बाहेर पडतात यांचे मनी लॉन्ड्रिंगचे किस्से.

आता मनी लॉन्ड्रिंगचा शब्दशः अर्थ काय तर पैसे धुणे.

जेव्हा आपले कपडे काळे पडतात, त्यावर डाग पडतात, ते मळतात तेव्हा त्यांना स्वच्छ करण्यासाठी आपण धुतो. अर्थात लॉन्ड्रि करतो. आता पैशांच पण असंच असतं. आपण चुकीच्या मार्गाने जमवलेले काळे पैसे, पांढरे करायचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग.

आता याचं बेस्ट उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंडची स्विस बँक. इथं मोठ्या संख्येने काळा पैसा साठवलाय. विशेष म्हणजे यात भारतीय जास्त आहेत. म्हणजे इतर देशातले लोक पण इथं आपला काळा पैसा साठवत होते. म्हणजे मनी लॉन्ड्रिंगची काम फक्त भारतीय लोकचं नाही तर जगातली सगळीच लोक करत असतात.

त्यामुळे मनी लाँड्रिंगची संकल्पना पण पाश्चात्यच आहे. हा शब्द पहिल्यांदा अमेरिकेत वापरला गेल्याचं दिसत. अमेरिकेतले माफिया बेकायदेशीर जुगार, तस्करी वगैरे द्वारे भरपूर पैसे कमवायचे. त्यानंतर ते पैसे कायदेशीर मार्गाने सरकार समोर सादर करायचे. ही प्रक्रिया करण्यासाठी अमेरिकन माफिया त्या ठिकाणी मनी लॉंडरिंग हा शब्द वापरत.

मनी लॉन्ड्रिंग या शब्दामुळे भारतात राजकीय खळबळ उडाली होती ती हवाला प्रकरणात. भारतात मनी लाँडरिंग हा हवाला व्यवहार म्हणून लोकप्रिय आहे. १९९० च्या दशकात भारतामध्ये हवाला प्रकरणात अनेक नेत्यांची नावे समोर आली होती.

आता हे मनी लॉन्ड्रिंग करायचं कसं ?

तर तीन टप्प्यात. प्लेसमेंट, लेयरिंग आणि इंटिग्रेशन

प्लेसमेंट मध्ये एखाद्याकडचा ब्लॅक मनी वेगवेगळ्या बँकेत वगैरे जमा केला जातो.

लेयरिंग मध्ये हा काळा पैसा A कडून B कडे, B कडून C कडे असा १० वेळा इकडून-तिकडे तिकडून इकडे असा पैशांचा व्यवहार केला जातो. म्हणजे या पैशाचा ओरिजिनल सोर्स तपास यंत्रणांच्या लक्षात येत नाही. जेव्हा कधी या ब्लॅक मनीवरून चौकशी होईल, तपास होईल, तेव्हा हा पैसा इतक्या वेळेला इथून-तिथे फिरवलेला असतो, की अधिकाऱ्यांनाही त्याचा खरा सोर्सच समजतं नाही.

आता इंटिग्रेशन म्हणजे या पैशांचं ओरिजिन कळत नाही. तर मग आता हा पैसा खर्च करायला मोकळा होतो. म्हणजेच ब्लॅक मनी पुन्हा अर्थव्यवस्थेत, मार्केटमध्ये आणणं. म्हणजेच यातून आणखी संपत्ती खरेदी केली जाते.

म्हणजेच, बॅंकांसारख्या आर्थिक संस्थांमध्ये पैसे डिपॉजिट करायचे, मग तो पैसा फिरवायचा. मग त्या पैशांनी खरेदी करणं, किंवा तो पुन्हा मार्केटमध्ये आणणं. बऱ्याचदा हा काळा पैसा अशाच मार्गाने व्हाईट केला जातो.

आता हे ब्लॅक मनी वाले सापडतात कसे ?

तर भारतात यासाठी कायदे आहेत. भारतातील मनी लाँड्रिंग कायदा २००२ मध्ये लागू करण्यात आला होता, मात्र त्यात ३ वेळा (२००५, २००९ आणि २०१२) सुधारणा करण्यात आली आहे. २०१२ च्या शेवटच्या दुरुस्तीला ३ जानेवारी २०१३ रोजी राष्ट्रपतींची मान्यता मिळाली आणि हा कायदा १५ फेब्रुवारी २०१३ पासून लागू झाला.

काळा पैसा व्हाईट करण्याचा आरोप सिद्ध झाल्यास ३ ते ७ वर्षांचा तुरूंगवास, किंवा ५ लाखांचा दंड आकारला जातो. शिवाय या प्रकरणात संपत्ती जप्तही केली जाऊ शकते.

भारतात ED, CBI, NCB, SEBI या यंत्रणा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तपास करू शकतात, या तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवण्याचा, चौकशीसाठी समन्स बजावण्याचा, संपत्ती पाहण्याचा, छापा टाकण्याचा आणि जप्त करण्याचा शिवाय अटक करण्याचाही अधिकार असतो.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.