वाजपेयींनी ‘चले जाव’ चळवळीत इंग्रजांची माफी मागितली होती का..?

 

भाजप आणि संघ परिवारावर विरोधकांकडून कायमच एक आरोप करण्यात येतो. तो आरोप म्हणजे त्यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला नव्हता, उलट ते इंग्रजांच्या बाजूने होते. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर देखील काँग्रेसकडून हा आरोप करण्यात आला होता. संघ परिवार मात्र विरोधकांचा हा दावा खोडून काढताना वाजपेयींनी १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळी दरम्यान तुरुंगवास भोगल्याच्या घटनेविषयी सांगतो.

संघ परिवाराचा हा दावा विरोधक मान्य करत नाहीत. उलट ‘चले जाव’ चळवळीत वाजपेयी इंग्रज सरकारसाठी ‘माफीचे साक्षीदार’ झाल्याचा आरोप १९७१ साली काँग्रेसकडून वाजपेयी यांच्यावर करण्यात आला होता. त्यासाठी माध्यमांमध्ये प्रकाशित बातम्यांचा आणि १९४२ च्या बटेश्वर येथील आंदोलनाचे प्रमुख नेते म्हणून भूमिका निभावलेल्या काकुआ उर्फ लीलाधर बाजपाई यांच्या वक्तव्याचा दाखला काँग्रेसकडून देण्यात आला होता.

हे प्रकरण नेमकं काय होतं आणि खरंच वाजपेयींनी इंग्रजांची माफी मागितली होती का, यासंबंधीचा एक किस्सा ‘फ्रंटलाईन’ मासिकाने केलेल्या विस्तृत वार्तांकनामध्ये वाचायला मिळतो.

किस्सा असा की महात्मा गांधीजींनी ‘चले जाव’ चळवळीची घोषणा दिली त्यावेळी वाजपेयी आपल्या मोठ्या भावासोबत बटेश्वर या आपल्या मूळ गावी होते. आपल्या मुलांनी आंदोलानात सहभागी होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनीच त्यांना गावी पाठवले होते. परंतु आंदोलन बटेश्वरमध्ये देखील पोहचलं होतं.

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बटेश्वरमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती. वाजपेयी देखील आपल्या बंधूसह सभेच्या आसपासच्या परिसरातच होते. पोलिसांना ज्यावेळी या सभेची कुणकुण लागली त्यावेळी ते घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांनी वाजपेयी बंधूंना  ताब्यात घेतलं. संघ ज्या तुरुंगवासाविषयी सांगतो ती घटना हीच.

काँग्रेस ज्या माफीनाम्याविषयीचे आरोप करतं ते आरोप १९९८ सालापर्यंत वाजपेयींनी फेटाळले होते. विरोधक आपली राजकीय प्रतिमा खराब करण्यासाठी जाणूनबुजून आपल्यावर असे आरोप करतात असं वाजपेयी सांगायचे. मात्र १९९८ साली खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनीच याबाबतीत खुलासा केला होता.

फ्रंटलाईन मासिकाचे संपादक एन.राम यांना दिलेल्या मुलाखतीत वाजपेयींनी स्वतः कबुली दिली होती की बटेश्वरमधील आंदोलनात आपला सहभाग केवळ ‘प्रेक्षक’ म्हणून होता आणि कुठल्याही क्रांतिकारी कृत्यात आपण सहभागी नव्हतो. शिवाय न्यायाधीशांसमोर दिलेल्या कबुलीजाबावर तो कबुलीजाब उर्दूत असल्याने न वाचताच आपण सही केली होती.

frontline
हाच तो उर्दूतील कबुलीजबाब. फोटो- फ्रंटलाईन

या मुलाखतीत आपल्या कबुलीजाबाविषयी बोलताना वाजपेयी सांगतात की, “ मी कुणाविरुद्ध काहीही बोललो नव्हतो. तसा दावा मी कधीही केलेला नाही. जे काही घडलं होतं तेवढंच मी खरं-खरं सांगितलं होतं” यावरून ‘चले जाव’ चळवळीत वाजपेयींचा सहभाग असल्याचा संघाचा दावा निखालस खोटा असल्याचं सिद्ध झालं होतं.

फ्रंटलाईनच्या रिपोर्ताजनुसार, वाजपेयींनी इंग्रज सरकारचा माफीचा साक्षीदार म्हणून भूमिका निभावल्याचा आरोप चुकीचा होता. कारण त्यांच्या कबुलीजाबाचा समावेश पुढे चालविण्यात आलेल्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी  करण्यातच आला नव्हता. परंतु असं असलं तरी वाजपेयींनी आपल्या कोर्टासमोरील जबानीत जी माहिती दिली होती, त्या माहितीच्या आधारे पोलिसांना आंदोलकांवर खटले भरणं सहज शक्य होतं.

गमतीची गोष्ट म्हणजे एवढं सगळं होऊन देखील वाजपेयींचे वकील डॉ. एन.एम. घटाटे यांनी मात्र फ्रंटलाईनला वाजपेयींच्या वतीने त्यांच्या परस्परच एक पत्र पाठवलं होतं. ज्यात फ्रंटलाईनने आपल्या रिपोर्ताजबरोबर जोडलेल्या कबुलीजाबावरील वाजपेयींची सही बनावट असल्याचा दावा केला होता. “या कबुलीजाबावर वाजपेयींच्या वडिलांचं नांव ‘गौरी शंकर’ असं छापण्यात आलंय परंतु वस्तुस्थिती अशी की वाजपेयींच्या वडिलांचं नांव कृष्ण बिहारी असं आहे. या गोष्टीवरून हा कबुलीजबाब खोटा असल्याचं सिद्ध होतं” असं डॉ. घटाटे यांचं म्हणणं होतं.

मुलाखतीत वाजपेयींनी आपल्याच वकिलांना तोंडावर पाडत कबुली दिली होती की कबुलीजबाबातील वडिलांचं ‘गौरी शंकर’ असं नांव आपणच नोंदवलं होतं, कारण त्यांचे वडील घरी त्याच नावाने ओळखले जात असत. आपल्या वकिलांनी फ्रंटलाइनला पाठविलेल्या कायदेशीर नोटीसीबद्दल ऐकल्यानंतर आपल्याला धक्काच बसल्याचं सांगत वकिलांनी मासिकाला दिलेलं पत्र आपण परत घेत असल्याचं देखील वाजपेयींनी सांगितलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.