ज्याला शेन वॉर्न तोफ म्हणायचा, त्या स्वप्नील असनोडकरचं पुढं काय झालं..?

ते वर्ष होतं २००८. रस्त्यानं येता जाता पोरं फ्लेक्स बघायची आणि त्यावर असलेली टीम्सची नावं लक्षात ठेवायची. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या फ्लेक्सवर दारुच्या कंपनीचा लोगो असायचा, मुंबई इंडियन्सकडं साक्षात सचिन तेंडुलकर होता, चेन्नईच्या गाडीचं स्टेअरिंग वर्ल्डकप जिंकणाऱ्या धोनीकडे होतं, कोलकात्याकडे तर गांगुली आणि शाहरुख खान असे दोन सुपरस्टार्स एकत्र होते.

बाकी डेक्कन चार्जर्स, प्रीती झिंटाचं पंजाब, सेहवागचं दिल्ली डेअरडेव्हील्स अशाही टीम्स होत्या. पण या सगळ्यात कुठल्या टीमकडे दुर्लक्ष झालं असेल…

तर राजस्थान रॉयल्स.

शिल्पा शेट्टी हा मुख्य चेहरा असलेल्या या टीमचा कॅप्टन होता शेन वॉर्न. आता वॉर्ननं आपल्याला ज्या अगणित जखमा दिलेल्या होत्या, त्या काय तेव्हापर्यंत भरुन आलेल्या नव्हत्या (तशा अजूनही आल्या नाहीत.) त्यामुळं वॉर्न जायचा डोक्यात.

ऑस्ट्रेलियन प्लेअरला कॅप्टन करायला आपल्याकडचे प्लेअर काय संपले होते का? असा लय जणांचा सूर होता.

पण मेन विषय असा होता, की राजस्थान रॉयल्सकडे अगदी स्टार व्हॅल्यू असलेले प्लेअर नव्हतेच. दोन चार सिनिअर आणि बाकी सगळे यंगस्टर्स घेऊन वॉर्ननं आपली टीम मैदानात उतरवली होती. या टीमकडे स्टारडम नसलं, तरी आत्मविश्वास मात्र मजबूत होता.

पहिल्या काही मॅचेसमध्ये एक बुटकासा पण तब्येत असलेला प्लेअर राजस्थानच्या डगआऊटमध्ये दिसायचा. 

सिझनची पाचवी मॅच होती, राजस्थान विरुद्ध कोलकाता. अनुभवी ग्रॅम स्मिथ सोबत, तो डगआऊट मधला साडेपाच फुटांचा भिडू ओपनिंगला आला. मॅचच्या चौथ्या बॉलवर त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्यानं फोर मारत आपल्या आयपीएल करिअरला थाटात सुरुवात केली.

या भिडूनं त्याच मॅचमध्ये भल्याभल्या बॉलर्सला चोपत खतरनाक फिफ्टी केली, त्याच्या ३४ बॉल ६० रन्समुळं त्याला मॅन ऑफ द मॅचही मिळालं.

त्याचं नाव स्वप्नील असनोडकर.

बाकीच्या कार्यकर्त्यांसमोर काहीशी बारकी उंची, मनगटांमध्ये अझरुद्दीनची आठवण यावी अशी ताकद आणि सुपरफास्ट फिल्डिंग या गुणांमुळं असनोडकर अगदी पहिल्या सिझनपासून सगळ्यांच्या लक्षात राहिला होता. ग्रॅमी स्मिथ सारख्या मोठ्या प्लेअरसोबत ओपनिंगला येऊनही त्याच्या बॅटिंगनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.

त्या सिझनमध्ये असनोडकरनं ३११ रन्स चोपले. राजस्थानला अनेकवेळा दमदार सुरुवात करुन दिली. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, की भारताला आणखी एक भारी ओपनर मिळालाय. त्यातल्या त्यात गोव्यातली लोकं तर जरा जास्तच खुश होती.

कारण असनोडकर गोव्याचा सुपुत्र. 

भारताचे माजी सलामीवीर दिलीप सरदेसाई यांच्यानंतर भारताच्या पुरुष संघाकडून अजूनही गोव्याचा खेळाडू खेळलेला नाही. असनोडकरची बॅटिंग, त्याचा आत्मविश्वास आणि फॉर्म पाहून सगळ्यांना वाटलेलं की, हा फिक्स भारताकडून खेळणार.

पण मग पुढं काय झालं..?

२००९ च्या आयपीएलमध्ये ८ मॅचेसमध्ये मिळून त्याला फक्त ९८ रन्सच करता आले. तर, २०१० आणि २०११ मध्ये रन्सची गाडी ५ आणि ९ वरच अडकली. पहिल्या सिझनला ३११ रन्स करणाऱ्या स्वप्नीलला पुढच्या तीन वर्षांत मिळून १२२ रन्सपर्यंतच मजल मारता आली. आयपीएलमधला फॉर्म तर प्रचंड गंडला होता.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र असनोडकरनं आपली रन्सची भूक आटू दिली नाही.

२००७-०८ च्या रणजी स्पर्धेत ६४० रन्स मारले होते, त्यात त्याचा हायेस्ट स्कोअर होता नॉटआऊट २५४. याच कामगिरीच्या जोरावर त्याला आयपीएलचं तिकीट मिळालं होतं आणि फॉरमॅट वेगळा असला तरी त्यानं आयपीएलमध्ये नाव कमावलं होतं. पुढं त्याच नाव फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये झळकत राहिलं, गोव्याचं नेतृत्व करताना त्यानं संघाचा खेळ उंचावण्यातही मोलाचं योगदान दिलं.

पण भारतीय संघाचं दार स्वप्नील असनोडकरसाठी कधी उघडलंच नाही.

२००८ च्या यशस्वी आयपीएलनंतर इंडिया ए संघात त्याला स्थान मिळालं होतं, मात्र तिथंही संधी आणि फॉर्मचं गणित जुळून आलंच नाही. ३ मॅचेस पैकी २ मॅचेसमध्ये तर असनोडकर रनआऊट झाला.  

त्याच्यात प्रचंड गुणवत्ता होती, एकहाती मॅच फिरवण्याची ताकदही होती. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करुनही तो दुर्लक्षितच राहिला. 

पहिल्या आयपीएल दरम्यान शेन वॉर्न आणि राजस्थानचे काही खेळाडू असनोडकरच्या घरी गेले होते. वॉर्ननं असनोडकरला एक टोपणनावही दिलं होतं… ‘Goa Cannon.’ ही गोव्याची तोफ पहिल्या आयपीएलमध्ये अगदी कानठळ्या बसाव्यात अशी धडाडली मात्र त्यानंतर तीच आवाज मंदावला.

असं असलं तरी तो लोकांच्या विस्मृतीत मात्र गेला नाही. सध्या तो गोव्याच्या अंडर-२५ टीमचा कोच आहे.

 डोमेस्टिक क्रिकेटमध्ये गोव्याच्या टीमची काय दहशत नाहीये, पण सध्या गोव्याचे यंगस्टर्स झपाट्यानं प्रगती करतायत. स्वप्नील असनोडकर भारताकडून खेळणारा गोव्याचा दुसरा क्रिकेटर बनू शकला नाही…

पण त्यानं स्वप्न बघणं सोडलेलं नाही. तो नाही तर त्याचा विद्यार्थी सही..!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.