विराट कोहलीनं डीआरएसवरुन केला, तसाच राडा भारत-पाकिस्तान मॅचमध्येही झाला असता…

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा त्यांच्याच देशात बाजार उठवून भारतीय संघ साऊथ आफ्रिकेत पोहोचला. पहिली कसोटी दणक्यात जिंकली तेव्हा, भारत इकडंही धुमाकूळ घालणार असं वाटत होतं. मात्र दुसऱ्याच कसोटीत भारताची नौका बुडाली. निर्णायक तिसऱ्या कसोटीत एक कोहली आणि पंत सोडले, तर इतर भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली.

स्कोअरबोर्डवर हे सगळं घडत असताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कोहली, अश्विन, राहुल हे भारतीय खेळाडू टीव्ही ब्रॉडकास्टरवर चांगलेच भडकले होते. मैदानावर काय राडा झाला आणि कोहली स्टम्प माईकच्या जवळ जाऊन काय बोलला हे आधी सांगतो.

तर झालं असं, भारतानं आफ्रिकेला जिंकण्यासाठी टार्गेट दिलेलं फक्त २१२ रनांचं. त्यातही आफ्रिकन कर्णधार डीन एल्गर नांगर टाकून बॅटिंग करत होता. डावाच्या २१ व्या ओव्हरमध्ये आपल्या अश्विननं एल्गरला पायचीत पकडलं. अंपायरनंही आऊट असल्याचा निर्णय दिला. मात्र एल्गरनं रिव्ह्यू घेतला. उघड्या डोळ्यांनी पाहिलं असतं, तर एल्गर सपशेल आऊट वाटत होता. पण मोठ्या स्क्रीनवर असं दिसलं की, बॉल फास्ट बॉलरनं टाकल्यासारखा उडालाय आणि त्यामुळं एल्गर नॉटआऊट ठरला.

आता भारताची पोरं काय शांत बसणारी नाहीत, कॅप्टन कोहली चालत चालत स्टम्पपाशी गेला आणि माईकजवळ तोंड नेऊन बोलला, ‘Focus on your team while they shine the ball. Not just the opposition. Trying to catch people all the time.’ कोहली म्हणतोय तुमची टीम बॉल चमकवते याकडेही जरा लक्ष देत जा. कायम लोकांना चुकीत शोधायला बघू नका. मागं ऑस्ट्रेलिया आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती, तेव्हा बॉल टॅम्परिंग करताना ऑसी खेळाडू थेट कॅमेऱ्यावरच दिसले होते.

स्टम्प माईकपाशी जाऊन बडबडणारा कोहली एकटाच प्लेअर नव्हता. आपला स्पिनर आर. अश्विन म्हणजे साधा चेहरा आणिक अंदाज गेहरा. हा भाऊ तर डायरेक्ट सुपरस्पोर्ट या ब्रॉडकास्टिंग कंपनीला उद्देशूनच बोलला की, ‘You should find better ways to win, SuperSport.’ डायरेक्ट खोडावर घाव. आता आपला कॅप्टन बोलतोय, आपला स्पिनर बोलतोय म्हणल्यावर व्हाईस कॅप्टन केएल राहुलनं तरी का शांत राहावं. त्यानं पण टोमणा हाणला, ‘It’s the whole country against 11 guys.’ राहुल तर डायरेक्ट सगळ्या आफ्रिकेलाच नडला.

आता जर तुम्हाला शंका असेल की, कोहलीनं स्टम्प माईकपाशी येऊन एमआरएफची जाहिरात सांगितली, की आफ्रिकेला शिव्या घातल्या? त्याचं आता निरसन झालं असेल.

हा झाला लेटेस्ट पिक्चर आता आपण जाऊयात फ्लॅशबॅकमध्ये-

मोहालीचं मैदान, भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल. फुल हाय व्होल्टेज मॅच सुरू होती. सचिन तेंडुलकर २३ रन्सवर खेळत होता. सेहवाग लवकर आऊट झाल्यानं भारताच्या सगळ्या आशा तेंडल्याकडूनच होत्या. अशात सईद अजमलचा बॉल त्याच्या पायाला येऊन धडकला, पायचीतचं जोरदार अपील झालं आणि तेंडुलकर आऊट. मोहाली स्टेडियम सोडा सगळ्या भारतात सन्नाटा पसरला. पण सचिननं रिव्ह्यू घेतला.

भारतानं आधीच एक रिव्ह्यू घालवला होता, त्यामुळे सगळ्यांचं टेन्शन वाढलं. उघड्या डोळ्यांनी तर तेंडूलकर आऊट वाटत होता. पण डीआरएसमध्ये दिसलं की बॉल लेग स्टम्पला काय लागत नाहीये. अंपायरला निर्णय बदलावा लागला आणि तेंडुलकरनं दणक्यात ८५ रन्स केले.

त्यादिवशी तेंडुलकरचे एकूण चार कॅच सुटले, आऊट झाल्यावरही तो नॉटआऊट ठरला. पण पाकिस्तानी खेळाडू काय स्टम्पजवळ येऊन बोलले नाहीत, मॅच सुरू होती भारतात, त्यात त्याला सगळे पदाधिकारी पण उपस्थित त्यामुळं त्यांनी जरा नमतं घेतलं असावं. आणि नाय म्हणलं तरी ती टेक्नॉलॉजीची चूक आणि आपल्या सचिनचं नशीब.

तेव्हा सचिनचं होतं, आता एल्गरचं आहे इतकंच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.