टोलनाके फुटले, अटक झाली… पण राज ठाकरेंच्या टोल आंदोलनाचं पुढं काय झालं..?

मशिदीवरचे भोंगे या विषयावर जाहीर सभांमध्ये बोलल्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ‘भोंग्यांचा विषय हा एका दिवसाचा नाही, जोपर्यंत सगळे भोंगे उतरवले जात नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार’ असं वक्तव्य राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं.

थोडक्यात मनसेचं हे भोंगाविरोधी आंदोलन गाजणार, हे जवळपास निश्चितच झालंय.

गेल्या काही निवडणुकांमध्ये बॅकफूटवर गेलेल्या मनसेला पुन्हा फ्रंटफुटवर आणण्यासाठी हे भोंग्यांचं आंदोलन महत्त्वाचं ठरणार का? सोबतच मनसेच्या मागणी प्रमाणे मशिदी आणि इतर प्रार्थना स्थळांवरचे भोंगे उतरणार का? हे पाहावं लागेल.

पण स्थापनेपासून आतापर्यंत मनसेनं केलेली आंदोलनं हा कायम चर्चेचा मुद्दा राहिलाय, दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात यासाठी केलेलं आंदोलन, मराठी मुलांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावं म्हणून केलेलं आंदोलन, इत्यादी. पण सगळ्यात जास्त गाजलेलं मनसेचं आंदोलन कुठलं असेल, तर ते म्हणजे टोल विरोधी आंदोलन.

स्थापनेनंतर जवळपास सहा वर्षांनी म्हणजेच २०१२ मध्ये मनसेनं ‘टोल’चा मुद्दा प्रखरतेनं हाती घेतला.

माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे राज ठाकरेंनी टोल गोळा करण्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. ‘रस्ते बांधणीसाठी लागणारे पैसे आणि आपल्या गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला नफा गोळा झाल्यानंतरही कंत्राटदार टोल वसुली सुरूच ठेवतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांची पोलखोल करणार.’ असं राज यांनी जाहीर केलं.

जून २०१२ मध्ये ठाकरेंनी दिलेल्या आदेशानंतर, जवळपास १५ दिवस मनसे कार्यकर्ते राज्यातल्या प्रमुख ४० टोलनाक्यांवर २४ तास बसले होते. त्यांनी टोल भरायला येणाऱ्या प्रत्येक गाडीची नोंद ठेवली. कार्यकर्त्यांनी आपापसात शिफ्ट्स वाटून घेतल्या आणि सतत पहारा ठेवला.

दिवसातल्या कुठल्याही वेळेत टोलनाक्यावर मनसे कार्यकर्ते दिसत असल्यानं लोकांची चांगलीच सहानुभूती मिळाली.

जुलै २०१२ मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गोळा केलेली माहिती राज यांनी सादर केली, ते म्हणाले, “मुंबईतल्या पाच प्रवेशदारांशी संबंधित पाच टोलनाक्यांवर दिवसाला १.३७ कोटी रुपये जमा होतात. ती रक्कम आपण सव्वा कोटी जरी धरली, तरी वर्षाला ४६५.२५ कोटी रुपये होतात.

या हिशोबानं कंत्राटदारानं आतापर्यंत ३९३४.६४ कोटी गोळा केले आहेतच, पण भविष्यात वाढती लोकसंख्या बघता करार पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराला १४५२४.७९ कोटी रुपये मिळतील.”

सोबतच त्यांनी खालापूर टोलनाका, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरचा टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरचा टोलनाका अशा विविध टोलनाक्यांची माहिती सादर केली. सोबतच रास्ता कंत्राटदारांनी स्वच्छतागृह, सर्व्हिस रोड, अँब्युलन्स अशा सुविधा द्यायल्याच हव्यात असंही सांगितलं.

राज्य सरकार जोवर टोलच्या कारभारात पारदर्शकता आणणार नाही, तोवर कुणीही टोल भरू नका असं आवाहन त्यांनी राज्याच्या जनतेला केलं होतं. त्यामुळे मनसेचे झेंडे लावलेल्या, न लावलेल्या अनेक गाड्या टोल न भरताच तोल नाक्यावरुन सुसाट जायच्या.

ज्येष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी, आपल्या ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ या पुस्तकात लिहितात

“मुंबईच्या माजी मनसे आमदारानं मला आपला अनुभव सांगितला, ‘एका टोलनाक्यावर मी निदर्शनासाठी ३००० समर्थक गोळा केले होते. मात्र त्या भागाच्या अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांनी मला आपली राजसाहेबांशी चर्चा झाली असून आंदोलन गुंडाळायला सांगितलं. जेव्हा मी राजसाहेबांशी बोललो तेव्हा त्यांनी मला सबुरीचा सल्ला दिला.”

२०१२ मधलं हे आंदोलन काही महिन्यांनी पूर्णपणे शांत झालं.

मात्र २०१४ मध्ये राज यांनी पुन्हा टोलचा मुद्दा उचलून धरला, मनसेनं पुन्हा एकदा टोलविरोधी आंदोलन छेडलं.

तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिला, ‘राज्यातल्या कुठल्याही टोल नाक्यांवर टोल भरू नका. कुणी आडवं आलं तर तुडवून काढा.’

त्यांच्या या आदेशानंतर मात्र राज्यातील वातावरण पेटलं. मनसे कार्यकर्त्यांनी अनेक टोल नाक्यांची तोडफोड केली. वाशी, ठाणे, कारेगाव, घोडबंदर, ऐरोली, डोंबिवली, कल्याणमधले टोलनाके फुटले. मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

यानंतर १२ फेब्रुवारीला थेट राज ठाकरेंनाच वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणात अटक करण्यात आली. त्याच दिवशी त्यांनी राज्यभरात रास्ता रोको करण्याचा आदेश दिला होता, राज स्वतः आंदोलनाचं नेतृत्व करणार होते, मात्र त्यांच्या अटकेमुळं वातावरण बदलून गेलं. संध्याकाळी राज यांना जामीन मिळाला, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं आणि राज्यातला तणाव निवळला.

पुढे मनसेकडून टोलच्या विषयाचा उल्लेख झाला, मात्र २०१४ सारखं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं नाही.

२०१४ मध्ये आघाडी सरकारनं मुंबईबाहेरचे ४४ टोल नाके बंद केले, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं युतीचं सरकार आलं तेव्हा त्यांनी १२ मोठे टोलनाके बंद केले. राज ठाकरे यांनी आपल्या एका भाषणात दावा केला की महाराष्ट्रातले ६० हून अधिक टोलनाके बंद झाले.

मात्र त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पुन्हा टोलवसुली सुरू झाली, जी आजही सुरूच आहे. मनसेनं आपल्या ब्लू प्रिंटमध्ये टोलचा मुद्दा मांडला होता, पण तोही नंतर मागे पडला.  

मनसेनं धडाक्यात आंदोलन सुरू केलं खरं, पण ते त्यांना पूर्णत्वास नेता आलं नाही, अशी टीका त्यांच्यावर अनेकांकडून करण्यात आली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.