बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेनं काय कमावलं, काय गमावलं…

राज्यातल्या राजकारणातलं वादळ अजून तरी शांत झालेलं नाही. एकनाथ शिंदेंच्या गटात ४५ पेक्षा जास्त आमदार असल्याची चर्चा सुरू आहे. दुसऱ्या बाजूला ते विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून आपला गटच  अधिकृत शिवसेना असल्याचा दावा करतील असंही बोललं जातंय.

या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावरचा मुक्काम हलवला आणि ते पुन्हा मातोश्रीवर गेले. त्याआधी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत भाष्य केलं.

त्यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘माझ्यावर टीका होते की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. मधल्या काळात जे काही मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनं दिलंलं हे कृपा करुन लक्षात ठेवा.’

त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हे पाहिलं पाहिजे की बाळासाहेबांच्या निधनानंतर राजकीय पटलावर शिवसेनेचं काय झालं..?

१७ नोव्हेंबर २०१२ ला शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. त्यानंतर शिवसेनेची सर्व सूत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती आली. त्यांच्या पुढचं पहिलं मोठं आव्हान होतं ते म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुका. बाळासाहेब नसताना होणाऱ्या या राज्यातल्या पहिल्याच मोठ्या निवडणुका होत्या, त्यात २००९ च्या निवडणुकीप्रमाणं राज ठाकरे पुन्हा करिष्मा दाखवणार का? याचीही चर्चा होती.

त्याआधी लोकसभेत काय झालं बघुयात. देशभरात मोदी लाट होती, लोकसभेत भाजपनं प्रचंड बहुमत मिळवलं. शिवसेनेनं लोकसभेच्या २० जागा लढवल्या आणि त्यातल्या १८ जागांवर विजयही मिळवला. केंद्रात शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली.  

त्याच आधारावर भाजपनं विधानसभा निवडणुकांवेळी राज्यात शिवसेनेसोबत असलेल्या युतीमध्ये आणखी जागांची मागणी केली. जागावाटपाची बोलणी वारंवार फिस्कटली आणि अखेर शिवसेनेनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. युती तुटली…

या निवडणुकीत सेनेनं तब्बल ६३ आमदार निवडून आणले, २००९ च्या निवडणुकांपेक्षा सेनेच्या जागांमध्ये १८ ने वाढ झाली. भाजपला स्पष्ट बहुमत नसल्यानं त्यांना सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत घेणं गरजेचं होतं. तेव्हा भाजप आणि शिवसेनेनं युती केली आणि एकत्र येत सरकार स्थापन केलं. फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेकडे पाच कॅबिनेट मंत्रीपद होती.    

त्यानंतर महत्त्वाची निवडणुक होती, ती २०१७ ची मुंबई महानगर पालिका. शिवसेनेचं मुख्य बलस्थान म्हणजे मुंबई महानगर पालिकेतली सत्ता, त्यामुळं ती गमावून चालणारच नव्हतं. 

२०१७ च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं ८४ जागांवर यश मिळवलं. मागच्या निवडणुकांपेक्षा नऊ नगरसेवक जास्त निवडून आले. मात्र बहुमत नसल्यानं शिवसेनेला एकट्याच्या जोरावर सत्ता स्थापन करणं कठीण होतं. मात्र तरीही सेनेनं आपला महापौर बसवला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा लढवणाऱ्या शिवसेनेनं १८ जागांवर यश मिळवलं आणि पुन्हा केंद्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. यावेळी मात्र सेना आणि भाजपमध्ये प्रचंड कुरबुरी झाल्या, टीकांचे बाण इकडून-तिकडून आले. तरीही २०१९ च्या निवडणुका सेना आणि भाजपनं एकत्र लढवल्या.

शिवसेना १२४ जागांवर लढली, तर भाजपनं १५२ जागा लढवल्या. २०१७ च्या निवडणुकांपेक्षा शिवसेनेच्या सात जागा कमी निवडून आल्या आणि त्यांना ५६ जागांवरच यश मिळालं. वरळी मतदार संघातून आदित्य ठाकरे निवडून आले, निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातले पहिले नेते ठरले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर मात्र राज्याच्या राजकारणानं अनेक वेगवेगळी वळणं पाहिली…

भाजप आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. मुख्यमंत्री पदावरुन बरंच घमासान झालं आणि अखेर राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. भिन्न विचारसरणी असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सेनेनं किमान समान कार्यक्रमाच्या आधारानं आघाडी केली. कालांतरानं शिवसेना भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीएमधून बाहेर पडली.

मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हा नक्की होतं. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नावाची मोठी चर्चा झाली, मात्र शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रं घेतली. 

ठाकरे घराण्यातली दोन नावं या सगळ्याच्या निमित्तानं प्रत्यक्षपणे सत्तेच्या वर्तुळात सामील झाली. या सरकारमध्ये शिवसेनेकडे १० कॅबिनेट मंत्रीपदं आहेत.   

त्यानंतर गाजतंय ते एकनाथ शिंदेंचं बंड…

शिवसेना शाखाप्रमुखापासून सुरुवात करत एकनाथ शिंदेंनी नगरसेवकापासून विरोधी पक्षनेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री असा प्रवास केला होता. राजकारणातल्या प्रवेशापासून एकनाथ शिंदे सेनेतच आहेत. शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांचे पट्टशिष्य म्हणून ते ओळखले जातात. सध्याच्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आहे, ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे ते पालकमंत्रीही आहेत.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला अतिरिक्त खासदार निवडून आणण्यात अपयश आलं. विधानपरिषदेत सेनेचे दोन्ही आमदार निवडून आले, मात्र दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. सुरुवातीला त्यांच्यासोबत १३ आमदार असल्याचं सांगितलं गेलं, तर आता हा आकडा जवळपास ४५ पर्यंत गेल्याचं सांगण्यात येतंय.

सोबतच एकनाथ शिंदेंकडे दोन तृतीयांश आमदार असल्यानं ते थेट पक्षावर आणि शिवसेनेचं चिन्ह असणाऱ्या धनुष्यबाणावर दावा ठोकतील अशा चर्चा सुरू आहेत. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही वर्षा बंगल्यावरचा आपला मुक्काम हलवत मातोश्री गाठलं आहे.

एकंदरीत पाहायचं झालं तर, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेनं स्वबळावर विधानसभेत यश मिळवलं, मुंबई महानगरपालिकाही आपल्याकडे कायम ठेवली. सगळ्यात मोठं यश त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन मिळवलं. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले… मात्र आता एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं शिवसेनेची पुढची दिशा काय असणार यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.