पेगासस प्रकरणाची तुलना वॉटरगेट प्रकरणासोबत केली जातेय, काय होतं वॉटरगेट..?
पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील ३०० हून अधिक मोबाईल नंबरवर पाळत ठेवण्यात आली आहे. यामध्ये ४० हून अधिक लोक हे पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते, सरकारी अधिकारी, संविधानिक पदावर असणारे लोक आहेत.
फ्रान्सच्या Forbidden Stories आणि एमनेस्टी इंटरनॅशनल यांनी मिळून ही माहिती बाहेर काढली. या माहितीला पेगासस प्रोजेक्ट अस नाव देण्यात आलं आहे. यावरूनच सध्या मोदी सरकारवर टिका करण्यात येत आहे.
जेष्ठ वकिल प्रशांत भूषण यांनी या प्रकरणाचा उल्लेख मोदी वॉटरगेट असा केला आहे. साहजिक या प्रकरणाची चर्चा आत्ता अमेरिकेच्या सुप्रसिद्ध वॉटरगेट प्रकरणासोबत करण्यात येवू लागलेय. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपतींचा वॉटरगेट प्रकरणात सहभाग होता, यावरून त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.
काय होतं हे वॉटरगेट प्रकरण…?
तर पैसा हा कोणत्याही चोरी किंवा दरोड्यामागचा मुख्य उद्देश असतो. कधी सोने नाणे तर कधी प्रॉपर्टी चे पेपर्स यासाठीच दरोडे पडतात. वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार बॉब वूडवर्डस जेव्हा १८ जून १९७२ च्या दिवशी नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामकाजाचे रिपोर्टींग करण्यासाठी न्यायालयात हजर झाला तेव्हा त्यालाही तशीच अपेक्षा होती.
कारण आदल्या दिवशी म्हणजेच १७ जून १९७२ रोजी वॉशिंग्टनच्या वॉटरगेट कॉम्प्लेक्स मधील डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या (DNC) मुख्यालयावर दरोडा पडला होता.
दरोड्यातील सर्व पाच दरोडेखोर रंगेहाथ सापडले होते, आणि त्या सर्वाना दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात न्यायाधीशांनी जेव्हा ‘आपला व्यवसाय काय?’ असा प्रश्न त्या दरोडेखोरांना उद्देशून विचारला तेव्हा ‘मी पूर्वीचा CIA चा अधिकारी असल्याचे’ त्यातील एकाने अभिमानाने सांगितले.
आतापर्यंत शांतपणे कामकाज पाहत असलेला वूडवर्ड्स या उत्तराने एकदम चपापला. त्याच्या डोक्यात अचानक चक्रे फिरु लागली आणि काही गोष्टी त्याला स्पष्ट होऊ लागल्या. त्याच्या लक्षात आले कि हा एक नुसता दरोडा नाही तर देशाच्या आत्म्यावरचाच हल्ला आहे. एक महाभयानक संकट जे सगळ्या व्यवस्थेलाच गिळून टाकण्याचा धोका आहे.
स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे, जिथे स्वातंत्र्य नाही तिथे लोकशाही असूच शकत नाही तिथे फक्त त्या व्यवस्थेला लोकशाही व्यवस्था म्हणण्याचे बंधन असते. जेव्हा राज्य करणं हे आपलं कर्तव्य नसून तो आपला अधिकार आहे असं राज्यकर्त्यांना वाटू लागतं तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या स्वातंत्र्यावर आघात होऊ लागतात. अशा वेळी जे लोक, जी व्यवस्था अशा जुलमी सत्तेविरुद्ध उभी राहते, लढते आणि जिंकते ते देश महान बनणार हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नसते.
रिचर्ड निक्सन (१९१३-१९९४) हे अमेरिकेचे ३७ वे राष्ट्राध्यक्ष.
महायुद्धांनंतर १९५२ च्या निवडणुकीत जेव्हा आयसेनहॉवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा रिचर्ड निक्सन त्यांचे डेप्युटी म्हणजेच उप राष्ट्राध्यक्ष होते. त्यानंतर ते १९६० च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जॉन एफ केनेडी यांच्याविरुद्ध चुरशीच्या लढतीत ते पराभूत झाले. ज्या पराभवाचे खापर त्यांनी मिडियाच्या प्रचारावर फोडले. शेवटी १९६८ च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या ह्युबर्ट हम्फ्रे यांचा पराभव करून रिचर्ड निक्सन व्हाईट हाऊस मध्ये दाखल झाले.
मागची १६ वर्षे ते व्हाईट हाऊस च्या जवळ होते पण आत नव्हते ही बोच त्यांच्या मनात होती. सत्तेच्या सोपानावर चढता चढता ते इतक्या उच्च पदाला येऊन पोचले पण या प्रवासात ते कमालीचे संशयखोर बनले होते. सत्ता हातात आल्यावर त्यांनी डेमोक्रॅट्स, मिडिया, न्यायव्यवस्था आणि व्हिएतनामच्या युद्धाविरोधातील वाढत चाललेली चळवळ यांच्यावर एक प्रकारचे युद्ध लादले. त्यांची कारकीर्द म्हणजे ‘Power corrupts and absolute power corrupts absolutely’ या उक्तीचे चटकन दाखवता येणारे उदाहरण बनले.
१९७२ च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे रिचर्ड निक्सन यांची फेरनिवड झाली.
आणि त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी एका अधिकृत समितीचे गठन केले गेले, ती समिती म्हणजे Committe to Re-elect the President अर्थात CREEP .
एकदा निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला काहीही करता येते तर मग निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करायला काय हरकत आहे? अशा तत्वावर चालणारी ती समिती होती.
रिचर्ड निक्सन स्वतःच राष्ट्राध्यक्ष असल्याने FBI, CIA सारख्या राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या संस्थांना देखील या ‘Rat F***king ‘ (Dirty Tricks) साठी राबवण्यात येत असे. जॉन मिचेल हे अमेरिकेचे पूर्व Attorney General या CREEP चे प्रमुख होते.
ज्यांना हरवणे निक्सन याना बिलकुल जड गेले नाही. ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदी निवडून आले. नंतर FBI ने केलेल्या तपासात असे आढळले कि Cannuck letter हे एक बनावट पत्र होते आणि ते CREEP ने बनवले होते.
एक सामान्य दरोडा यापेक्षा जास्त दखल सुरुवातीला या प्रकरणाची कुणीच घेत नव्हते.
वॉशिंग्टन पोस्ट ने मात्र हे प्रकरण लावून धरले विशेषतः वूडवर्ड्स आणि कार्ल बर्नस्टीन या दोन पत्रकारांनी तर त्याचा पिच्छाच पुरवला.
निक्सनचा शपथविधी २० जानेवारी १९७३ ला होण्याअगोदरच त्यांना पहिला दणका बसला. जेम्स मॅकॉर्ड व इतर चार दरोडेखोरांना कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावल्या.
जेम्स मॅकॉर्ड ने न्यायाधीशांना पत्र लिहून अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा हात या दरोड्यामागे असल्याचे कबूल केले. एच आर हाल्डमन आणि जॉन एहरीचमन या व्हाईट हाऊस मधल्या अधिकाऱ्यांची नावेही कट रचनाऱ्यांच्यामध्ये आली.
जॉन डीन या निक्सन यांच्या कायदेविषयक सल्लागाराकडे हाल्डमन, एहरीचमन आणि कोलसन वगैरे व्हाईट हाऊस मधील अधिकाऱ्यांच्या बचावाचे काम होते. जॉन डीन याना या प्रकरणाची पूर्ण माहिती असतानाही त्यांनी खोटी माहिती FBI ला देऊन तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले. कटात सामील असल्याचे आरोप झाल्यानंतर व्हाईट हाऊस चे मुख्य अधिकारी एच आर हाल्डमन आणि निक्सन यांचे सल्लागार जॉन एहरीचमन याना आपला राजीनामा द्यावा लागला. तर जॉन डीन याना काढून टाकण्यात आले.
या प्रकरणातले हे सुरुवातीचे पण मोठे आणि व्हाईट हाऊस मधले बळी. व्हाईट हाऊस पासून हे प्रकरण चार हात लांबच ठेवण्याचा प्रयत्न करत असलेल्या सरकारला या ठिणगी ची प्रचंड भीती वाटू लागली.
मे १९७३ मध्ये अमेरिकन सिनेट ने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ‘सिनेट वॉटरगेट कमिटी’ स्थापन केली. सॅम आयर्विन यांच्या नेतृत्वाखाली हि समिती काम करणार होती. अखेर जॉन डीन यांनी निक्सन यांच्याभोवती बनवण्यात आलेला लोखंडी पडदा तोडला आणि आपण निक्सन यांच्याबरोबर वॉटरगेट प्रकरण दडपण्यासंदर्भात अनेक वेळा चर्चा केली असल्याचे आणि निक्सन यांचाही या प्रकरणात हात असल्याचे चौकशी समितीसमोर सांगितले.
आणि या प्रकरणात एक मोठा बॉम्बस्फोट झाला. खुद्द राष्ट्राध्यक्षांचे हातही या दरोड्यात बरबटले असल्याचे कळताच एक मोठा धक्का सामान्य माणसाला बसला.
निक्सन यांनी अपेक्षित असल्याप्रमाणेच सर्व आरोप झिडकारले. व्हाईट हाऊस मध्ये केले गेलेले सर्व फोन कॉल्स सुरक्षिततेच्या कारणास्तव रेकॉर्ड करण्यात येत. अशी व्यवस्था १९७१ पासून निक्सन यांच्याच कारकिर्दीत सुरु झाली होती. सिनेट कमिटी ने ते रेकॉर्डस् समितीसमोर सादर करायला सांगितले जे करण्यास निक्सन यांनी नकार दिला.
निक्सन याना वॉटरगेट इथल्या दरोड्याची पूर्वकल्पना होती कि नाही याबद्दल मतभेद आहेत. पण हे प्रकरण दडपण्यासाठी मात्र त्यांनी खूप प्रयत्न केले हे वादातीत आहे. अमेरिकन लोकशाहीसाठी हे प्रकरण म्हणजे एक कलंक होता.
निवडणूक जिंकण्यासाठी एक विरोधी पक्षाच्या कार्यालयात घुसून त्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करणे आणि वर सत्तेचा गैरवापर करून त्या महापापावर पडदा टाकणे अशा लोकशाहीच्या क्रूर चेष्टेला ती फक्त त्या देशातील सर्वात प्रभावी आणि लोकनियुक्त माणसाने केली म्हणून माफी मिळाली असती तर काळ सोकावला असता. त्यामुळे अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्ह ने निक्सन यांच्याविरोधातील महाभियोगाचा (Impeachment) प्रस्ताव दाखल करून घेतला आणि निक्सन याना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवण्याची तयारी चालू झाली.
कालपर्यंत राष्ट्राध्यक्षांचे सहकारी आणि म्हणूनच अमेरिकेतील अतिशय ताकदवान समजले जाणारे चार्ल्स कोलसन, जॉन डीन हे चौकशीत दोषी आढळले त्यांना अटक करण्यात आली. गॉर्डन लिडी, हॉवॉर्ड हंट, यांनाही तुरुंगाचा रस्ता दाखवला गेला.
मार्च १९७४ : निक्सन यांच्या सात सहकार्यांना कोर्टाने दोषी ठरवले…
‘आपल्या प्रशासनाने CIA चे डिरेक्टर रिचर्ड हॅम्स आणि व्हर्नोन वॉल्टर्स यांना विनंती करून त्यांच्याकडून FBI चे प्रमुख पॅट्रिक ग्रे यांना सांगावे कि हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने तुम्ही वॉटरगेट प्रकरणाचा तपस थांबवावा.’
निक्सन यांच्या आज्ञेप्रमाणेच या गोष्टी दडपण्याचा काम चालू होते हे स्पष्ट झाले होते.
अखेर ९ ऑगस्ट १९७४ ला रिचर्ड निक्सन यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
अमेरिकेच्या लोकशाही व्यवस्थेच्या जवळजवळ २०० वर्षाच्या इतिहासात इतक्या मानहानीकारकपणे आपला राजीनामा देऊन पायउतार झालेले रिचर्ड निक्सन हे एकमेव राष्ट्राध्यक्ष. रिचर्ड निक्सन यांनी काही आपला राजीनामा नैतिक जबाबदारी वगैरे घेऊन दिला नाही तर त्यांना तो द्यावाच लागला.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाविरोधात महाभियोग मंजूर होणे हि अतिशय अवघड गोष्ट आहे, त्यासाठीच्या घटनात्मक तरतुदी अतिशय कठोर आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज मध्ये साधे बहुमत (जे शक्य आहे) तर सिनेटमध्ये २/३ बहुमतानेच राष्ट्राध्यक्षाविरुद्धचा महाभियोग संमत होऊ शकतो.
यापूर्वी १८६८ मध्ये अँड्र्यू जॉन्सन विरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हजने संमत केलेला महाभियोग सिनेटने उधळून लावला होता आणि नंतर एकदा बिल क्लिंटन यांच्या बाबतीतही हेच घडले होते. कारण सिनेट मध्ये दोन तृतीयांश सदस्य एकाच पक्षाचे असणे हि अतिशय अवघड गोष्ट आहे आणि ती विरोधी पक्षाची असणे तर केवळ अशक्यच. त्यामुळे राष्ट्राध्यक्षाला हटवायचे तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सुद्धा विरोधी पक्षाने आणलेल्या महाभियोगाला अनुमोदन देणे गरजेचे असते. आणि पक्षीय राजकारणात आणि तेही अमेरिकेसारख्या द्विपक्षीय व्यवस्थेत एवढे मोठे फेरबदल होणे आणखीनच कठीण.
डेमोक्रॅटिक पक्षाकडे निक्सन यांच्याविरोधात ५५ सिनेटर्स होते आणि निक्सन विरुद्धचा महाभियोग संमत व्हायला एकूण ६७ सदस्य लागणार होते रिचर्ड निक्सन विरोधात जो महाभियोग चालला होता, त्यासाठीचे त्यांच्यावरचे आरोप खूप गंभीर होते.
न्यायप्रक्रियेला खीळ मारणे, सत्तेचा गैरवापर करणे आणि कायदेमंडळाचा अपमान करणे यांसारखे आरोप त्यांच्यावर होते. निक्सन यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा गुन्हा लोकशाही व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालणारा होता.
९ ऑगस्ट १९७४ : रिचर्ड निक्सन यांचा राजीनामा
त्यामुळे १९७४ च्या ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात रिपब्लिकन पक्षाच्या काही सिनेटर्सनी निक्सन याना सांगितले कि तुमच्या विरुद्धचा महाभियोग सिनेट मध्ये आल्यास आम्ही तुम्हाला वाचवू शकणार नाही. तुम्हाला पदभ्रष्ट करण्यास पुरेसे संख्याबळ तुमच्याविरुद्ध आहे त्यामुळे पुढे महाभियोग चालला असता तरी निक्सन यांची गच्छंती अटळ होती. आणि हे स्पष्ट झाल्यावरच त्यांनी राजीनामा दिला.
आतापर्यंत अमेरिकेत कधीच महाभियोगाने एखाद्या राष्ट्राध्यक्षाला पायउतार व्हावे लागले नाही पण निक्सन याना मात्र जावेच लागले असते. पुढे तेव्हाचे उप राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड अमेरिकेचे ३८ वे राष्ट्राध्यक्ष झाले. आणि एक महिन्याच्या आत जेराल्ड फोर्ड यांनी रिचर्ड निक्सन याना ‘त्यांच्या काळात त्यांच्याकडून झालेल्या सर्व गुन्ह्यांसाठी पूर्ण आणि बिनशर्त माफी ‘आपल्या विशेषाधिकारात दिली. पण सर्वांनाच अशी कवचकुंडले नव्हती, वॉटरगेट प्रकरणात एकूण ६९ व्यक्तींवर आरोपपत्र ठेवण्यात आले त्यापैकी ४८ जणांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावण्यात आल्या.
निक्सन यांनी नेहमीच आपले विरोधक, मीडिया आणि लोकशाही संस्थांना शत्रू मानले, त्यांच्यावर ते शत्रूवत हल्ले करत राहिले. पण अखेर बॉब वूडवर्डस आणि बर्नस्टीन सारखे पत्रकार, वॉशिंग्टन पोस्ट सारखे निर्भीड दैनिक, सॅम आयर्विन सारखे डेमोक्रॅटस म्हणजे याच विरोधक, मीडिया आणि न्यायव्यवस्था यांनीच निक्सन यांना बुडवले.
एका देशाला काही सत्तापिपासू लोकांच्या हातातील खेळणे बनण्यापासून त्यांनी वाचवले, एका कडेलोटापासून वाचवले. अमेरिकन संविधान तीन मूलभूत अधिकारांचा उल्लेख करते. हे तीन मूलभूत अधिकार निर्मात्यानेच सर्व मानवांना दिले आहेत. आणि ते कुणालाही काढून घेता येत नाहीत. आणि सरकारने त्या अधिकारांचे रक्षण करणे हेच त्यांचे काम आहे.
ते तीन मूलभूत अधिकार म्हणजे ‘Life, Liberty & Pursuit of Happiness’ वॉटरगेट प्रकरण म्हणजे त्यातल्या दुसऱ्या मूलभूत अधिकारावरचा घाला होता. तो टळला हे बरे झाले कारण Life किंवा Pursuit of Happiness हे Liberty शिवाय निरर्थक आहेत. ..
हे ही वाच भिडू
- ट्रम्प तात्यांच्या विरोधी उमेदवाराचं चिन्ह गाढव का यामागे पण एक किस्सा आहे !
- आजच्याच दिवशी मार्टिन ल्युथर किंग म्हणाला होता, I have a Dream
- हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांमुळे प्रतिसरकारच्या नागनाथअण्णांना अटक झाली होती.