3 दिवस, 3 देश, 8 नेते अन् 25 बैठका ; असा पार पडला मोदींचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचं जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रांस या तीन देशांचा विदेश दौरा आज संपला. नरेंद्र मोदींनी आजपर्यंत ६४ देशांना भेटी देऊन ११६ परदेश दौरे केले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक दौऱ्याची चर्चा झाली आहे. मोदी देशांच्या राष्ट्र्पतींशी काय बोलले याची होती तेवढीच चर्चा त्यांची त्या देशातल्या त्यांच्या  भारतीय लोकांशी भेटण्याची, तिथं केलेल्या इव्हेंटची, त्यांना मिळालेल्या गिफ्टची होते.

या ३ देशांच्या दौऱ्यात या सर्व गोष्टी घडल्या. पण त्याचबरोबर दोन देशांच्या प्रमुखांदरम्यान जो संवाद झाला त्यातून दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवणाऱ्या गोष्टीही झाल्या. त्यामुळं पंतप्रधानांनी या तीन देशांच्या तीन दिवसात काय केलं याचा दिनक्रम समजून घेऊ आणि त्याचबरोबर या दौऱ्यात युरोपातल्या या प्रमुख देशांशी नक्की कोणत्या वाटाघाटी झाल्या हे बघू.

पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरवात झाली जर्मनी पासून. 

भारत आणि जर्मनी यांचे बरेच जुने आणि मजबूत असे द्विपक्षीय संबंध होते. दुसऱ्या महायुद्धानंतर फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत होता.

त्याचबरोबर युरोपियन युनियनमधील महत्त्वाच्या भूमिकेमुळे जर्मनी हा युरोपमधील भारताचा सर्वात महत्त्वाचा भागीदार आहे.

त्यामुळं भारताच्या पंतप्रधानांचा जर्मनी दौरा नेहमीच महत्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बर्लिनमध्ये आगमन झाल्यानंतर अनिवासी भारतीयांनी त्यांचे स्वागत केलं. त्यांनी जर्मन राजधानीत भारतीय डायस्पोराशी संवाद साधला. त्याचवेळी तिथल्या बारक्या पोरांनी मोदींना काही गिफ्ट्स दिले. एकाने गाणं म्हणून दाखवालं. आणि हा सगळं प्रसंग अक्षय कुमार, विवेक अग्निहोत्री या सर्वांनी ट्विट केला.

भारतीय लोकांशी भेटीगाठी झाल्यांनतर पंतप्रधान मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली.

WhatsApp Image 2022 05 06 at 11.30.57 AM 5
source- PMO India

आत या दोघांमध्ये काय चर्चा झाली याची परराष्ट्र मंत्रालयाने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे होती. दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये द्विपक्षीय सहकार्य, धोरणात्मक भागीदारी, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडी यांच्यावर चर्चा झाली असं मंत्रालयानं सांगितलं. 

अशा वाक्यातून काय सेन्स लागत नाही पण परराष्ट्र संबंधांची भाषा अशीच असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं मग आपण दोघांच्या बोलण्यातनं कामाचं काय निघाला. या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी ९ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. ग्रीन एनर्जी, शाश्वत विकास, हायड्रोजन टास्क फोर्स आणि वनसंवर्धन यासह अनेक मुद्द्यांचा समावेश आहे.

जर्मनीने २०३० पर्यंत १० अब्ज युरोची अतिरिक्त विकास मदत देऊन भारताच्या हरित विकास योजनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 

आता या ग्रीन विकासाचे उदाहरण द्यायचे झाल्यास या निधीतून २०३० पर्यंत जर्मनी भारतीय रेल्वेचं कार्बन इमिशन झिरोवर आणण्यासाठी मदत करेल.

दुसरा महत्त्वाचा करार झाला दोन्ही देशांमधील रोजगार, उच्च शिक्षण आणि प्रोफेशनल्सची देवाणघेवाण करण्यावर. जर्मनी ऑटोमोबाइल क्षेत्रात बाप आहे त्यातच भारतातून जर्मनीत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळं हे करार महत्वपूर्ण आहेत.

त्यांनतर नरेंद्र मोदींनी जर्मनीतल्या भारतीयांपुढं भाषण केलं.

“मला तुमच्याशी करोडो भारतीयांच्या क्षमतांबद्दल बोलायचे आहे आणि त्यांचे गुणगान करायचे आहे. मी जेव्हा करोडो भारतीयांबद्दल बोलतो तेव्हा त्यात फक्त भारतात राहणारे लोकच नाहीत तर इथे  जर्मनीत राहणारे लोकही येतात.”

असं म्हणत मोदींनी जर्मनीतल्या भारतीयांना साद घातली. त्यानंतर मग त्यांनी डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपनहेगनकडे प्रस्थान केलं.

डेन्मार्कमध्ये आल्यावर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती मोदींच्या ढोल वाजवण्याची.

तिथं मोदींचं स्वागत एका ढोलपथकानं केलं, मोदींनी स्वतः देखील ढाल वाजवला आणि याचीच चर्चा जास्त झाली.

 

या दौऱ्याचा अजून एक हायलाइट होता तो म्हणजे इंडिया-नॉर्डिक समिट. पंतप्रधान नरेंद्र मोदी  डेन्मार्कमधील दुसर्‍या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला उपस्थित राहिले ज्यात प्रामुख्याने करोनानंतरची अर्थव्यवस्था, हवामान बदल, अक्षय ऊर्जा आणि जागतिक सुरक्षा या मुद्यांवर चर्चा झाल्या. या शिखर परिषदेत डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड, नॉर्वे आणि स्वीडनच्या पंतप्रधानांचा सहभाग होता.

WhatsApp Image 2022 05 06 at 11.30.57 AM 2
source- MEA twitter handle

नॉर्डिक पंतप्रधानांनी रशियन सैन्याने युक्रेनवर केलेल्या  बेकायदेशीर आक्रमणाचा तीव्र निषेध केला. भारतानाही कोणत्या रशिया आणि युक्रेन अशी साइड नं घेता युद्धाला आमचा विरोध असल्याची भूमिका कायम ठेवली. तसेच आर्टीक देशांशी संबंध वाढवण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण होती.

डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्याशी मोदी यांनी केलेल्या वन टू वन चर्चेचे फोटोही चांगलेच व्हायरल झालं. 

WhatsApp Image 2022 05 06 at 11.30.57 AM
source- MEA twitter handle

या चर्चेची माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं की त्यांनी डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांच्याशी “प्रोडक्टीव्ह चर्चा” झाली. त्यानंतर डेन्मार्कच्या राजघराण्याबरोबर पंतप्रधान मोदी यांनी स्पेशल लंच देखील केला.

या एक दिवसाच्या भेटीत मोदींनी दिलेल्या नॉर्डिक देशाच्या पंतप्रधानांना दिलेल्या भेटवस्तूंची जोरदार चर्चा झाली. 

उदाहरणार्थ पंतप्रधानांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांना कच्छ एम्ब्रॉयडरी असलेली भित्तिकाम गिफ्ट दिलं. डेन्मार्कमध्येही पंतप्रधान मोदींनी तिथल्या भारतीयांशी संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधानांनी तिथल्या भारतीयांना किमान पाच गैर-भारतीय मित्रांना भारत भेटीवर आणण्याचं आवाहन केलं. तसेच मोदींनी इंडिया-डेन्मार्क बिझनेस फोरमला देखील संबोधित केलं.

त्यानंतर मोदींनी त्यांचे ‘ डिअर फ्रेंड ‘ फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष एमॅनुअल मॅक्रॉन यांची भेट घेण्यासाठी  पॅरिसची वाट धरली.

मोदी फ्रांसमध्ये आल्यानंतर इथंही भारतीय समुदाय मोदींच्या स्वागतासाठी आला होता. त्यानंतर पॅरिसमधील एलिसी पॅलेस इथं एमॅनुअल मॅक्रॉन यांनी मोदींचे जोशात स्वागत केले. 

WhatsApp Image 2022 05 06 at 11.30.57 AM 4
source- MEA twitter handle

दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष  झालेल्या इमॅनुअल मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले. दोन्ही देशांदरम्यान आधीपासूनच असेलल्या मजबुत स्ट्रॅटेजिक संबंधांना यावेळी  उजाळा देण्यात आला. त्याचबरोबर रशिया युक्रेन मधील संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त पावलं उचलण्यावरही दोघांचं एकमत झालं.

आणि मग यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपला तीन दिवसीय दौरा आटोपता घेतला. जाणकारांच्या म्हणण्यासानुसार मोदींच्या दौऱ्याचं टायमिंग खूप महत्वाचं आहे. युरोप सध्या त्यांचा पारंपारिक पार्टनर असलेला अमेरिका आणि त्याचबरोबर युरोप चीनपासूनही अंतर राखून आहे. त्यामुळे भारताबरोबर संबंध वाढवण्यासाठी हे देश उत्सुक आहेत. त्यामुळं जरी मोठे करार झाले नसले तरी मोदींच्या या दौऱ्याला महत्व होतं.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.