त्या मध्यरात्री ताज हॉटेल मध्ये झीनत अमान बरोबर नेमकं काय घडलं होतं ?

३ नोव्हेंबर १९७९ ची थंड मध्यरात्र. मुंबईच्या सुप्रसिद्ध वरळी सी-फेस जवळ एक काळी मर्सिडीज थांबली होती. त्या कार मध्ये दोन तरुणी होत्या. एकीच्या चेहऱ्याला खूप माराचे व्रण होते. एक डोळा सुजून बंद झालेला होता. अंगावर रक्ताचे डाग होते. गाडीत मोठ्याने सुरु असलेल्या गाण्याबरोबर समुद्राकडे बघत गात होती,

वातावरणात शांतता होती. दोघी एकमेकींसोबत देखील बोलत नव्हत्या. त्याच वेळी अचानक तीने गायला सुरवात केली..

“आय विल सर्व्हाइव्ह”

तीचं नाव झीनत अमान आणि तिच्या सोबत होती सुप्रसिद्ध पत्रकार शोभा डे.

त्या दिवशी झीनत अमानला नेमकं झालेलं तरी काय ?

भारताची पहिली सेक्सबॉम्ब म्हणून ओळखली जाणारी झीनत अमान ही सुरवाती पासून बिनधास्त होती. भोपाळच्या राजघराण्यातले अमानुल्ला खान आणि मराठी वर्धिनी करवास्ते या दांपत्याच्या पोटची ही पोरगी अमेरिकेत शिक्षण घेऊन भारतात आली होती. आल्या आल्या मिस इंडिया स्पर्धेत तिने भाग घेऊन तिथे दुसरा नंबर पटकावला होता. पुढे भारतासाठी मिस एशिया पॅसिफिक स्पर्धा जिंकली. मॉडेलिंगमुळ ती फेमस झालेली.

अनेक प्रोड्युसर तिला सिनेमामध्ये घेण्यसाठी तडफडत होते. काही छोटे मोठे रोल सुद्धा तिने केले. पण तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये खरा ब्रेक देवानंदच्या बहिणीच्या रुपात हरे रामा हरे कृष्णा मधून मिळाला. हरे रामा हरे कृष्णा मधल्या दम मारो दम या गाण्याने पब्लिकला वेड लावले.

सभ्य सुसंस्कृत हिरोईनच्या काळात तिने धडाक्यात एन्ट्री घेतली होती. झीनत अमानच्या आधी फक्त खलनायिकाच बोल्ड असायच्या. पण मुख्य हिरोईन ही सुद्धा सेक्सी असू शकते हे झीनत मुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीला कळाले. डॉन, धरमवीर, ग्रेट गँम्बलर अशा अनेक सुपरहिट पिक्चरमध्ये ती दिसली. प्रत्येक फिल्म मॅग्झीनच्या कव्हरवर फक्त आणि फक्त तिचेच फोटो झळकू लागले.

आणि आला सत्यम शिवम सुंदरम…

अख्ख्या भारताला या सिनेमाने हलवून सोडले. “भोर भये पनघट पे मोहे नटखट शाम सताये” म्हणत पहिल्यांदा झीनत गांव की गोरी झाली होती. पण राज कपूरने धबधब्यात अंघोळ करणारी झीनत पडद्यावर अशी चितारली की पाहणाऱ्याचे होशच दंग झाले. झीनत अमान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली.

जीनत अमान

मॉडर्न बिनधास्त असलेल्या झीनतच नाव तिच्या नायकांबरोबर जोडलं गेलं नसत तर नवल. अमिताभ पासून देवानंद, राज कपूर पर्यंत तिच्या अफेअरच्या खमंग चर्चा मिडिया मध्ये चघळण्यात येत होत्या.

इतक्यात एक दिवस बातमी आली की झीनत आणि अभिनेता संजय खान यांनी गुपचूपरित्या लग्न केले आहे.

संजय खानच हे दुसर लग्न होतं. त्याला तीन मूलं देखील होती. तरी झीनत त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्या दोघांच्या अब्दुल्ला या चित्रपटाच शुटींग सुरु होत. याच्या बरोबरच संजयच्याच भावाचा फिरोज खानचा कुर्बानी बनत होता. झीनत या सुद्धा पिक्चरमध्ये मुख्य भूमिकेत होती. अब्दुल्लाचे शुटींग संपत आलं आणि का कुणास ठाऊक संजयशी तिचे वाद सुरु झाले.

अब्दुल्लाच पॅकअप झालं होत, झीनत अलीबाबा चाळीस चोर च्या शुटींगसाठी लोणावळ्यामध्ये होती. अचानक तिला संजयचा फोन आला की अब्दुल्लाचे काही सीन शूट करायचे आहेत लगेच ये. सगळ शुटींग तरी संपल होत तरी संजय का बोलावतोय याच आश्चर्य वाटून ती त्याला भेटायला मुंबईला आली. तेव्हा तिला कळाल की संजय ताज हॉटेल मध्ये पार्टी करतोय.

झीनत त्याला भेटायला ताज मध्ये गेली.

रात्रीचे साडे नऊ वाजले होते. तिला पाहताच दारूच्या नशेमध्ये असलेल्या संजय खानने तिला शिवीगाळ सुरु केली. तिच्या चारित्र्यावर शंका घेऊन संजय झीनतशी वाद करत होता. अचानक त्याने तिला मारायला सुरवात केली. हॉटेलमध्ये हजर असलेल्या अनेकांच्या पुढे हा तमाशा सुरु होता. भारताच्या आघाडीच्या या अभिनेत्रीला पशु प्रमाणे मारहाण झाली. तिला उचलून फेकण्यात आलं. शीघ्रकोपी संजयला अडवायचं धाडस तिथं असलेल्या कोणीही केलं नाही.

बॉलीवूडच्या इतिहासातला हा सर्वात किळसवाणा असा प्रसंग होता.

तेवढ्यात तिथे त्याची पहिली पत्नी झरीन खान आली. झरीन ने त्याला थांबवायचं सोडून तिनेही झीनतला मारहाण केली. झीनतचे हातपाय काळेनिळे झाले. कशी बशी तिने तिथून सुटका करून घेतली आणि ती तिच्या घरी आली.

स्टारडस्ट मासिकाची संपादक असणाऱ्या शोभा डे ने तिला रात्री फोन केला. झीनत तिला भेटायला आली. तिचा चेहरा ओळखू न येण्या इतपत सुजला होता. थोडी शँम्पेन घेतल्यावर तिच्या जीवात जीव आला. दोघी वरळी सी-फेस वर आल्या. एवढ सगळ घडूनही झीनतमधली कणखर स्त्री मोडली नव्हती.

उधानलेल्या वाऱ्यासोबत ती समुद्रकाठावर गाणं म्हणत होती,

“आय विल सर्व्हाइव्ह”

काही दिवसातच संजय खान आणि झीनतचा तलाक झाला. तिच्या एका डोळ्यावर या क्रूर प्रसंगाची खुण कायमची राहिली. अब्दुल्ला हिट झाला. कुर्बानी सुपरहिट झाला. “आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये तो बात बन जाये”  हे झीनतच गाण सुपरहिट झालं. झीनत खरोखरच सर्व्हाइव्ह झाली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.