ज्या अडचणीत हेमंत सोरेन सापडलेत, अगदी तसाच गेम वडील शिबू सोरेन यांचाही झाला होता…
आपल्या भारतात सत्ता एकाच घराण्याच्या हातात असणं ही गोष्ट काही नवीन नाही. आपल्याकडचा घराणेशाहीचा इतिहास प्रचंड जुनाय. अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा, हे पिक्चरमध्ये ऐकायला ठीक वाटत असलं, तरी देशातल्या ७ राज्यांचे मुख्यमंत्री हे माजी मुख्यमंत्र्यांचेच पुत्र आहेत. ही घराणी एखाद्या राज्यातल्या सगळ्या सत्तेची सूत्र आपल्या हातात घेऊ शकतात, मात्र कधीकधी त्यांच्या साम्राज्याला असा हादरा बसतो, ज्यातून सावरायला हिंमत लागते.
आपण बोलतोय ते झारखंडच्या राजकारणाविषयी. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वातलं महागटबंधन सरकार कोसळण्याच्या चर्चा सुरू आहेत. याचं कारण आहे, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर होत असलेले आरोप, त्यांची रद्द झालेली आमदारकी आणि ते राजीनामा देतील अशी चर्चा.
झारखंडच्या राजकारणात सरकार कोसळणं ही काही नवी गोष्टी नाही. २००० साली राज्याची निर्मिती झाल्यापासून झारखंडनं ६ मुख्यमंत्री आणि ११ सरकारं पाहिली, मात्र फक्त एकाच सरकारला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलाय.
झारखंडचं हे राजकारण ज्या मोजक्या नावांभोवती फिरतं त्यातलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे, शिबू सोरेन उर्फ गुरुजी.
झारखंडचे तीनदा मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, सध्या राज्यसभा सदस्य अशी वेगवेगळी पदं भूषवणारे शिबू सोरेन सध्या आपले पुत्र आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यामुळं चर्चेत आलेत आणि त्यामागचं कारण ठरलंय, इतिहासात त्यांच्यासोबत घडलेल्या सारख्याच घडामोडी.
हेमंत सोरेन नेमके का अडचणीत आलेत आणि याचं कनेक्शन त्यांच्या वडिलांशी कसं लागतंय, तेच पाहुयात.
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा ३० आमदारांसह झारखंडमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरला. त्यांनी काँग्रेस, राजद, राष्ट्रवादी आणि सीपीआयसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. सगळं काही आलबेल सुरू होतं, पण मागच्या काही दिवसात हेमंत सोरेन यांची खुर्ची धोक्यात आली आणि त्याचं कारण ठरलंय खाण घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप.
झारखंड हे खनिजांनी समृद्ध असलेलं राज्य मानलं जातं, त्यामुळं इथलं बरंचसं अर्थकारण हे खाणींभोवतीच फिरतं.
याच खणींवरून आता राजकारण पेटलंय, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांनी पत्रकार परिषद घेत असे आरोप केले की, ‘हेमंत सोरेन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत ८८ खाणींचा पट्टा स्वतःच्या कंपनीलाच भाड्यानं दिला. त्यांनी भ्रष्टाचार तर केलाच पण सोबतच आपल्या पदाचा दुरुपयोगही केला. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.’
या आरोपांमुळे सोरेन यांच्या अडचणी वाढल्या. त्यात सोरेन यांच्या जवळचे सहकारी म्हणून ओळख असणारे आयएएस ऑफिसर पूजा सिंघल, झामुमोचे नेते पंकज मिश्रा, मीडिया सल्लागार अभिषेक प्रसाद आणि निकटवर्तीय प्रेम प्रकाश हे सगळे जण ईडीच्या रडारवरती आहेत.
त्यामुळं रद्द झालेल्या आमदारकीसोबतच हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरही संकट आहेच.
हे झालं मुलाचं पण शिबू सोरेन यांच्यावरही अशाच प्रकारे सत्तेचा आणि पदाचा गैरवापर केल्याचे आरोप झाले होते आणि त्यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द झालं होतं. शिबू सोरेन यांचं नाव खऱ्या अर्थानं चर्चेत आलं होतं ते, १९९३ मध्ये. लोकसभेत नरसिंह राव यांच्या सरकार विरोधात अविश्वास ठराव आला होता, तेव्हा सरकारच्या बाजूनं मतदान करण्यासाठी सोरेन आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी तब्बल ५० लाखांची लाच स्वीकारल्याचे आरोप झाले होते. पुढं मात्र संसदीय विशेषाधिकारामुळं ते या प्रकरणातून वाचले.
त्यानंतर २००२ मध्ये पुन्हा एकदा सोरेन यांच्या नावाची देशभर चर्चा झाली. बिहारमधून झारखंड हे वेगळं राज्य होण्यात सोरेन संस्थापक असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाचा महत्त्वाचा रोल होता. मात्र राज्य बनल्यानंतर सत्ता मिळवण्यात त्यांना अपयश आलं.
सोरेन तेव्हा राज्यसभेचे खासदार होते, मात्र त्याचवेळी ते तत्कालीन झारखंड क्षेत्राच्या स्वायत्त परिषदेचे अध्यक्ष होते. त्यामुळं राज्यसभा खासदार असूनही लाभाचं पद भूषवल्यानं त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता.
यानंतर २००६ मध्ये कोर्टानं त्यांना १९९४ मधल्या एका अपहरण आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली, त्यावेळी सोरेन हे केंद्रीय कोळसा मंत्री होते. या शिक्षेमुळं साहजिकच त्यांची केंद्रीय मंत्रीपदाची खुर्ची गेली.
२०१३ मध्ये उच्च न्यायालयानं त्यांची निर्दोष सुटका केली, हाच निर्णय २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला. मात्र तोवर शिबू सोरेन यांना सक्रिय राजकारणात प्रचंड बॅकफूटवर जावं लागलं.
ज्या प्रकारे शिबू सोरेन यांना महत्त्वाच्या पदांवर असताना घोटाळ्याच्या आरोपांमुळे पायउतार व्हावं लागलं होतं, अगदी तसंच आता हेमंत सोरेन यांच्यासोबत होतंय. मात्र शिबू सोरेन यांनी आरोपांचं वादळ उठलं, पदं गेली तरी याचा वापर करुन व्हिक्टीम कार्ड खेळलं होतं. या व्हिक्टीम कार्डमुळंच त्यांना आपला आदिवासी मतदारांवर असलेला प्रभाव कायम ठेवता आला आणि सतत स्थित्यंतरं होत असलेल्या झारखंडच्या राजकारणात आजही शिबू सोरेन आणि कुटुंबियांना आपलं पॉवरहाऊस हे बिरुद कायम राखता आलं.
जे वडिलांसोबत झालं, तेच आता मुलासोबत होतंय, पण जसा शिबू सोरेन यांनी आपल्यावरच्या आरोपांचाही राजकीय वापर करत कित्येक हादरे पचवून साम्राज्य राखलं होतं, ती जादू हेमंत सोरेन यांना जमणार का ? यावर त्यांचं आणि झारखंडच्या राजकारणाचं भविष्य अवलंबून आहे, हे नक्की.
हे ही वाच भिडू:
- शिर्डीतील फुल विक्रेत्यांच्या राड्यामागे देवस्थानातल्या फुलांची लय मोठी इकॉनॉमी आहे…
- लोकं नालासोपाराला हलक्यात घेतात, कारण त्यांना मेन इतिहासच माहिती नसतो….
- काहीही असो पण विधानपरिषदेत न येता उद्धव ठाकरेंनी या ५ गोष्टी गमावल्यात