युपीच्या निकालानंतर उठलेला प्रश्न, मायावतींच काय झालं..?

जवळपास ४०-४५ वर्षांपूर्वी जब्बार पटेलांचा के पिक्चर आला होता. श्रीराम लागू आणि निळू फुले या दोन दिग्गजांची प्रमुख भूमिका असलेला त्या अजरामर कलाकृतीचं नाव होतं ‘सामना’.  ‘सामना’ मधला  अतिशय चित्तवेधक आणि लोकांच्या तोंडात आजही बसलेला एक डायलॉग होता,

 ‘मारूती कांबळेचं काय झालं?’

या चित्रपटातील गावाचा एक ‘सहकारमहर्षी’ हिंदूराव त्याच्या राजकीय सत्तेला अडथळा ठरणाऱ्या  निवृत्त सैनिक मारूती कांबळे याचा रातोरात काटा काढतो. त्यामुळे मारुती कांबळे अचानक गायब होतो. त्याच्या संशयास्पद गायब होण्यामुळे गावातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो पण त्याने हिंदूरावाशी पंगा घेतलेला होता, हे गावातील लोकांना माहीत असतं. त्यामुळं दबक्या आवाजात, ‘मारुती कांबळेचं काय झालं,’ अशी चर्चा करत राहतात.

या पिक्चरला शोभावी अशीच कथा या निकालाच्या निमित्ताने मिळालेय ती म्हणजे, 

मायावतींचं काय झालं ?

कांशीराम यांनी अन्यायी व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी उभारलेल्या बसपाने  मारुती कांबळे सारखेच प्रस्थापितांना प्रश्न विचारले होते. मात्र आज केवळ १-२ जागांवर अडकलेल्या बसपाचा मारुती कांबळे कुणी केला यावरही आता चर्चा घडतील. 

मायावतींच्या निवडणूक प्रचारातून गायब असण्याने याला आणखीनच बळ मिळाले.

उत्तरप्रदेशसारख्या महाकाय राज्यात कधी काळी एकछत्री अंमल चालवलेल्या मायावती इलेक्शनमध्ये तुरळकच दिसल्या. त्याआधीही उत्तरप्रदेशमधला प्रमुख पक्षाच्या प्रमुख असलेल्या मायावती अनेक मुद्यांवर शांत होत्या. 

हाथरसची बलत्कारची घटना आणि त्यांनतर सरकारने ज्याप्रकारे ते प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे देशभरातून योगी सरकराचा निषेध होत होता. मात्र स्वतःला ‘दलित की बेटी’ म्हणवून घेणाऱ्या मायावती मात्र आश्चर्यकारकपणे जमिनीवर उतरल्या नाहीत. 

त्यातच CAA-NRC ,आर्टिकल ३७० या मुद्यांवर प्रो बीजेपी स्टॅन्ड घेतल्यानंतर मायावती बीजेपीच्या जवळ जात असून बसपा आणि भाजपा युती होऊ शकते अशा वावड्या देखील उठल्या होत्या. मात्र मायावतींनी निवडणुकांमध्ये तरी हातमिळवणी केली नाही.

मायावतींना विरोधी पक्षानेही यावरून चांगलेच घेरले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी मायवतींवर २०२०मध्ये टीका करताना म्हटले होते

“मायावती यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही जास्त नाहीये कारण त्या एक “मजबूर नेत्या” आहेत. त्यांच्या काही मजबुरी, भीती आणि असहायता आहे, ज्यामुळे त्यांना भाजपला मदत करण्यासाठी अशा टिप्पण्या देण्यास भाग पाडले जाते”.

फक्त राजकीय वर्तुळातच नाही तर जनमाणसातही मायावतींच्या मौनामागे काहीतरी कारण आहे  असे तर्क कुतर्क लढवले गेले.

त्यातलाच एक होता मायावती त्यांच्यावरील प्रलंबीत खटल्यांमुळे शांत झाल्याचा आरोप.

 भ्रष्टाचार आणि त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याप्रकरणी मायवतींवर  प्रदीर्घ काळ खटले प्रलंबित आहेत आणि त्याबदल्यात त्यांनी स्वतःला आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार – यांच्या  खटल्यांविरूद्ध संरक्षणाच्या बदल्यात त्यांनी भाजपला शरणागती पत्करल्याच्या चर्चा उत्तरप्रदेशच्या दबक्या आवाजात होतंच राहिल्या. 

या या शंका कुशंकांना अजूनच हवा मिळाली जेव्हा २०२२ च्या उत्तरप्रदेश निवडणुकांत बसपा सगळ्यात वाईट परफॉर्मन्स करेल अशी भाकीतं आणि ओपिनियन पोल असताना देखील मायावतींनी काही जास्तीचे प्रयत्न केले नाहीत. आणि रणधुमाळीत फक्त भाजपा विरुद्ध सपा असाच मुकाबला असल्याचं चित्र निर्माण झालं. यानं व्हायचं तो परिणाम झाला बसपाचा हक्काची वोटबॅंक बसपाला सोडून गेली. 

मात्र बहुजन समाज पक्षाचे नेते हे मायावती इलेक्शनमध्ये नाहीत हे आरोप फेटाळूनच लावत राहिले. आग्र्यात झालेल्या प्रचंड रॅलीत स्वतः मायावती यांनी त्या गायब असल्याचा आरोपाचा समाचार घेत अश्या बातम्या पसरवणं हे मीडियाचा काम असल्याचं म्हटलं होतं.

‘मीडिया के जो साथी पूछते हैं कि बहनजी कहां हैं? तो मैं कहना चाहती हूं कि बहनजी अपनी पार्टी को मजबूत करने में बिजी थी. बसपा बोलने में कम और करने में ज्यादा विश्वास रखती है’

 असं उत्तर मायावतींनी त्यांच्या विरोधातील आरोपांना दिलं होतं.

आणि अनेक राजकीय विश्लेषकही बसपाची ही शांतपणे प्रचार करण्याची स्ट्रॅटेजि असते आणि ती  जुनीच असल्याचे सांगतात. उत्तरप्रदेश मधील राजकारणाचे विश्लेषक बद्रीनारायण आपल्या द प्रिंट मधील लेखात सांगतात.

”यूपीमध्ये अनेक महिन्यांपासून बसपाचे कार्यकर्ते शांतपणे जमिनीवर काम करत होते. बसपाची राजकीय संस्कृती कधीच ‘मोठ्या रॅली’ केंद्रीत राहिली नाही. सुरुवातीपासूनच दलित व बहुजनांच्या वस्त्यांमध्ये कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी घरोघरी जाऊन प्रचार व छोटय़ा छोटय़ा सभा घेतल्या.

त्यामुळे, मायावतींनी संबोधित केलेल्या मोठ्या रॅलींच्या अनुपस्थितीमुळे बसपा अ‍ॅक्शन मोडमध्ये नसल्याच्या चर्चा पूर्णपणे खरी नाहीये.”

अजून एक म्हणजे मायावतींना त्यांच्या समर्थकांना संदेश देण्यासाठी जास्त बोलण्याची नसते त्यांना एकत्र आणण्यासाठी काही ओळी पुरेशा असतात. 

मायावतींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांशीराम यांचा वाढदिवस आणि स्वतःच्या वाढदिवसानिमित्त जाहीर हजेरी लावली. तेव्हा कांशीराम यांची स्वप्ने पूर्ण करा आणि बसपाच्या विजयासाठी काम करा, एवढंच त्यांनी  कार्यकर्त्यांना सांगितले होते.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मायवतींमागे असणारी हक्काची दलित व्होटबँक. 

यामुळंच उत्तरप्रदेशमध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे,

 हाथी कितना भी छोटा क्यू ना हो वो कुत्ता नही होगा 

म्हणजे बसपाची ताकद कमी झाली तरी तो हत्तीचं राहील कुत्रा होणार नाही. आणि इतक्या दिवस बसपाच्या मतदारांनी मायावतींना तशी साथ पण दिले होती. २००७ मध्ये जेव्हा बसपाने पहिल्यांदा स्वबळावर सत्ता स्थापन केली होती तेव्हा ३०.०४ % मत घेत पक्षाने २०६ जागा जिंकल्या होत्या. तर २०१२ मध्ये अवघ्या ८० जागा जिंकल्यानंतरही मायवतींची मताची टक्केवारी ही २५% एवढी होती.

२०१७ मध्ये अवघे १७ आमदार आले असताना देखील २२% मते घेत एकूण व्होट शेअरच्या बाबतीत मायावतींचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. 

त्यामुळं दलित समाजाची एक गठ्ठा मतं आणि त्या जोडीला दलित-ब्राम्हण किंवा दलित-मुस्लिम असं सोशल इंजिनिरिंग करून मायावती सत्तेत पोहचत असत. मात्र २०२२च्या निवडणुकीत मायावती जास्तच गाफील राहिल्याचं विश्लेषक सांगतात. त्यामुळंच आजच्या निकालात बसपाची एवढी वाताहत झाली आहे.

त्याचबरोबर आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल नंतर लोकांना कोण किती वेळ दिसतं, कोणाची कशी प्रतिमा तयार होते यावरच बरंच अवलंबून असतं. मात्र मायावती यांचं या सर्वांपासून दूर राहण्यानं मायवतींची विश्वासार्ह्यता अजूनच कमी झाली आणि त्यांच्या हक्काच्या व्होटबँकलाही त्या विश्वास देऊ शकल्या नाहीत.

याचबरोबर मायावतींच्या सर्वात विश्वासू लोकांपैकी एक असणारे आणि बसपाचे मायवतीनंतरचे नंबर २ चे नेते म्हणून ओळखले जाणारे सतीशचंद्र मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवरही आता जोरदार टीका होऊ लागली आहे. कांशीराम यांच्या

ठाकूर, ब्राह्मण, बनिया चोर, बाकी सब हैं DS4 

(दलित सोशीत समाज संघर्ष समिती ) इथून सुरू झालेल्या बहुजन समाज पक्षाचा प्रवास

 ”हाथी नाही गणेश है, ब्रह्मा, विष्णू महेश है ” 

पर्यंत आणण्यात सतीशचंद्र मिश्रा यांच्यामुळेच झाला आहे. मात्र यामुळे पक्ष आपल्या कोअर आईडियालॉजी पासून दूर गेला आणि परिणामी पक्षाचं कॅडरही असं  अगदी बामसेफपासून बसपाची साथ देणारे कार्यकर्ते सांगतात.

कांशीराम आणि त्यानंतर  मायावती यांना देखील मानणाऱ्या चंद्रशेखर आझाद रावण सारख्या तरुण दलित नेत्यांची फळी तयार होत असताना मायावती यांनी त्यांच्याशी जुळवून घेतले नाही.

त्याचबरोबर राज्यातील एकूण मतदारांपैकी सुमारे २१ टक्के असलेल्या दलितांमध्ये  जाटव (११ टक्के) आणि ‘गैर-जाटव’ (दहा टक्के) ज्यामध्ये ६५ पोटजाती आहेत अशी विभागणी आहे. गैर-जाटव जातींमध्ये पासीं कोरी, धोबी, वाल्मिकी अशी विभागणी आहे. 

भाजपने २०१७ मध्ये बसपा ही जाटवांची पार्टी आहे म्हणत गैर जाटाव आपल्याकडे वळवले आणि २०२२ला माजी राज्यपाल असणाऱ्या बेबी राणी मौर्य हा जाटव चेहरा पुढे करत जाटव मते वळवण्याचा प्रयत्न केला. 

अखिलेश यादव यांनीही ऐन निवूडणुकीच्या तोंडावर बसपा नेत्यांना फोडत दलित मते फोडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला बऱ्याच प्रमाणात यश आल्याचंही दिसत आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे बसपाचा आतापर्यंतची सगळ्यात खराब कामगिरी.

त्यामुळं सामाजिक न्यायाची एक नवीन व्याख्या घेऊन घोंगावलेलं बसपचं वादळ सध्या तरी शांत झालंय. त्याचबरोबर मायावतींच काय झालं ? हा प्रश्न दिवसेंदिवस गडद होणार एवढं नक्की.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.