कॅनडात नाईट क्लबला गेलेल्या मोरारजी देसाईंसोबत काय झालं…?

मोरारजी भाई देसाई हे भारताच्या पहिल्या गैर काँग्रेसी सरकारचे प्रमुख. त्या अर्थाने भारताचे पहिले गैर-काँग्रेसी पंतप्रधान. आणीबाणीनंतर देशात जनता पक्षाचं सरकार आलं आणि नेहरुंनंतर देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मोरारजींची पंतप्रधान होण्याची इच्छा एकदाची पूर्ण झाली.

अतिशय स्पष्टवक्ते आणि काहीसे फटकळ स्वभावाच्या असणाऱ्या मोरारजींचे अनेक किस्से गाजले. दिल्लीच्या ल्युटन्स झोनमध्ये चवीने चघळले गेले.

मोरारजी भाई देसाईंचा असाच एक किस्सा इंडियन एक्स्प्रेसचे संपादक राहिलेल्या बी.जी. वर्गीस यांनी ‘फर्स्ट ड्राफ्ट-व्हिटनेस टू द मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया’ या आपल्या आत्मचरित्रात लिहिलाय.

अर्थात हा किस्सा आहे ते पंतप्रधान पदावर विराजमान होण्यापूर्वीचा.

साल होतं १९६८. मोरारजी त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. अर्थमंत्री म्हणूनच ते एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कॅनडाला गेले होते. मोरारजींच्या सोबत अर्थतज्ञ लक्ष्मीकांत झा हे देखील होते.

वेंकटाचार नावाचे अधिकारी त्यावेळी कॅनडामधील भारताचे उच्चायुक्त म्हणून काम बघत होते. त्यांनी मोरारजी देसाईंना आपल्यासोबत एका स्थानिक नाईट क्लबला येण्याची विनंती केली. पक्के गांधीवादी असलेल्या मोरारजींनी सर्वप्रथम तर त्यांना नकार दिला, परंतु नंतर लक्ष्मीकांत झा आणि वेंकटाचार यांनी खूप विनंती केल्यानंतर मोरारजी कसेबसे नाईट क्लबला जायला तयार झाले आणि तिघे मिळून एका नाईट क्लबमध्ये गेले देखील.

नाईट क्लबचं कल्चर मोराराजींसारख्या नेत्याला मानवणारं नव्हतंच. तिथे पोहोतचताच त्यांना थोडं अवघडल्यासारखं व्हायला लागलं होतं. त्याचं हे अवघडलेपण त्यावेळी वाढलं ज्यावेळी त्या क्लबमधली एका मुलीने त्यांना विचारलं,

“कुठली दारू घेणार..?”

त्या मुलीचा प्रश्न आपण दारू पीत नसल्याचे सांगून मोरारजींनी टोलवला, पण त्यानंतर मोरारजींशी लगट करण्याचा प्रयत्न करत ती मुलगी त्यांना म्हणाली,

“अच्छा, तर तुम्हाला न पिणाऱ्या मुली आवडतात..?”

आता मात्र मोराराजींचा पारा अतिशय चढला होता. चिडलेल्या मोरारजींनी त्या मुलीला बाजूला ढकललं आणि म्हणाले,

“मला मुलीच आवडत नाहीत”

आता खरं तर या बाईने गप्प बसणं अपेक्षित होतं, पण तीने तसं न करता ती परत मोरारजींना उलटून म्हणाली,

“तुम्ही बिलकुल सभ्य माणूस वाटत नाहीत”

आता मात्र त्याठिकाणी थांबणं मोरारजींना शक्यच नव्हतं. त्यांनी थेट त्या क्लबमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि रागारागातच ते तिथून निघून गेले.

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Kiran patil says

    ल्युटनस गॅंग दिल्ल्ही बद्दल माहिती द्या साहेब

Leave A Reply

Your email address will not be published.