ज्यांनी नारायण राणेंसोबत शिवसेना सोडली त्या नेत्यांचं पुढे काय झालं?

नारायण तातू राणे…!! एकेकाळचे कडवट शिवसैनिक आणि आता भाजपची धडाडती तोफ अशी ओळख असलेले राणे आता केंद्रात मंत्री झाले आहेत. आधी शिवसेना, नंतर काँग्रेस, पुढे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष आणि भाजप असं वळणावळणाचं राजकारण राहिलेले आणि त्यातून मधल्या काळात त्यांचं राजकारण संपलं अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

राणे जरी आता केंद्राच्या कॅबिनेटमध्ये गेले असले तरी जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या ११ समर्थक आमदारांनी देखील पक्ष सोडला होता. त्यामुळेचं आता राणेंसाठी ज्यांनी पक्ष सोडला त्यांचं पुढे काय झालं हे बघणं महत्वाचं आहे.

कालिदास कोळंबकर

कालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून १९९० ते २००४ या काळात शिवसेनेच्या तिकीटावर सलग ४ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २००५ मध्ये नारायण राणे यांच्यासोबत कोळंबकर यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

पुढे कोळंबकर काँग्रेसच्या तिकीटावर देखील तीनवेळा विधानसभेवर निवडून गेले. मात्र त्यानंतर २०१९ साली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आगामी राजकीय गणित लक्षात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये देखील ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले.

नंदकुमार काळे  

१९९५ ते २००४ पर्यंत दिवंगत यांनी आमदार म्हणून गोरेगावचे नेतृत्व केले होते. पुढे नारायण यांच्यासह काळे यांनी देखील शिवसेना सोडली. मात्र कालांतराने ते सेनेमध्ये परत आले होते. पण नुकतंच त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे.

गणपत कदम 

१९९९ साली गणपत कदम शिवसेनेकडून राजापूरचे आमदार झाले. २००४ च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. मात्र नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर गणपत कदम यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर पोटनिवडणुकीत गणपत कदम यांनी विजय मिळविला.

मात्र, २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता आपण निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी जाहीरही केले. मात्र, नंतरच्या काळात पक्षाकडून त्यांना कोणतेही मानाचे पद मिळाले नाही. पुढे ते पुन्हा शिवसेनेत दाखल झाले.

शंकर कांबळी

वेंगुर्ल्याचे आमदार राहिलेल्या शंकर कांबळी यांनी देखील राणेंसोबत २००५ मध्ये शिवसेना सोडली होती. त्याआधी तीन वेळा ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत ते देखील काँग्रेसमध्ये दाखल झाले.

पुढे २०१२ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यानंतर ते राष्ट्रवादीमधून पुन्हा शिवसेनेत दाखल झाले.

रवींद्र माने 

सलग तीन वेळा आमदार आणि एकवेळा राज्यमंत्री असलेले रवींद्र माने अंतर्गत कलहामुळे २०१० ला शिवसेना सोडून राष्ट्रवादीवासी झाले. गेली ७ वर्षे त्यांनी राष्ट्रवादीसाठी निष्ठेने काम केले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली.

अखेर २०१७ मध्ये ते पुन्हा शिवसेनेत दाखल झाले. आता त्यांच्यावरही ज्येष्ठ नेते म्हणून सेनेची मोठी जबाबदारी आहे. सध्या कोकणातील निर्णयप्रक्रियेत त्यांनाही मानाचे स्थान मिळत आहे.

प्रकाश भारसाकळे

भारसाकळे यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात झाली. ते १९९०, १९९५, १९९९, २००४ मध्ये सलग शिवसेनेच्या तिकिटावर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर २००५ मध्ये भारसाकळे यांनीही राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पण काँग्रेसमध्ये ते जास्त काळ रमले नाहीत. २००९ च्या निवडणुकीत दर्यापूर अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी अकोट मतदारसंघातून तिकीट मागितले होते. मात्र काँग्रेसने त्यांना अकोटमधून तिकीट नाकारलं. त्यामुळे नाराज झालेल्या भारसाकळेंनी बंड पुकारलं आणि अकोटमधून अपक्ष निवडणूक लढवली होती.

पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि ते विजयीही झाले. २०१९ मध्ये देखील ते अकोट मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

विनायक निम्हण 

विनायक निम्हण यांना पुण्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ म्हणून ओळखले जाते. निम्हण १९९९ आणि २००४ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. २००९ मध्ये त्यांनी राणे समर्थक म्हणून निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते काँग्रेसमधून देखील निवडून आले. पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.

मात्र २०१४ साली शिवाजीनगरमधून भाजपाचे उमेदवार विजय काळे यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला. पुढे २०१५ मध्ये निम्हण यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र २०१८ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्या चर्चा होत्या.

माणिकराव कोकाटे

नाशिकच्या राजकारणात माणिकराव कोकाटे यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. कोकाटे हे १९९९, २००४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर कोकाटे यांनी २००५ मध्ये नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यानंतर ते २००९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले.

पुढे राणेंनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर कोकाटे यांनी वेगळा मार्ग निवडून भाजपमध्ये प्रवेश केला  होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

पुढे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपची युती झाल्याने कोकाटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

 श्‍याम सावंत

श्रीवर्धनचे आमदार म्हणून ओळख असलेले श्याम सावंत यांनी देखील नारायण राणे यांच्यासोबत पक्ष सोडला होता. पुढे ते सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत झाले.

त्यानंतर राणे यांच्यासोबत पक्ष सोडलेल्या अनेक आमदारांनी त्यांची साथ सोडली होती. मात्र अगदी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष स्थापन केल्यानंतर देखील श्‍याम सावंत हे राणेंसोबत होते. पुढे २०१९ पर्यंत श्याम सावंत राणेंसोबत होते.

विजय वडेट्टीवार 

विजय वडेट्टीवार यांच्या राजकारणाची सुरुवात आधी काँग्रेस आणि पुन्हा शिवसेनेत अशी होती.  १९९६ मध्ये युतीचे सरकार असताना वडेट्टीवार यांना महाराष्ट्र राज्य उपक्रमांचे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. जवळपास २ वर्ष ते या पदावर होते. पुढे त्यांच्या वाढत्या पक्ष कार्याची दखल घेऊन १९९८ साली त्यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले.

२००५ मध्ये राणे यांच्यासोबत वडेट्टीवार यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते काँग्रेसमधून देखील सातत्यानं निवडून येत गेले. २००८ – ०९ याकाळात ते जलसंपदा राज्यमंत्री होते. २०१० मध्ये देखील अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. २०१४ नंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

याच काळात राणे यांनी पक्ष नेतृत्वावर टिका करत कॉंग्रेस सोडली. पण विजय वडेट्टीवार यांनी कॉंग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. या सगळ्याचा परिणाम म्हणूच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जून २०१९ मध्ये वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

पुढे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे.

सुभाष बने

सुभाष बने यांच नाव देखील कोकणात अग्रक्रमाने घेतलं जातं. मात्र राणेंसोबत ते देखील काँग्रेसमध्ये गेले. तिथेही ते आमदार झाले. २००९ मध्ये त्यांचा मतदारसंघ गमावल्याने विधान परिषदेवर वर्णी लावण्याचे आश्वासन बने यांना मिळाले होते; मात्र कोणत्याही राणेसमर्थकाला विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली नाही.

पुढे ९ वर्षांनंतर काँग्रेसची पद्धत न रुचल्याने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा शिवसेनेत परतले. तेव्हापासून बने हे ज्येष्ठ नेते म्हणून शिवसेनेत वावरत आहेत. त्यांचा पुत्र रोहन हे जिल्हा परिषदेवर आहेत. 

सुबोध मोहिते

सुबोध मोहिते हे आधी महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी बाळासाहेबांनी मोहितेंना १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत रामटेकमधून तिकीट दिले. त्यावेळी सुबोध मोहिते पहिल्याच फटक्यात खासदार झाले.

पुढे २००२ मध्ये शिवसेनेच्या ताब्यात असलेलं अवजड उद्योग मंत्रालय सुबोध मोहिते यांना देण्यात आले. सुबोध मोहिते पहिल्यांदा खासदार होण्यासोबतच पहिल्याच टर्ममध्ये देशाचे अवजड उद्योग मंत्री झाले. पुढे २००४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील बाळासाहेबांनी रामटेक मधून पुन्हा सुबोध मोहिते यांनाच उतरवण्यात आलं. यावेळी देखील मोहितेंनी बाळासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला.

मात्र नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा सुबोध मोहिते यांनी देखील खासदारकीचा राजीनामा देत शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते सातत्यानं विविध निवडणुकांमध्ये पराभूत होत गेले. पुढे त्यांनी देखील काँग्रेस सोडली. सध्या ते स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी धडपडताना दिसून येत आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.