क्रिकेटमधलं राजकारण एवढं तापलंय, की साध्याभोळ्या वृद्धीमान साहावर शाळा होतीये…

भारताची क्रिकेट टीम म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय. पण २०२१ हे वर्ष काय भारतासाठी एकदम रोलरकोस्टर राईड ठरलं. म्हणजे आपण अशक्य वाटणाऱ्या इंग्लंडमध्ये टेस्ट मॅचेस जिंकल्या, पण जिथं शुअरमध्ये जिंकू अशा टी२० वर्ल्डकपमध्ये माती खाल्ली. हा पराभव पचवणंच कठीण असताना… संघात राजकारण असल्याच्या अफवा जोरदार बाहेर आल्या. विराट कोहली आणि कॅप्टनसी यावरचे वाद तर लय चवीनं चघळले गेले. अखेर विराट तिन्ही फॉरमॅट्समधल्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आणि रोहित शर्माची भारताचा नवा कॅप्टन म्हणून नियुक्ती झाली.

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना

छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना…

असं म्हणत, २०२२ मध्ये सगळा वादाचा विषय मागे सोडायचा विचार सुरूच होता आणि तेवढ्यात नवा वाद समोर आला. आला तर आला, यात नावं कुणाची तर राहुल द्रविड आणि वृद्धीमान साहा. भारतीय क्रिकेटमधले शांत-शामळू चेहरे.

हा सगळा मॅटर तुम्हाला जरा विस्तृतमध्ये सांगतो, तेही स्टेप बाय स्टेप…

आता भारताची टेस्ट सिरीज होणार आहे श्रीलंकेविरुद्ध. ईशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासोबतच अनुभवी विकेटकिपर वृद्धीमान साहालाही संघातून डच्चू मिळाला. त्यानंतर साहाचं एक ट्विट खतरनाक गाजलं. त्याला एका पत्रकारानं मुलाखत देण्याबाबत विचारलं. साहानं काय रिस्पॉन्स दिला नाय म्हणल्यावर, हा पत्रकार चांगलाच खवळला. त्यानं साहाला धमकी दिली, की ‘मी अपमान हलक्यात घेत नाही, यापुढं कधीच तुझी मुलाखत घेणार नाही. तू हे करायला नव्हतं पाहिजेस.’

साहानं हे सगळं ट्विटरवर टाकलं आणि वाद रंगला.

राहुल द्रविड काय म्हणाला…

तेवढ्यात ईसपीएन क्रिकइन्फो या संकेतस्थळानं साहाची मुलाखत घेतली. त्यात त्यानं सांगितलं की, ‘हेडकोच राहुल द्रविड साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजनंतर माझ्याशी बोलले. त्यांनी मला सांगितलं की, टीम मॅनेजमेंट नव्या तरुण विकेटकिपरला संधी देण्याचा विचार करतंय. तू सध्या संघाचा फर्स्ट चॉईस विकेटकिपर नाहीयेस, त्यामुळं तुझ्याजागी नव्या प्लेअरला संधी मिळेल. श्रीलंकेविरुद्धच्या  सिरीजसाठी तुझी निवड होण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळं तुला दुसरा काही निर्णय घ्यायचा असेल तर तू घेऊ शकतोस.’

यावर साहानं स्पष्ट सांगितलं, की ‘मी काय सध्या रिटायरमेंटचा विचार करत नाहीये, अजूनही माझ्यात भरपूर क्रिकेट बाकी आहे.’

सौरव गांगुली काय म्हणाला…

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कानपूर टेस्टमध्ये साहानं फिफ्टी मारत संघाला पराभवापासून वाचवलं होतं. त्यानं सांगितलं की, ‘त्या इनिंगनंतर मला सौरव गांगुलीचा मेसेज आला की, जोवर मी अध्यक्ष आहे तोवर तू कसली काळजी करु नकोस. पण त्यानंतर एकाच सिरीजनंतर मला अप्रत्यक्षपणे रिटायर होण्याचा सल्ला मिळाला.’

चेतन शर्मा काय म्हणाले…

निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनीही आपल्याला कॉल केल्याचं साहानं सांगितलं. ‘मला संघाबाहेर ठेवण्यामागं माझा फॉर्म, फिटनेस किंवा वय ही कारणं नाहीयेत. तर फक्त नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी मला बाहेर ठेवलं जातंय. यापुढं संघ निवडताना माझा विचार होणार नाही, असंही चेतन शर्मांनी आपल्याला सांगितल्याचं साहा मुलाखतीत म्हणाला.

आपल्याला संघाबाहेर ठेवण्यात आल्याचं दुःख नाहीये, तर ज्याप्रकारे हे सांगण्यात आलं त्याचं दु:ख जास्त आहे, असं साहाचं म्हणणं आहे. बीसीसीआयनं ज्या पत्रकारानं साहाला धमकी दिली, त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. राहुल द्रविडही ‘मी साहाचा आदर करतो आणि त्याला प्रामाणिकपणे गोष्टी सांगणं गरजेचं होतं,’ असं म्हणालाय. सौरव गांगुली यावर अजून तरी काय बोलला नाहीये.

पण एवढ्या सगळ्या राजकारणामुळं, साहासारखा गुणी विकेटकिपर पुन्हा इंडियन जर्सीत दिसण्याची शक्यता तशी कमीच आहे. हे खरं…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.