मित्राला गाडी दिली आणि अपघात झाला तर, गाडीच्या मालकावर काय कारवाई होते?

नववर्षाच्या पहिल्याच पहाटेला देशाची राजधानी दिल्ली हादरून गेली होती. त्याचं कारण म्हणजे, १ जानेवारीला पहाटेच्या सुमारास दिल्लीच्या रस्त्यावर एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला.

या मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता, शरीरातली जवळपास सगळी हाडं तुटली होती आणि पाय शरीरापासून वेगळे झाले होते.

या घटनेनं फक्त दिल्लीच नाही तर, संपूर्ण देश हळहळला. या केसमध्ये अजूनही रोज नवनवे खुलासे होतायत. ही घटना नेमकी काय घडली हे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, अपघात की घातपात यावरून सध्या पोलिस तपास सुरू आहे.

नेमकी घटना कशी झाली?

झालं असं की, ३१ डिसेंबरच्या रात्री जेव्हा दिल्लीसह संपुर्ण देश थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करत होता तेव्हा, एक स्कुटी आणि बलेनो कार यांच्यात धडक झाली. यानंतर स्कुटीवरच्या दोन्ही मुली खाली पडल्या. एक मुलगी पळून गेली तर, दुसरी मुलगी गाडीच्या खाली अडकली. ती मुलगी अडकलेली असतानाच गाडीने तिला फरफटत नेलं आणि तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी गाडीतल्या पाचही तरुणांना अटक केली. पण, या पाच जणांपैकी एकही जण त्या बलेनो गाडीचा मालक नाहीये.

त्या तरुणांनी ही गाडी आपल्या मित्राकडून मागून आणली होती. आता प्रश्न असा उपस्थित होतो की, अश्या वेळी मग पोलिस कारवाई कश्याप्रकारे होते? गाडीच्या मालकावरही गुन्हा दाखल होतो का? यात काय शक्यता असतात?

बघुया या सगळ्या बाबतीत कायदा काय सांगतो?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार अशा केसमध्ये पोलिस ‘आयपीसी सेक्शन २७९, ३०४ आणि ३०४ अ’  या सेक्शननुसार गुन्हा दाखल करतात. या केसमध्येही पोलिसांनी याच सेक्शन्सखाली गुन्हे दाखल केलेत.

आता हे सेक्शन्स नेमके कसले आहेत हे बघुया.

२७९ हा सेक्शन तेव्हा लागतो जेव्हा एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर रॅश ड्रायव्हिंग किंवा रायडिंग करत असेल. त्या व्यक्तीमुळे जर मानवी जीवाला धोका निर्माण झाला किंवा कुणाला दुखापत झाली तर, २७९ सेक्शननुसार कारवाई होते.

२७९ सेक्शननुसार गुन्हा सिद्ध झाला तर, सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा एक हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा मग दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

कलम ३०४ नुसार म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा.

हा गुन्हा सिद्ध झाल्यास व्यक्तीला जन्मठेप किंवा १० वर्षांपर्यंत कारावास याशिवाय दंडही ठोठावला जातो.

यात अजाणतेपणी कुणाचा मृत्यू झाला तर, ३०४ अ नुसार गुन्हा दाखल होतो.

एख्याद्याचा जीव घ्यायचा किंवा खून करायचा या उद्दिष्ट्याने कृत्य केलं नसेल पण घडलेल्या घटनेत जीवितहानी झाली तर या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो.

३०४ अ नुसार गुन्हा सिद्ध झाला तर, दोन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा कारावास आणि दंड अश्या दोन्ही शिक्षा ठोठावल्या जातात.

आता प्रश्न हा आहे की, गाडी दुसऱ्याची आणि चालवणारी व्यक्ती भलतीच असेल तर, मालकावर काय कारवाई होते?

यात विषय असा आहे की, जर गाडीचा मालक गाडीमध्ये नसेल आणि गाडी चालवणारी व्यक्ती ही दुसरीच कुणी असेल तर, मालकावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. मात्र, पोलिस चौकशी करण्यासाठी नोटीस पाठवून गाडीच्या मालकाला बोलवून घेऊ शकतात.

मालकाला गाडी चावणाऱ्याचा हेतू आधीच माहिती असेल तर, कारवाई होऊ शकते.

आता यातही एक शक्यता अशी आहे की, ज्या व्यक्ती कडून अशी घटना घडली आहे. ती व्यक्ती असं काही करणार आहे हे जर गाडीच्या मालकाला आधीच माहिती असेल तर, या घटनेतील सहयोगी म्हणून गाडीच्या मालकावर कारवाई होऊ शकते.

यानुसार कांझावाला केसमधली परिस्थिती काय आहे?

दिल्लीत अंजलीसोबत जी घटना घडली त्यात घटनेमधली बलेनो गाडी ही आशुतोष नावाच्या व्यक्तीची आहे. ही व्यक्ती घटनेवेळी गाडीत नव्हता. आता ही घटना जर पुर्वनियोजित असेल तर, या घटनेबद्दल आशुतोष याला कल्पना होती का ? याचा पोलिस तपास करत आहेत.

त्यामुळे आशुतोषवर कारवाई होणार किंवा नाही हे पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.