गेल्या ९ वर्षात दाभोळकर हत्या प्रकरणात काय काय घडलं?
२० ऑगस्ट २०१३ ची पुण्यातली सकाळ. एक गृहस्थ ओंकारेश्वर मंदिराजवळून मॉर्निंग वॉकला निघाले होते. तेव्हा बाईकवरून दोन अज्ञात आले, आपल्या पिस्तुलातल्या गोळ्या त्या गृहस्थांवर झाडल्या अन त्या मोटारसायकलीवरूनच पळाले. झाला प्रकार तिथं रस्त्यावर एका सीसीटीव्हीत कैद झाला. या गृहस्थांच्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला होता.
कारण ते गृहस्थ होते विवेकवादी विचारांचे कार्यकर्ते आणि अंनिसचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर.
दाभोळकरांच्या घटनेनंतर आणखी तीन घटना अशाच प्रकारे घडल्या. डाव्या विचारांचे गोविंद पानसरे यांची फेब्रुवारी २०१५ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर एमएम कलबुर्गी यांची ऑगस्ट २०१५ मध्ये हत्या आली, पत्रकार गौरी लंकेश यांची सप्टेंबर २०१७ मध्ये अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली.
हे हत्या करणारे दुसरे तिसरे कोणी नसून सनातनचे कार्यकर्ते असल्याचं प्रत्येक तपासात उघडकीस आलं.
दाभोळकरांच्या हत्येचा तपास २०१४ मध्ये सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. मागच्या महिन्यातल्या २० ऑगस्टला या घटनेला आठ वर्ष उलटली. आणि तब्बल आठ वर्षाच्या कालावधीनंतर सीबीआयने ५ सनातनच्या कार्यकर्त्यांवर दोषारोप पत्र दाखल केलं. इतक्या वर्षानंतर आज या आरोपींवर न्यायालयात खटला चालवला जाईल. म्हणजे त्यांच्यावर नक्की कोणत्या कलमांतर्गत आरोप ठेवले जातील हे स्पष्ट होईल.
तर या अनुषंगाने मागच्या आठ वर्षात या तपासात काय काय घडलं, आरोपी कसे सापडले हे बघूया..
डॉ. दाभोळकरांच्या हत्येनंतर या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस आणि महाराष्ट्र ATS मिळून करत होते. या प्रकरणात पोलिसांनी जानेवारी २०१४ मध्ये मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांना त्यांनी संशयित म्हणून अटक केली. मनिष नागोरीने दाभोलकरांच्या हत्येसाठी बंदुक विकल्याचा आरोप होता.
ऑक्टोबर २०१३ मध्ये या दोघांना दहशतवादविरोधी कोठडीत पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याकडे सापडलेली बंदूक आणि त्याच नंतर न्यायालयात सादर झालेला बेलेस्टिक रिपोर्ट यांच्या आधारे डॉ. दाभोलकरांच्या हत्येतल्या त्यांच्या सहभागाचा दावा पोलिसांनी केला होता.
पण त्यात फार काही निष्पन्न होताना दिसत नव्हतं. २१ जानेवारी २०१४ ला नागोरी आणि खंडेलवाल या दोघांना कोर्टात हजर केलं असता त्यांनी हा आरोप केला की तत्कालीन एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येची कबुली देण्यासाठी २५ लाख रूपये आम्हाला देऊ केले होते.
यानंतर झालेल्या सुनावणी दरम्यान आम्ही भावनेच्या भरात राकेश मारियांवर आरोप केल्याचं या दोघांनी म्हटलं. काही महिन्यांची या दोघांचीही न्यायालयाने जामिनावर सुटका केली. या प्रकरणा त्यांच्यावर कधीही चार्जशीट दाखल झाली नाही.
त्यानंतर सुरुवातीला झालेला तपास विशिष्ट हेतूनं चुकीच्या दिशेनं केला का? याची चौकशी शासनानं करावी असं मुंबई हायकोर्टानं म्हणत मे २०१४ मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला. एका याचिकेद्वारे उच्च न्यायालय या तपासावर लक्ष ठेवून होते.
CBIनं तपासाची दिशा बदलत ‘सनातन’संस्थेशी संबंधित काही व्यक्तींना संशयित म्हणून अटक केली.
२०१६ मध्ये सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली. सीबीआयने अटक करण्याआधी महाराष्ट्र पोलिसांनीही त्याला अटक केली होती. संजय साडविलकर यांनी दिलेल्या साक्षीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. वीरेंद्र तावडे या प्रकरणाचा मास्टरमाईंडपैकी एक आहे असंही सीबीआयने म्हटलं होतं. सोबतच सारंग अकोलकर आणि विनय पवार यांचाही संशयित मारेकरी म्हणून शोध सुरू होताच. सप्टेंबर २०१६ मध्ये CBI नं दाखल केलेल्या चार्जशीटमध्येही हा उल्लेख केला.
त्यानंतर २०१८ मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) १० ऑगस्टला नालासोपारा इथं धाड टाकून बाँब तयार करण्याचं साहित्य आणि इतर काही शस्त्र जप्त केली होती. या प्रकरणी वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या संशयितांना अटक झाली. या तिघांच्या चौकशीमध्ये एक संशयितानं डॉ. दाभोळकरांच्या खुनात सहभाग असल्याचं मान्य केलं आणि या खुनाच्या कटात आणखी एकाचा सहभाग असल्याचं सांगितलं.
यात CBI ने हा दावाही केला की नरेंद्र दाभोळकर आणि त्यांच्या अंनिसचे कार्यकर्ते यांच्याशी सनातन संस्थेचं वैर आहे. हे वैर हाच दाभोळकरांच्या हत्येमागचा हेतू आहे. २०१८ मध्ये सीबीआयने हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन अंदुरे आणि शरद काळसकर या दोघांना अटक केली.
सचिन अंदुरे आणि शरद काळसकर या दोघांनीच दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या असंही सीबीआयनं म्हटलं.
मे २०१९ मध्ये सीबीआयने सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांनाही अटक केली. या सगळ्यांवर आरोपपत्रही दाखल करण्यात आलं. शस्त्रांचा तपास करत असताना सीबीआयने वकील पुनाळेकर यांना अटक केली, कारण त्यांनी दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्यासह अनेक खुनांमध्ये वापरलेली बंदुक नष्ट करण्याचा सल्ला आरोपी काळसकरला दिला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पुनाळेकरांच्या सूचनेनुसार, काळसकरने कथितपणे चार देशी बनावटीची पिस्तुले उध्वस्त केली होती आणि भाग ७ जुलै २०१८ रोजी ठाण्याजवळील अरबी समुद्राच्या एका खाडीच्या पुलावरून फेकला होता. मात्र पुनाळेकर हे जामिनावर बाहेर आहेत.
पण या प्रकरणातील मुख्य आरोपी ज्यांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या ते म्हणजे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याबाबत पुणे कोर्टात आज दिनांक २० मार्च २०२२ रोजी एक सुनावणी पार पडली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि शनिवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याची साक्ष, साक्षीदारांनी न्यायालयात जबाब दिला आहे. या दोघा आरोपींना ओळखणारे दोन्ही साक्षीदार हे पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी आहेत.
साक्षीदारांनी दिलेली माहिती या प्रकरणाला कलाटणी देणारी असल्यामुळे इथून पुढे या प्रकरणाचे आणखी काय धागेदोरे हाती लागतील हे पाहणं महत्वाचं आहे.
हे ही वाच भिडू
- किनवट सारख्या दुर्गम भागात आदिवास्यांचे आरोग्य सांभाळणारा देवमाणूस !
- 1972 साली ज्ञानेश्वरांची समाधी उघडण्याविषयीचे प्रकरण नेमके काय आहे ?
- चेटकांपासून ते करणीपर्यन्त प्रत्येक गोष्टीच समाधान या गावात मिळतं.
- सांगलीची ही २१ वैशिष्टे वाचलासा तर डोकं भंजाळल्याशिवाय राहणार नाय…