आपल्याकडचं माहीत नाही, पण इंग्लंडच्या नव्या सरकारची पहिली योजना हिट ठरलीये…

आपल्याकडं नवं सरकार स्थापन झालं आणि चर्चा सुरू झाली की हे सरकार नव्या योजना कोणत्या आणणार..? पण सध्या तरी जुन्या योजनाच पुन्हा सुरू करण्यावर भर दिल्याचं दिसतंय. तिकडं दूर इंग्लंडमध्ये एक नवं सरकार स्थापन झालं आणि त्यांनी पहिल्या महिन्यातच धुरळा उडवलाय.

नाय पुन्हा राजकारणाच्या गप्पा हाणणार नाय, इकडं विषय क्रिकेटचा आहे.

ऑस्ट्रेलियात झालेल्या ऍशेस सिरीजमध्ये इंग्लंडला सपाटून मार खावा लागला, त्याआधी भारतानंही टेस्ट सिरीजमध्ये २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यामुळं क्रिकेटचे जन्मदाते असणाऱ्या इंग्लंडलाच टेस्ट क्रिकेटमध्ये बेक्कार अपमान सहन करावा लागला होता. २०१५ नंतर वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी मोठी झेप घेतली होती, पण खरं क्रिकेट म्हणून ओळखलं जाणाऱ्या टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांचे वांदे झालेले.

अशावेळी त्यांनी नवे भिडू आणायचं ठरवलं. कॅप्टन जो रुट आणि कोच ख्रिस सिल्व्हरवूडनं राजीनामा दिला आणि त्याजागी वर्णी लागली कॅप्टन बेन स्टोक्स आणि कोच ब्रेंडन मॅकलम यांची.

स्टोक्स टेस्ट क्रिकेटमध्ये काय करु शकतो याची झलक त्यानं २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दाखवली होतीच. कुठल्याही परिस्थितीत मॅच फिरवण्याची क्षमता आणि आक्रमक खेळावर हुकूमत असल्यानं स्टोक्स कॅप्टन्सीसाठी योग्य दावेदार होता.

दुसऱ्या बाजूला होता मॅकलम, आता मॅकलमनं न्यूझीलंडकडून खेळताना अनेकदा पॉवरफुल बॅटिंगचे नजराणे दाखवले होतेच. भारतीय चाहत्यांच्या लक्षात मात्र आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये तोडफोड करत त्यानं मारलेले १५८ रन्सच आहेत.

मॅकलमच्या त्या १५८ रन्सनं आयपीएलचं भविष्य सुरक्षित केलं होतं आणि असं म्हणतात मॅकलमनं इंग्लंडच्या टेस्ट क्रिकेटमध्ये आणलेल्या या नव्या योजनेमुळं टेस्ट क्रिकेटचं भविष्य सुरक्षित झालं आहे.

ही योजना म्हणजे बॅझबॉल…

आता बॅझबॉल म्हणजे  काय वेगळं किंवा रॉकेट सायन्स नाही. क्रिकेटविश्वात मॅकलमला बॅझ म्हणून ओळखतात. त्यानं नवी रणनीती आखली की, कितीही मोठं लक्ष्य असलं तरी त्यावर तुटून पडायचं. डिफेन्सला काहीसं मागे ठेऊन आक्रमकतेनं खेळायचं, मग समोर आधी कधीच न चेस केलेलं टार्गेट असेल, तरी चेस होतंय.

या बॅझबॉलचा पहिला फटका बसला, मॅकलमचीच टीम न्यूझीलंडला.

तीन टेस्ट मॅचच्या सिरीजसाठी न्यूझीलंड इंग्लंडमध्ये आलं, पहिल्या टेस्टमध्ये त्यांनी इंग्लंडला चौथ्या इनिंगमध्ये २७७ रन्सचं टार्गेट दिलं होतं. जे इंग्लंडनं चौथ्या दिवशीच पूर्ण केलं होतं. दुसऱ्या टेस्टमध्ये रन्सचा पाऊस पडला होता, त्यात इंग्लंडला जिंकायला ७२ ओव्हर्समध्ये २९९ रन्स करायचे होते. मॅच जाईल असं वाटलं होतं, मात्र स्टोक्स आणि बेअरस्टोनं शेवटच्या तासात अक्षरश: खरं केला. 

त्यांनी फक्त १२१ बॉलमध्ये १७९ रन्सची पार्टनरशिप केली आणि इंग्लंडनं सहज मॅच मारली.

सिरीजमधल्या तिसऱ्या मॅचमध्येही चित्र वेगळं नव्हतं. यावेळी टार्गेट होतं २९६ रन्सचं. पावसाचा फटका बसल्यानं हातातल्या ओव्हर्स आधीच कमी झाल्या होत्या, मात्र बेअरस्टोनं पुन्हा कहर केला आणि मॅचचं पारडं इंग्लंडच्या बाजूनेच झुकलं.

मग आली भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट.

पहिल्याच दिवशी मॅच भारताच्या हातातून गेल्याची चिन्ह होती, पण रिषभ पंतनं १११ बॉलमध्ये १४६ रन्सचं चोपकाम केलं. अँडरसन, ब्रॉड, लीच अशा कसलेल्या बॉलर्सला त्यानं किरकोळीत धुतलं. त्याची ही बॅटिंग बघून इंग्लंडचा माजी कॅप्टन पॉल कॉलिंगवुड, ‘हेच तर बॅझबॉल आहे असं म्हणला होता.’

पुढं भारतानं चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला ३७८ रन्सचं टार्गेट दिलं होतं. आतापर्यंतच्या इतिहासात इंग्लंडनं एवढं मोठं आव्हान कधीच पार केलं नव्हतं. मात्र बेअरस्टो आणि जो रुटनं चौथ्या विकेटसाठी नॉटआऊट २६९ रन्सची पार्टनरशिप केली आणि विजय हिरावून घेतला. या दोघांनी पाचव्या दिवशीच्या लंचच्या आधीच मॅच संपवली होती.

आता या बॅझबॉलमध्ये बॅट्समन लोकं डिफेन्स करतच नाहीत का ?

तर बेअरस्टोची बॅटिंग बघितली की अंदाज येतो, की तो चांगले बॉल सोडून देतो किंवा डिफेन्स करतो. मात्र एकही खराब बॉल सोडत नाही. आक्रमक खेळायचंय म्हणून इंग्लिश बॅट्समन हवेतून शॉट्स खेळत नाहीत आणि विकेट वाचवतात.

या बॅझबॉलमुळं टिपिकल टेस्ट क्रिकेटचा बाजार उठणार का ?

जसं टी२० क्रिकेट चर्चेत आलं तसा हा प्रश्न विचारला जातोय. पण पाहायला गेलं तर गेल्या  काही वर्षात टेस्ट क्रिकेटचं रूप पूर्णपणे बदललेलं आहे. कित्येक टेस्ट निकाली होतायत आणि त्यामुळंच टेस्ट क्रिकेटमधली रंगत वाढतीये. त्यात जगभरातले कित्येक प्लेअर्स नियमितपणे टी२० मध्ये खेळतायत. त्यामुळं फटकेबाजीचा आणि आक्रमक क्रिकेटचा चांगलाच सराव त्यांना होतोय.

याचंच प्रतिबिंब आता टेस्ट क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. त्यात इंग्लंडकडे असलेली बॅट्समनची ताकद बघता, त्यांना वनडे क्रिकेटप्रमाणे टेस्ट क्रिकेटवर राज्य करणं सोपं झालंय. त्यामुळं स्टोक्स-मॅकलम सरकारची ही नवी योजना शंभर टक्के टेस्ट क्रिकेटचं भविष्य ठरु शकतेय.

फक्त यात भारताचं काय हा प्रश्न पडला, तर कोहलीचा फॉर्म आणि रोहितचा फिटनेस बघता रिषभ पंतवर अवलंबून राहण्याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय भारताकडे नाही.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.