ब्रिटन, युनायटेड किंग्डम आणि इंग्लड, ग्रेट ब्रिटन यातला बेसिक फरक समजून घ्या..
ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं. व्यापारी म्हणून आले आणि सत्ता स्थापन करून, भारतीयांचा छळ करून, सगळी भारताची संपत्ती लुटून निघून गेले. भारताची मालमत्ता लुटून नेली मात्र शिक्षण व्यवस्थेसारख्या बऱ्याच गोष्टी भारताला देऊनही गेले. आता ब्रिटिश चांगले होते की खराब हा काही मुद्दा नाहीये.
मुद्दा आहे,
ब्रिटिश ‘आले कुठून आणि गेले कुठे’?
ते युनायटेड किंग्डममधून आले होते, ब्रिटनमधून आले होते की इंग्लंडमधून आले होते, काहीच कळत नाही.
खूप मोठा संभ्रम इथे निर्माण होतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तिन्ही देश वेगवेगळे आहेत की एकच आहेत, हे सुद्धा जवळपास ९०% लोकांना माहित नाहीये, असं एका अहवालातून समोर आलंय. या ९०% टक्क्यांत आपले भिडू नको म्हणून यातला फरक जाणून घेऊन, काय तो एकदाचा छडा लावूच असं वाटलं. तेव्हा संपूर्ण माहिती सविस्तरपणे एकवटली आणि इथे उतरवली आहे.
सुरुवात करूया युनाइटेड किंग्डमपासून…
सध्या युरोपच्या वायव्य किनाऱ्यावरील हा एक स्वतंत्र देश आहे. जो वेगवेगळ्या देशांचा मिळून बनला आहे. जसं की इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्स.
१५४२ मध्ये इंग्लंड आणि वेल्स यांनी मिळून ‘किंग्डम ऑफ इंग्लंड’ची स्थापना केली. १७०७ मध्ये स्कॉटलंड देखील किंग्डम ऑफ इंग्लंड सोबत सामील झालं आणि ‘किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन’ उदयास आलं. १८०१ मध्ये किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचे राज्य हे एकत्र आले होते तेव्हा त्याचं नाव झालं… ‘युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड‘.
१९२२ मध्ये आयर्लंडचा एक मोठा हिस्सा म्हणजेच दक्षिण आयर्लंड यातून वेगळा झाला आणि वेगळा देश म्हणून स्वतःला पुढे केलं. ‘रिपब्लिक ऑफ आयर्लंड’ असं नाव त्यांनी ठेवलं.
अशा सगळ्या घडामोडींनंतर अखेर युनायटेड किंग्डमचं
‘युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड’
असं नामकरण करण्यात आलं.
संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापक सदस्यांमध्ये या देशाचा समावेश होतो. तसंच हा देश संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा देखील सदस्य आहे. इंग्लंड, स्कॉटलंड, उत्तर आयर्लंड आणि वेल्स हे चारही देश ब्रिटनच्या राजघराण्याशी बांधील आहेत, पण एक देश म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे.
संपूर्ण युकेसाठी इंग्लिश हीच राजभाषा असली तरी प्रत्येक देशात त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेतच कामकाज चालतं. इंग्लंडची राजधानी लंडन आहे, वेल्सची राजधानी कार्डिफ आहे, स्कॉटलंडची राजधानी एडिनबरा आहे तर उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्ट आहे.
ग्रेट ब्रिटन :
ग्रेट ब्रिटन हे वायव्य फ्रान्स आणि पूर्व आयर्लंडमधील बेटाचं नाव आहे. हा युकेचाच एक भाग आहे. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स यांना एकत्रित ग्रेट ब्रिटन असं म्हणतात. हे तिन्ही प्रांत वेगवेगळे असून या तिन्ही प्रांतांच्या स्वत:च्या स्वतंत्र संसद आहेत. पण परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा यांसारखे मुद्दे ग्रेट ब्रिटनच्या फेडरल पार्लमेंटद्वारे ठरवले जातात.
बाकी, शिक्षण, रोजगार यासारखे अंतर्गत प्रश्न स्थानिक सरकारच्या अखत्यारीत येतात.
ग्रेट ब्रिटन हे जगातील नवव्या क्रमांकाचं मोठं बेट आहे. ज्याचं क्षेत्रफळ २,०९,३३१ चौरस किलोमीटर इतकं आहे. इंग्लंड ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात आहे. वेल्स हे दक्षिण-पश्चिम आणि स्कॉटलंड उत्तरेत आहे.
इंग्लंड :
आता वरच्या दोन्ही मुद्यांमध्ये स्पष्टता आली असेलच की इंग्लंड हा देखील स्वतंत्र देश आहे. सोबतच तो युके आणि ग्रेट ब्रिटनचा देखील एक भाग आहे. या देशाची स्वतःची क्रिकेट टीम आणि फुटबॉल टीम देखील आहे, ज्यात इतर देशांचे खेळाडू सहभागी होऊ शकत नाहीत.
पारंपारिकपणे इंग्लंडकडे युनायटेड किंग्डमचं ‘घर’ म्हणून पाहिलं जातं. कारण ज्याप्रमाणे इंग्लंडची राजधानी लंडन आहे तशीच युकेची राजधानी सुद्धा लंडनच आहे. याच ठिकाणी देशाची राणी एलिझाबेथ राहतात. म्हणूनच काही लोक पूर्ण युकेला संबोधित करताना ‘इंग्लंड’ असं म्हणतात पण ते साफ चुकीचं आहे.
एकंदरीत काय? तर ब्रिटिश लोक आले कुठून होते आणि गेले कुठे? याचं उत्तर… ‘युनाइटेड किंग्डम’ असं होऊ शकतं.
कारण युके ज्या चार देशांचा मिळून बनतो त्यात ब्रिटन आणि इंग्लंडचा समावेश होतो. पण तरी हे लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे की, युनायटेड किंग्डमला ग्रेट ब्रिटन आणि ग्रेट ब्रिटनला इंग्लंड म्हणणं चुकीचं आहे.
हे देश वेगवेगळे आहेत, त्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे. फक्त एकाच भूभागावर ते आहेत.
युनायटेड किंग्डम किंवा यूके हा एक देश आहे, ग्रेट ब्रिटन हे एक बेट आहे आणि इंग्लंड हा युनायटेड किंग्डमच्या चार प्रशासकीय भागांपैकी एक आहे.
हे ही वाच भिडू :
- भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका दाखवावाच लागतो ; यामागे इंटरेस्टिंग कारण आहे..!!
- धारावी उभी ब्रिटिशांनी केली, पण तिला साम्राज्य बनवलं ते मुंबईच्या पहिल्या हिंदू डॉननं
- युनिकॉर्न स्टार्टअप कंपन्यांत इंग्लंडला मागे टाकत भारत तिसरा आलाय