हवालाचा पैसा काय असतो..? हवालातून पैसै कसे पाठवतात..?
यंदा फाईट आहे. साहेबांन 10CR आणलेत, हवालाचे. आत्ता सुट्टी नाय. तिकीट मिळो अगर न मिळो. साहेबच येत असतेत.
निवडणुकीचा एक प्रकार असतो “वरच वातावरण.”
या वातावरणात तुम्हाला टिव्हीवरच्या बातम्या दिसतात, विकासकामे किती झाली यावर गळा काढून भांडणारे सामाजिक कार्यकर्ते दिसतात. आरोग्य, पाणी, रस्ते, वीज यासारख्या मुलभूत गरजेच्या गोष्टी किती झाल्या. आपल्या आमदारांनी विधानसभेत किती प्रश्न मांडले वगैरे चर्चेत दिसत. पण खर सांगतो यातल्या एकाही मुद्यावर लोक मतदान करत असतील अस आम्हाला तरी वाटत नाही.
लोक मतदान करतात ते हवेला. कुणाची किती हवा हा सर्वात मोठ्ठा निकष असतो. माणसांना जिंकणाऱ्या माणसालाच मतदान करा. या हवेला अनेक घटक कारणीभूत असतात.
त्यातला एक घटक म्हणजे “हवाला”.
हवालाचा पैसा येतो, त्यावर मतदान फिरवता येत हे सर्वांना माहिती. निवडणुक आयोगापासून ते ED पर्यन्त प्रत्येकाचे हात मोठे असतात पण ते हवाला रॅकेटपर्यन्त पोहचू शकत नाहीत. मध्यंतरी दिल्लीच्या निवडणुकांमध्ये आप सारख्या पक्षाला देखील हवाला मार्फत पैसा आल्याची बातमी आली होती.
थोडक्यात,
हा हवालाचा पैसा काय असतो, तो निवडणुकीत कसा वापरला जातो. तो संबधित व्यक्तिपर्यन्त कसा पोहचवला जातो. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बोलभिडूच्या मार्फत मिळतील.
हवाला मार्फत पैशाचा व्यवहार करण तशी सोप्पी गोष्ट असते. पण कशातलच काहीच माहिती नसणाऱ्या व्यक्तींना अनेकदा सोप्या गोष्टी अवघड वाटू शकतात.
म्हणून आपण काय करु दोन शहर मानू आणि दोन व्यक्ती मानू त्यांच्यात हवालाचा व्यवहार कसा होतो ते तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे गोष्टी सोप्या होतील.
समजा संदिप सांगलीत राहतो आणि संजय बीडमध्ये राहतो. संदिपला पन्नास लाखांची गरज आहे. त्यासाठी तो संजयला फोन करतो. संजयकडे पैसै आहेत पण ते कॅशमध्ये. काळापैसा. त्याचा हिशोब नाही. त्याने पैसे बॅंकेत टाकले तर व्यवहार पाहून त्याची चौकशी होवू शकते. पण संदिपला तर पैसे पाठवायचे आहेत.
अशा वेळी संजय बीडमधला हवाला एजेंट गाठतो. तो हवाला एजेंटला सांगतो सांगलीत पैसे पाठवायचे आहेत. किती पन्नास लाख. बीडचा एजेंट सांगलीच्या एजेंटला फोन करतो आणि पन्नास लाख त्याच्याकडे आत्ता रोख आहेत का त्याची चौकशी करतो. नसतील तर कधीपर्यन्त येतील ते विचारतो. बऱ्यापैकी हवाला एजेंट असणाऱ्या प्रत्येकाकडे मोठ्या प्रमाणात कॅश असतेच .
बीडचा एजेंट संजयचे पन्नास लाख घेतो. त्यानंतर तो संजयला एक पासवर्ड देतो. बऱ्याचदा हा पासवर्ड म्हणजे एखादा नंबर किंवा नाव असत. हा नंबर संजय फोन करुन आपल्या सांगलीच्या मित्राला संदीपला सांगतो.
आत्ता संदिप सांगलीतल्या हवाला एजेंटकडे जातो. त्या एजेंटला तो पासवर्ड सांगतो. पासवर्ड सांगितला की सांगलीचा एजेंट संदिपला लगेच पन्नास लाख देवून टाकतो. पण यात काही रक्कम कमीशन म्हणून असते. किती तर रक्कम कमी असेल तर एक टक्का नाहीतर त्याहूनही खूप कमी.
बीडवरुन सांगलीत पाच मिनटाच्या आत पैसे मिळतात. हेच कितीही लांब असणाऱ्या गावांबद्दल. म्हणजे बीड मधून अमेरिकेत काय किंवा दुबईत काय पाच दहा मिनटात हा खेळ होतो.
तुम्हाला हवालातून पैसे कसे पाठवायचे हे तर समजल असेल. त्याबद्दल आम्हाला धन्यवाद द्या.
आत्ता तुमच्या सुपीक डोक्यात एक प्रश्न आला असेल.
समजा बीड एजेंटने सांगलीच्या एजेंटला पैसै द्यायला लावले. पण कॅशची वाहतूकच झाली नाही. म्हणजे तिकडचा माणूस ५० लाख डबऱ्यात गेलाय आणि इकडे ५० लाख येवून पडलेत. आत्ता कस करायचं. तर काही नाही असाच व्यवहार सांगली टू बीड देखील होत असतो. प्रत्येक मिनटाला असे व्यवहार चालू असतात. त्यातून आठ दहा दिवसांनी कुणाकडे किती शिल्लक राहिले आहे याचा अंदाज घेवून पैसे प्रत्यक्ष ट्रान्सफर केले जातात. पण अशी वेळ खूप कमी वेळा येते.
आत्ता असले व्यवहार किती रक्कमेचे केले जातात?
आम्ही एका मित्राला फोन लावला. नाव न सांगण्याच्या अटीवर (आम्ही नाव छापलं तर आम्हाला घोडा लावू अस तो म्हणाला) सांगितल की, काहीजण कमीत कमी दहा लाख घेतात. त्यापेक्षा कमी असेल तर कुत्सित नजरेनं तुझ्याकडे पाहतात. जास्तीत जास्त किती रुपये पाठवतात अस विचारल्यावर मित्र म्हणाला, तुझी किती दानत आहे. 10CR, 50CR, 100CR किती आकडा सांग.
थोडक्यात किती मोठ्ठी रक्कम पाठवायची त्याला मर्यादा नाहीत.
आत्ता अजून एक प्रश्न,
असले व्यवहार कोण करत?
रोजच्या जीवनात हे व्यवहार मटका व्यापारी, दोन नंबरने व्यवहार करणारे आणि GST मुळे सर्व व्यवहार रोखीत करणारे व्यापारी, मार्केटयार्डवाले हा व्यवहार करत असतात. कच्ची बील काढली जातात. पैसै जास्त दिली जातात तेव्हा हवाला मार्फत पैसै पाठवणे हे सर्वात सोयीस्कर असल्याच सांगितल जातं.
यात राजकारणी लोकं असतात का..?
ख्यिक बाळांनो किती रे वेडे आहात तुम्ही हा काय प्रश्न झाला का. राजकारणी कशात नसतात. यत्र तत्र सर्वत्र. राजकारणी लोकांचा काळा पैसा पण याच माध्यमातून येतो. इलेक्शनच्या वेळेस असे व्यवहार लवकरात लवकर पुर्ण केले जातात. म्हणजे निवडणुका लागण्याच्या पुर्वी १ महिनाभर अगोदर हे सोपस्कार पुर्ण करुन घेतले जातात.
हवाला मार्केटची व्याप्ती किती आहे?
तुमची किती आहे. जिथं लाईट जात नाही तिथपण हवाला रॅकेट पाहचू शकतं. आमचे एक मित्र परत एकदा नाव न टाकण्याच्या अटीवर व टाकलं तर तुम्हाला पुण्यात येवून घोडे लावण्याच्या धमकीवर सांगतात की, गावागावत दुकानं असतात कधी केस कापायचं दूकान असतं तर कधी ऑनलाईन ट्रेडिंगच. रेग्युलर कस्टमर जिथे येतात जिथे संशय येत नाही अशा ठिकाणावरून हवाला मार्केट चालतं.
बर इतकं मोठ्ठ मार्केट असून पोलीस काहीच का करत नाहीत?
पोलीस काही का करत नाहीत. इंटरनेट असत न तसा हा भुलभुल्लैया आहे.पोलीसांनी एखाद्या हवाला एजेंटवर धाड टाकली तरी ते 0.0000000000000001 यापेक्षा कमी भागावर कारवाई करत आहेत. संपुर्ण महाराष्ट्रात जरी ही कारवाई झाली तरी ती इतक्याच भागावर असेल इतकं मोठ्ठ हे मार्केट आहे.
पैसै कोण देवू शकतं?
कोणीही. तुम्हाला एजेंटच नाव समजल तर तुम्हीपण पैसे देवू शकता. तुला कुणी पाठवलं? पैसै कसले आहेत? कोणी सांगितल? असले फालतू प्रश्न विचारायला त्यांच्याकडे वेळ नसतो. ते फक्त पैसै घेवून पासवर्ड देतात. फाफटपसारा मांडण्यात त्यांना इंटरेस्ट कधीच नसतो.
हे व्यवहार सुरक्षित असतात का?
दोन नंबरचा खेळ हा फक्त शब्दावर चालतो. कोटीत व्यवहार करणारे हे सर्वजण फक्त शब्दाच्या नावावर खेळतात. “हवाला” या शब्दाचीच निर्मीती हवाल्याने, संदर्भाने अशी आहे. त्याची “हवाला” आहे तू दे. असा त्याचा वाक्यात उपयोग. मित्र म्हणाला, एकवेळ बॅंकेच ट्रान्झेक्शन फेल जाईल पण हवाला कधी फेल जात नाही. इतक्या वर्षा कधीच व्यवहार फेल गेला नाही.
आत्ता सर्वात मोठ्ठा प्रश्न असे व्यवहार करावेत का?
जे बेकायदेशीर त्यापासून चांगल्या माणसाने लांब रहाव. चार पैसे टॅक्समध्ये गेले तर सरकारलाच पाकिस्तानवर विमान टाकायला परवडणार आहे न. नाहीतर सरकार युद्ध कस करणार. त्यामुळे आपण आपलं शांतपणे बॅंकेचे व्यवहार करावेत.
हे ही वाच भिडू.
- मटक्याचे आकडे कसे लावले जातात..? कशी असते मटक्याची भाषा
- घरबसल्या पैसे कमवण्याच्या आमिषाने भावाने फोन केला, आणि एक खेळ सुरू झाला.
- आम्ही त्या गुप्तरोगवाल्या डॉक्टरांना फोन केला आणि आमच्या फ्युजा उडाल्या !