राजकारणातला राडा सुरू झाला की, “पंढरपुरच्या बडवे” घराण्याचा उल्लेख का केला जातो..

शिवसेनेनतून बंड केलेले आमदार सध्या एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला आहेत. रोज शिंदे गटातील या आमदारांच्या संख्येत वाढच होत आहे. शिवसेनेतील हे आमदार जातायेत बघून २२ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत जनतेशी आणि या आमदारांशी संवाद साधला. परिणाम एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं ज्यामध्ये आमदारांची भावना नमूद करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंना उद्देशून आमदार संजय शिरसाठ यांनी सर्व आमदारांच्या वतीने लिहिलेलं हे पत्र आहे. पत्राचा आशय म्हणजे ‘मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील तुटत गेलेला संवाद’ ज्याला कारणीभूत ठरवण्यात आलंय ‘बडव्यांना’. 

काही बडव्यांमूळे आज ही स्थिती उद्भवल्याचं सूचकपणे या पोस्टमध्ये मांडण्यात आलंय.

सत्तेच्या या खेळात पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते “बडवे”..

कोण असतात हे बडवे, अन् एका घराण्याचा उल्लेख राजकारणात कायम का करण्यात येतो…

तर हे बडवे घराणं आहे पंढरपुरचं. विठ्ठलाचे पुजारी म्हणजेच बडवे. या बडव्यांचा इतिहास काय आहे याबाबत आम्ही वारकरी संप्रदायाचे अभ्यासक हभप सचिन पवार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा बोलभिडू सोबत बोलताना ते म्हणाले,

बडवे हे विठोबाची परंपरेने सेवा करणारं एक घर होतं. बडवे हे त्यांचं आडनाव. कमीतकमी गेल्या एक हजार वर्षांपासून म्हणजे ज्ञानेश्वर माउलींच्या आधीपासून हे घराणं पंढरपूरात विठ्ठलाची पूजा करत असल्याचे पुरावे सापडतात. पांडुरंगाच्या पूजेचा मान पिढ्यानपिढ्या याच घराण्याकडे होता. या घराण्यात प्रल्हाद महाराज बडव्यांसारखे खूप चांगले सत्पुरुष देखील होऊन गेले.

जेव्हा जेव्हा पंढरपुरावर संकट आलं तेव्हा त्यांनी विठोबाच्या मूर्तीचं संरक्षण केल्याचे पुरावे सापडतात.

पूजेसोबतच पंढरपुराच्या मंदिराचे नित्योपचार करणं, व्यवस्थापना बघणं असं काम त्यांच्याकडे होतं, असं सचिन पवार यांनी सांगितलं. 

मग असं नक्की काय झालं की त्यांचं नाव आज बदनाम झालंय?

तर मंदिरचं व्यवस्थापन बघत असताना हळूहळू या घराण्याने विठ्ठल मंदिरावर मक्तेदारी दर्शवण्यास सुरुवात केली, असं बोललं जातं. त्यांनी वारकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. संत चोखामेळा सारख्या संतांनी देखील त्यांच्या अभंगातून देखील बडव्यांचा अतिरेक, भक्तांचा मानसिक छळ आणि आर्थिक पिळवणूक याबद्दलची नाराजी विठुरायाकडे केल्याचं आढळतं.

धांव घाली विठू आतां चालूं नको मंद ।

बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ।।

असं संत चोखामेळांनी अभंगात लिहिल्याचं आढळतं.

जवळपास शंभर-सव्वाशे वर्ष बडवे विरुद्ध वारकरी समाज अशी खेच चालली. वाढत्या भाविकांच्या गर्दीचे नियोजन आणि सोई सुविधा करताना कमी पडणं तसंच भाविकांची मंदिर आणि परिसरात लुट करणं, असे आक्षेप त्यांच्यावर घेतले जाऊ लागले. ज्यामुळे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. 

१९६७ साली सर्वप्रथम राज्यशासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली. विठ्ठल मंदिरावरील बडवे घराण्याचे परंपरागत अधिकार काढून घेण्यासाठी या समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर विठ्ठल रुख्मीणीमंदिर कायदा १९७३ अस्तित्वात आला आणि या कायद्याने बडवेंचे अधिकार गोठवण्यात आले.

मात्र हा आपल्यावरील अन्याय आहे या भावनेने बडवेंनी या कायद्यालच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका १९७४ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. पुढे जवळपास ४० वर्ष लढा देऊनही बडवे समाजाच्या विरोधात सर्व निकाल लागल्याने अखेर..

 १४ जानेवारी २०१४ रोजी विठ्ठल मंदिर संपूर्णपणे शासनाच्या ताब्यात आलं. 

असा आहे या बडवे घराण्याचा इतिहास. याच वादग्रस्त इतिहासाने बडवे या शब्दाला राजकारण्याच्या वर्तुळात आणलं.

महाराष्ट्राच्या जनमानसावर वारकरी संप्रदायाचा खूप मोठा प्रभाव आहे. बडव्यांनी वारकऱ्यांना जो त्रास दिला त्यातून त्यांची भावना झाली की, विठोबाचं दर्शन घेताना आम्हाला बडवे त्रास देतात. म्हणून महाराष्ट्रात आपल्या नेत्याच्या आसपास असणारे लोक जे नेता आणि आपल्यात अडथळा ठरतात त्यांना ‘बडवे’ म्हणायची सुरुवात झाली.  

राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा ते म्हणाले होते,

“शिवसेना प्रमुखच माझं दैवत आहे. मात्र या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं असून त्यांच्यासोबत मला काम करायची इच्छा नाही. माझा लढा हा विठ्ठलाशी नाही, त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे”

अशाप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात नेता आणि कार्यकर्ता यांच्यात दुरावा निर्माण करणाऱ्या व्यक्तींसाठी बडवे हा शब्द सूचकपणे वापरण्याची पद्धत आहे. याच सूचक पद्धतीचा वापर आज संजय शिरसाठ यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलाय. आणि तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असणारे हे २-३ बडवे कोण? याची चर्चा सुरु झाली आहे.

तुम्हाला काय वाटतं, कोण असू शकतात हे व्यक्ती? शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात इतकी मोठी दरी पडण्याची कारणं काय असू शकतात? कमेंट्समध्ये सांगा..

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.