पाकिस्तानचं पाणी बंद करायच्या थापा मारून आपलं सरकार आपल्यालाच फसवतय.

मा. नितीन गडकरींनी ट्विटरवर रावी नदीचे पाणी पाकिस्तानात जाऊ न देण्याची घोषणा केली आणि भारताने सिंधू जलकरार मोडल्याच्या बातम्या सगळीकडे झळकल्या. याचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील, यावर चर्चा झाडल्या.

शासन-समर्थक माध्यमांनी उदोउदो केला आणि विरोधकांनी टीका केली.

आता पाकिस्तान ‘पाणी, पाणी’ करत लोटा घेऊन फिरणार असे चित्र निर्माण केले गेले. पण गडकरी नेमके काय बोलले आणि सिंधू जल करार काय आहे याकडे कोणी लक्षच दिले नाही.

तर, आपण एकदा हा करार काय आहे आणि भारत नेमके काय करणार आहे ते पाहू.

सिंधू जल करार, १९६०

साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जल करार संमत झाला. याअंतर्गत पश्चिमेतील(म्हणजे वरच्या) तीन नद्या, म्हणजेच सिंधू, झेलम आणि चिनाबचे पाणी पूर्णपणे पाकिस्तान वापरेल आणि पूर्वेच्या(म्हणजे खालच्या) तीन नद्यांचे म्हणजे रावी, ब्यास आणि सतलजचे पाणी पूर्णपणे भारत वापरेल, असे ठरले.

तसेच, पश्चिमेच्या तीन नद्यांचे पाणी न थांबवता, म्हणजे रन ऑफ दि रिव्हर धरणे बांधून भारताला विद्युतनिर्मिती करता येईल. पण मोठे धरण बांधून पाणी साठवून मात्र ठेवता येणार नाही.

 

वरच्या तीन नद्या तुमच्या, खालच्या तीन आमच्या, असा साधासोपा आहे सिंधू जल करार.

काल गडकरी काय बोलले? गडकरी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत की,

“आम्ही आपल्या हिश्श्याचे पाणी पाकिस्तानात जाणे थांबवू.”

पूर्वेकडील नद्यांचे पाणी(म्हणजे आपले हक्काचेच) जम्मू-काश्मीर आणि पंजाबला पुरवू.”

म्हणजे आतापर्यंत आपण आपल्या हिश्श्याचे पाणी पूर्णपणे वापरत नव्हतो का? तर नव्हतो वापरत. काही पाणी पाकिस्तानात वाहून जायचे. आपले पूर्ण पाणी वापरता यावे म्हणून शासनाने फार पूर्वी काही योजना तयार केल्या होत्या.

पहिली म्हणजे रावी नदीवर शाहपूर-कांडी धरण. दुसरी योजना म्हणजे उझ नदीवर धरण बांधणे, तिसरी म्हणजे दुसरा रावी-ब्यास जोडकालवा आणि चौथी योजना म्हणजे ब्यास-सतलज जोडकालवा. सतलजमध्ये येणारे काही पाणी हरियाणाला आणि दिल्लीला मिळावे म्हणून एक सतलज-यमुना जोडकालवादेखील बांधला जाणार होता. हा या साखळीतील अखेरचा प्रकल्प.

हे सगळे प्रकल्प या ना त्या कारणाने इतकी वर्षे रखडत राहिलेत.

पाणी पाकिस्तानात वाहत राहिले. २०१६ च्या उरी हल्ल्यानंतर हे प्रकल्प पूर्ण करायचा निर्धार करण्यात आला. पहिल्या तीन प्रकल्पांना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. गडकरी आता नवीन काही बोललेत का? नाही बोललेत. त्यांनी जुन्याच निर्धाराचा पुनरोच्चार केला.

आज घोषणा केली म्हणून उद्या पाणी वाहणे बंद होईल का?

तर नाही.

हिमालयात धरण आणि कालवे बांधणे सोपे नाही. सतलज-यमुना जोडकालवा पंजाबातील शेतकऱ्यांच्या आणि नेत्यांच्या विरोधामुळे ८५% वर येऊन अडकलाय. भौगोलिक आव्हाने आहेत, अधिग्रहणाचे लफडे आहेत, राज्याचे आपापसांत वाद आहेत, कोर्टात तारखा पडल्या आहेत.

हे सगळे निस्तारून झाले की सतलजचे पाणी यमुनेत वाहू लागेल. आपण आतापासून फटाके फोडायची गरज नाही. पाकिस्तानचा थयथयाट होईल का? पाकिस्तान तहानेने कासावीस होईल का? तीदेखील शक्यता नाही.

कालच्या गडकरींच्या ट्विटनंतर पाकिस्तानच्या जलसंसाधन मंत्रालयाचे सचिव ख्वाजा शुमाईल म्हणाले की भारताने आपल्या वाट्याचे पाणी वापरायला पाकिस्तानची काहीच हरकत नाही, कारण हा तर कराराचा भाग आहे.

  • भिडू संकेत पारधी.

हे ही वाचा. 

1 Comment
  1. Deepak Deshmukh says

    1947 पासून प्रथमच फेकू सरकार भारतात पहायला मिळत आहे,हे सरकार सतत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकते.इतके फेकू सरकार यानंतर भारतात कधीच येणार नाही याची जनतेने काळजी घ्या़यला हवी.

Leave A Reply

Your email address will not be published.