कर्नाटकाचे मुख्यमंत्री चामराजनगरला जायला का घाबरतात…?

 

चामराजनगर. दक्षिण कर्नाटकातील एक जिल्हा. कर्नाटकच्या गेल्या ४ दशकांच्या राजकारणात या जिल्ह्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण झालंय. गेल्या ४ दशकात चामराजनगर हा कर्नाटकच्या राजकारणातील ‘शापित’ जिल्हा म्हणून समोर आलाय. कमीत-कमी या जिल्ह्याची प्रतिमा तरी तशीच झालीये. काही लोक याला अंधश्रद्धा म्हणू शकतील किंवा काही लोक निव्वळ योगायोग म्हणू शकतील पण गेल्या ४ दशकात चामराजनगरला भेट दिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला आपली खुर्ची खाली करावी लागली आहे. ही गोष्ट गेल्या ४ वर्षात अनेक वेळा कर्नाटकातील राजकारण्यांनी आणि तेथील जनतेने अनुभवली आहे. त्यामुळे गेल्या २ दशकात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एक तर या जिल्ह्याला भेट देणं टाळल आहे किंवा आपला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या काही दिवसात त्यांनी या जिल्ह्याला भेट दिलीये. कारण त्यांना भीती असते की आपण चामराजनगरला भेट दिली तर आपली सत्ता जाईल की काय..? जाणून घेऊयात नेमका काय इतिहास आहे या चामराजनगरचा आणि हा सिलसिला कधीपासून सुरु झाला ते…

डी. देवराज युआरएस– १९८० साली डी. देवराज युआरएस हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा हा दुसरा कार्यकाळ होता. त्यावेळी त्यांनी चामराजनगरला भेट दिली होती. या भेटीनंतर ६ महिन्याच्या आत त्यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं होतं.

आर. गुंडू राव– डी. देवराज युआरएस यांच्यानंतर आर. गुंडू राव हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री झाले. १९८२ मध्ये त्यांच्यासोबत देखील हाच किस्सा घडला. चामराजनगर भेटीनंतर १९८३ साली त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली.

रामकृष्ण हेगडे– १९८३ मध्ये कर्नाटकात प्रथमच ‘जनता पार्टी’ सत्तेवर आली होती. गुंडू राव यांच्यानंतर रामकृष्ण हेगडे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. १९८८ साली त्यांनी चामराजनगरला भेट दिली. त्यानंतर काही दिवसातच रामकृष्ण हेगडे यांच्यावर काही राजकारण्यांचा आणि उद्योगपतींचा फोन टॅपिंगचा आरोप झाला. या प्रकरणात त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

एस.आर.बोमैई– रामकृष्ण हेगडे यांच्या राजीनाम्यानंतर जनता पार्टीने १८८८ साली सत्तेची सूत्रे एस.आर.बोमैई यांच्या हातात दिली. एप्रिल १९८९ मध्ये केंद्र सरकारने कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याने बोमैई यांना देखील सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यांनी देखील मुख्यमंत्रीपद गमावण्यापूर्वी चामराजनगरला भेट दिली होती.

वीरेंद्र पाटील– राष्ट्रपती राजवट उठविण्यात आल्यानंतर कर्नाटकात निवडणुका झाल्या आणि काँग्रेस सत्तेत आली. वीरेंद्र पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. ऑक्टोबर १९९० मध्ये कर्नाटकच्या काही भागात धार्मिक तणाव निर्माण होऊन दंगली झाल्या. या दंगलीनंतर १९९१ मध्ये राजीव गांधींनी पाटील यांना सत्ता सोडण्याचे आदेश दिले. असं मानलं जातं याआधी काही दिवसांपूर्वी वीरेंद्र पाटील यांनी चामराजनगरला भेट दिली होती.

९० च्या दशकात सलग ५ मुख्यमंत्र्यांना आपली सत्ता सोडावी लागणं आणि त्यामागे हे चामराजनगर भेट प्रकरणाचं शुक्लकाष्ट असणं असा एक पॅटर्न तयार होऊ लागल्यानंतर चामराजनगर भोवती गूढतेचं वलय निर्माण व्हायला लागलं. चामराजनगरला भेट देणं अशुभ मानलं जाऊ लागलं. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती  चामराजनगरला भेट देणं टाळू लागले. त्यामुळे जवळपास पुढची  १६ वर्षे कर्नाटकच्या कुठल्याच मुख्यमंत्र्याने चामराजनगरला भेट दिली नाही. या १६ वर्षादरम्यान एस.बंगारप्पा, विराप्पा मोईली, एच.डी. देवेगौडा, जे.एच. पटेल, एस.एम. कृष्णा आणि धरमसिंग हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी होते.

गमतीची गोष्ट अशी की १९९७ साली मैसूरचं विभाजन करून चामराजनगर जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. तोपर्यंत चामराजनगर मैसूरचा भाग होता. त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री असणाऱ्या जे.एच. पटेल यांनी तर जिल्ह्याचा लोकार्पनाचा कार्यक्रम देखील चामराजनगरला न घेता चामराजनगरपासून साधारणतः ५० किलोमीटरच्या अंतरावरील कोलेग्गल येथील एम.एम. हिल्समध्ये आयोजित करून चामराजनगर भेट टाळली होती. हा सिलसिला २००७ साली संपला, जेव्हा ‘जनता दला’च्या एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री असताना चामराजनगरला भेट दिली. विशेष म्हणजे काही महिन्यातच त्यांना देखील आपली सत्ता गमवावी लागली. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी आलेल्या यदियुरप्पा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांनी चामराजनगर भेट टाळली. यदियुरप्पा यांच्यानंतर डी.व्ही.सदानंद गौडा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले त्यांनी देखील चारला भेट दिली नाही. डी.व्ही.सदानंद गौडा यांच्यानंतर सत्तेत आलेल्या जगदीश शेट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शेवटच्या काही दिवसात चामराजनगरला भेट दिली आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जगदीश शेट्टर यांचा पराभव झाला.

चामराजनगरचा हा असा इतिहास असतानाही कर्नाटकाचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या काळात आत्तापर्यंत आपल्या पूर्वसुरींनी घालून दिलेला पायंडा मोडून काढताना चामराजनगरला भेट देण्याचा धडाका लावत डझनभरापेक्षा अधिक वेळा चामराजनगरला भेट दिलीये. त्यामुळे सिद्धरामय्या यावेळी परत निवडणूक जिंकतील का आणि चामराजनगरला ‘शाप’मुक्त करून मुख्य प्रवाहात आणतील का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.