कुलदैवत म्हणजे नेमकं काय ? कसे ओळखाल आपले कुलदैवत ?

काही दिवसापूर्वी मित्राची लग्नाची निमंत्रणपत्रिका आली. भावाचा फोन आला की भावा आपलं लग्न ठरल आहे, नक्की ये. दोस्ताने खूप आग्रह केला होता पण ऑफिसच्या कामामुळ जाताच आलं नाही. बिचाऱ्यान लग्नानंतर दोन दिवसांनी परत फोन केला की लग्नाला आला नाहीस आता कुलदेवतेच्या पूजेला तरी ये.

त्या पूजेला गेलो. पण कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवत कोठे आहे ? त्याचे महत्व काय ? कुलदैवतासंबंधी आपल काय कर्तव्य आहे? असे अनेक प्रश्न मनात होते. तिथे हजर असलेल्या गुरुजीना सहज विचारलं तर त्यांनी सगळ पुराण उलगडून सांगितल.

“विभक्त्त कुटुंबपद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी जेष्ठ मंडळी जवळ नसतात आणि आपण फक्त एक रूढी परंपरा म्हणून या गोष्टीचे पालन करत राहतो. आणि हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात.”

कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ

‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून ‘कुलदेवता’ हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हंटलय.

कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.

आपला कुलदैवत कोण असतात?

कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात. बहुतेक करून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे ‘कुलदैवत’ असते. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदैवत यांचे स्थानी जाउन दर्शन घ्यावं असं म्हटल जात.

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व

पुराणात सांगितल आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे.

त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात.

एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे?

कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जात. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंबकबिला वाढला की त्याला कुळ म्हणत असावेत . अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.

उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेकांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची आईभवानी, कोल्हापूरची अंबाबाई असलेल आढळत.

कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

कुलदेवी/देवता माहीती नसल्यास खालीलपैकी ज्या देवावर भक्ति आहेत त्यांची उपासना करावी.

मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया
विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम
शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती
आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली
शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता – गणेश
देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)
वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही )

कुळदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. त्यामुळेच जर आपल्याला कुलदैवत ठाऊक नसेल तर ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचे नामस्मरण करावे असं म्हणतात.

ग्रामदैवत हेच कुलदैवत असते का?

ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते. काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकते पण ते तसेच असेल असा काही नियम नाही.

कुळ म्हणजे काय?

कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब.  बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते.

काही जणांना वाटत कुळ म्हणजे जात. तर ते चुकीच आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात. कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते.

कुलदैवत सगळ्या कुटुंबाला, आपल्या घराण्याला, आपल्या इतिहासाला, आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो.

 

3 Comments
  1. Nandini Lambe says

    नवीन पिढीने काय करायला पाहिजे?
    कुलदैवत श्री बालाजी आहे. आपण लक्ष्मी व्यंकटेश म्हणतो तेव्हा लक्ष्मी म्हणजेच कुलस्वामिनी म्हणता येईल का?

  2. संजोग+पिसे says

    हीच बोंब आहे.. कुलदेवी म्हणून लोकं 2 3 नावं सांगतात.. तर नक्की कुलदेवी किंवा कुलदेवता कोण हेच कळत नाही

  3. आमचं रेकॉर्ड व. कुलदैवत माहीत नाही काय करावे

Leave A Reply

Your email address will not be published.