राज ठाकरेंनी मशिदींच्या भोंग्यांना विरोध केला, इतर नेत्यांची भूमिका पण जाणून घ्या

प्रार्थनेला विरोध नाही पण कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगितलं गेलंय. मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार,” – राज ठाकरे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत बोलले.

आणि पुन्हा एका मशिदीवरील भोंग्यांचा वादग्रस्त विषय चर्चेत आला आहे.

अलीकडेच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत अशी मागणी केली आहे कि, “इथून पुढे महाराष्ट्रातील लाऊडस्पीकवरील सर्व अजान बंद झाले पाहिजेत”.

तसं तर आजवर बऱ्याचदा अजानवर वाद झालेत… सोनू निगम सारखे सेलिब्रेटी अजान कॉंट्रोव्हर्सी मध्ये अडकले होते.

 या सगळ्या गोंधळात अजान म्हणजे काय ? अजानचं मुस्लिम धर्मात काय महत्व आहे? महाराष्ट्रात अजानवरून वाद का होतोय आणि  राजकीय पक्षांची अजानच्या बाबतीत काय भूमिका राहिलीय ?  

 थोडक्यात अजान म्हणजे…

अजान म्हणजे अपील करणं, अलर्ट करणं की, आता नमाज पढण्याचा वेळ झाला आहे. सर्वांनी या आणि नमाज पढा. काही लोकं कामात व्यस्त असतात, त्यात त्यांना आपल्या प्रार्थनेची वेळ झालीये हे कळावं म्हणून नमाज पढण्याच्या १० मिनिट आधी ही अजान पढली जाते. थोडक्यात अजान एक प्रकारचा अलार्म असतो.

मुस्लिम धर्मातलं अजानच महत्व आणि इतिहास पाहिला तर…

मुस्लिम धर्माचं पवित्र ठिकाण म्हणजे मदिना. जेंव्हा मदिना येथे सामूहिक प्रार्थनेसाठी मशिदी बांधल्या गेल्या, तेव्हा लोकांना प्रार्थनेसाठी कसे बोलावायचं हा प्रश्न पडला. प्रेषित मोहम्मद यांनी आपल्या साथीदारांशी याविषयी सल्लामसलत केली.

कुणी म्हणालं प्रार्थनेच्या वेळी ध्वज उभारावा. कोणी असे सुचवलं की उंच ठिकाणी आग लावावी जेणेकरून लोकांना कळेल, कुणी म्हणत होतं बिगुल किंव्हा घंटा वाजवावी, पण या सगळ्या कल्पना प्रेषित मोहम्मद यांना आवडल्या नाहीत.

शेवटी प्रेषित हजरत मोहंमदांनी मक्का विजयी केल्यानंतर हजरत बिलाल यांना पवित्र काबा वर चढवून अजान द्यायला लावली.  प्रेषित हजरत मुहम्मदांनी अस्पृशतेविरुद्ध पाऊल उचलून अजान द्वारे समतेचा संदेश या जगाला दिला. त्यांनी हजरत बिलाल यांनाच अजान देण्यासाठी निवडलं कारण हजरत बिलाल हे एक हबशी गुलाम होते.

त्यानंतर प्रत्येक प्रार्थनेसाठी त्याच प्रकारे अजान दिली जाते.  मुएज्जिन म्हणजे जो व्यक्ती अल्लाहू अकबर म्हणत अजान सुरू करतो. थोडक्यात या अजानच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ हा खूप खोल आणि अल्लाहला साद घालणारा असतो. अजान फक्त प्रार्थनेची साद नसून एकेश्वराद्वारे भक्ती, समता, बंधुता, आणि समानतेचा संदेश आहे.

आता अजान लाऊडस्पीकरवर द्यावी की नाही याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. सरकारमध्ये असलेली आणि हिंदुत्ववाद स्वीकारलेली सेना आता अजानच्या वादावर का गप्प आहे असा प्रश्न विरोधक करतायेत.

यानिमित्ताने शिवसेनेची, राष्ट्रवादीची , भाजपची अजान वर काय भूमिका राहिलीय हे बघूया…

बाळासाहेबांचा याबाबततचा एक किस्सा म्हणजे, २००५ मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होती. सभेत बाळासाहेबांचं भाषण सुरू झालं. भाषण ऐन मध्यावर असतानाच जवळच्या एका मशिदीत अजान सुरु झाली. मैदानात अचानक सन्नाटा पसरला आणि बाळासाहेब देखील भाषण करता करता थांबले. अजान संपली आणि बाळासाहेबांनी हाच धागा पकडत औरंगाबादच्या जनतेला उद्देशून प्रश्न विचारला हेच…

याचसाठी  विचारतोय…तुम्हाला औरंगाबाद हवंय कि संभाजीनगर? 

बस्स…त्यांचा हाच डायलॉग निर्णायक ठरला अन या निवडणुकीत युतीला यश मिळालं. हा मुद्दा होता निवडणुकीचा. 

पण बाळासाहेब म्हणायचे “आम्हाला प्रत्येक धर्म प्यारा आहे. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. फक्त त्यात राष्ट्रीयत्व असायला पाहिजे. जे मुस्लीमधर्मीय राष्ट्रीयत्व मानतात तेच आमचे आहेत. तसं तर आपण हेही जाणून आहोत की, मातोश्रीवर शिवसेनाप्रमुखांनी मुस्लीम जोडप्याला नमाज पढण्याची परवानगी दिली होती.

२०२० मध्ये शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लीम मुलांसाठी ‘अजान पठण’ स्पर्धा आयोजित केली होती. त्यावर भाजपने बरीच टीका केली होती.

आणखी एक म्हणजे २०१८ मध्ये औरंगाबादमध्ये एक कार्यक्रमात सुरू होता. महापौरांचं भाषण सुरु असतानाच अजान चा आवाज आला आणि आदित्य ठाकरेंनी महापौरांचं भाषण थांबवण्याची सूचना केली होती. हा वारसा आपल्याला आजोबांकडून मिळाल्याचही ते बोलले.

भाजपबाबत बोलायचं तर,

२०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारासभेत भाजप अध्यक्ष अमित शहा यांचं भाषण सुरू होतं. तितक्यात जवळच्या मशिदीतून अजान सुरु झाली म्हणून. आणि लागलीच अमित शहांनी आपलं सुरु असलेलं भाषण थांबवलं होतं.

राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत बोलायचं तर, आत्ता गेल्या १५ मार्च ची घटना आहे, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत होते. अजित पवार भाषण करु लागताच जवळच्या मशिदीमधून अजान सुरु झाली. अजानचा आवाज येताच अजित पवारांनी आपलं भाषण थांबवलं. त्यांच्या या कृतीची कार्यकर्त्यांमध्ये बरीच चर्चा झाली. 

आता प्रसाद लाड यांच्या अजान बंदीच्या मागणीवर अजित पवार यांनी खंत व्यक्त केली कि, विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा केली जातेय.

थोडक्यात काय सगळे राजकीय नेते व्यक्तिगत जीवनात इतर धर्मांचा आदर करतात. असं असतांना अजानचे, हलाल मटणाचे  वाद येतातच कुठून ? 

तर हा वाद पाहता हे लक्षात घेतलं पाहिजे कि, अजान ला विरोध नाहीये तर लाऊडस्पीकरवरून अजान पढली जाते त्याला विरोध आहे. पण आरोप तर असेच होतायेत कि, मशिदीवरची अजान बंद करणे हा भाजपचा धार्मिक आणि राजकीय अजेंडा आहे.

पण याच्या पुढं जाऊन सामान्य नागरिकांचं बघितलं तर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत कि, लाऊडस्पिकर वरची अजान असो वा मोठ्याने वाजवली जाणारी देवांची गाणी, भजन असोत हे सगळंच बंद झालं पाहिजे.

याच मतांवरून सोनू निगम, आरोह वेलणकर असे सेलिब्रेटी वादात सापडले होते. सोनू निगमने २०१७ मध्ये असंच एक ट्विट केलेलं, मी मुस्लिम नाही आणि मला अजानमुळे सकाळी उठावे लागते. भारतातील ही सक्तीची धार्मिकता कधी संपणार? ही फक्त गुंडगिरी आहे. यानंतर देशभरातील मुस्लिम संघटना सोनू निगमच्या विरोधात होत्या. त्याच्या विरोधात एका मौलवीनेही फतवा काढला होता.

सद्याचा या सगळ्या वादात एका व्यक्तीचा उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे मुंबईचे मोहम्मद अली उर्फ ​​बाबू भाई. 

हे मोहम्मद भाईं लाऊडस्पीकरद्वारे अजान देणे गैर-इस्लामी मानतात. ते बंद करण्यासाठी ते २०-२५ वर्षे धडपडले. लाऊडस्पीकर अलीकडच्या काळात आले असतील पण इस्लाम धर्म हजारो वर्षे जुना आहे. या धर्माला लाऊडस्पीकरची आवश्यकता नाही असं ते म्हणतात. त्यांनी यासाठी कायदेशीर लढाई लढत आत्तापर्यंत सात मशिदींतील लाऊडस्पीकर बंद केले आहेत….इथे हे लक्षात घ्या कि, बाबूभाईंचा लढा हा धर्माविरुद्ध नाही, तर धर्माच्या नावाखाली जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त आणि अनावश्यक गोष्टींविरुद्ध आहे.

आता याबाबत कोर्ट काय म्हणतं ? 

ऑगस्ट २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरच्या वापरावर सुनावणी केली होती. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकरचा वापर केला जाणार नाही, आणि जरी कुणी तसा वापर केला तर एक लाख रुपयांपर्यंत दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असा निर्णय हाय कोर्टाने दिला होता.  मात्र, असे असतानाही अनेक धार्मिक स्थळांवर प्रतिबंधित काळातदेखील लाऊडस्पीकर सुरूच असतात अस बोललं जातं …

कर्नाटक हायकोर्टने नोव्हेंबर २०२१ मध्ये लाऊडस्पीकरवरून अजानची गरज नाही. कारण इस्लामचा तो हिस्सा नाही असं विधान केलं. तर उत्तर प्रदेश हाय कोर्टाने जे यंत्र पैगंबरांच्या काळात अस्तित्वात नव्हते, ते इस्लामचे अत्यावश्यक व अंगभूत घटक असूच शकत नाही अशी सुनावणी केली होती.

कोर्टाचे विधानं आणि अजान चा इतिहास, त्याचा उद्देश आणि राज ठाकरेंसारख्या राजकीय नेत्यांच्या मागण्या पाहता सद्या चालू असलेला हा मशीदी वरील भोंग्यांचा वाद आणखी काय वळण घेते ते पाहणं महत्वाचं आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.