व्हिडिओ कॉल पर बुलाती है मगर जानें का नहीं !

Sextortion 

शब्द तसा लहानाय भिडू. पण कसंय ना अर्थ खूप गहन आहे. म्हणजे जर एकदा का तुम्ही अडकलात यात, तर मग लै अवघड होतंय. त्यामुळे कसंय काळजी घेतलेली बरी असते. तर हे प्रकरण नक्की काय असतं म्हणून मी आधी माझ्या मित्रा बर घडलेली गोष्ट सांगतो. आणि मग अशी सिच्युएशन जर तुमच्या बाबतीत झाली तर काय करायचं हे ही सांगतो.

तर माझा एक मित्र आहे, कोल्हापुरातल्या एका गावातला. गावात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवल्यामुळे भलताच फेमस झाला तो. एक दिवस त्याला फेसबुक वर एका पोरीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. गड्यान एक्सेप्ट केली. पुढं बोलणं वाढलं. प्रेम झालं. आता प्रेम झालं, पण हा लांब ती पोरगी लांब. म्हणून हे दोघ व्हिडिओ चॅटवरच झाले सुरु. त्या पोरीनं नको त्या अवस्थेतले काढले पोराचे फोटो. त्याला माहित बी नाही.

झालं दुसऱ्या दिवशी पासून पोरगी गायब आणि माणसाचे यायला लागले याला फोन. माणसानं केलं याला ब्लॅकमेल. लाखभर रुपये मागितले. पोरग म्हणलं देत नाही जा. मग काय, झाले उघडे *गडे फोटो गावात व्हायरल. अब्रूची लख्तर पार वेशीवर. आता या प्रकाराला म्हणायचं

हनी ट्रॅप किंवा सेक्सटाॅर्शन

आता सविस्तरपणे वाचा कि सेक्सटाॅर्शन म्हणजे नेमकं काय असतं, कसं घडतं ?

बऱ्यापैकी पुरुष मंडळी फ्लर्टिंग आणि व्हर्च्युअल सेक्स करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. त्यात मग व्हॉट्सअप काॅलिंग, फेसबुक व्हिडिओ कॉल, इन्स्टा व्हीडिओ कॉल आणि बऱ्याच वेबसाईट असतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याच ऑनलाईन लोकांशी भेट होते. पण आपण कोणाशी बोलतोय हेच त्यांना माहीत नसतं. मग त्यात बरेच फेक आयडी असतात. एखादा आरोपी एखाद्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून किंवा इतर बनावट सोशल मीडियातून मैत्री करतात. नंतर क्लोज झाल्यासारखे भासवतात.

पुढं माझ्या मित्रच झालं तसंच की ओ… 

समोरच्या माणसाला व्हॉट्सअप काॅलिंगद्वारे काही दिवस संवाद साधतात. आणि नंतर तो व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला कि त्याच्या बरोबर सेक्श्युअल इंटरॅक्शन वाढवतात. आता समोर मोठा मासा असेल तर जाळ्यात ओढण्यासाठी स्त्रीचा वापर मोठा प्रमाणात होतो किंवा काही स्त्रीया पुरूषांना जाळ्यात ओढण्यासाठी अशाप्रकारचे कृत्य करतात.

त्या व्यक्तीचा कॅमेऱ्यासमोर सेक्श्युअल इंटरॅक्शन करताना एकदा व्हिडिओ रेकाॅर्ड झाला की, तोच व्हिडिओ किंवा फोटो त्याच व्यक्तीला शेअर केले जातात. आणि धमकी दिली जाते की, हे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो तुझ्या मित्रांना किंवा कुटुंबाला शेअर केले जातील. त्यांच्या या धमकीमुळं त्या  व्यक्तीला समजत कि आपण माती खाल्ली आहे. 

सेक्सटाॅर्शनमध्ये कधीकधी स्त्रियादेखील असतात. ब्लॅकमेल करून सेक्सटाॅर्शन करण्यास पुरुषाला आणि महिलेला भाग पाडलं जातं. धमकी देत पैसे उकळले जातात. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे कुणा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल बोलताना काळजी घ्यावी. 

पण तरी सुद्धा आपल्याकडून माती खाल्लीच गेली तर काय करता येईल ?

पहिलं तर अजिबात घाबरायचं नाही. जेव्हा तुमच्या पहिल्यांदा लक्षात येईल की, तुम्ही सेक्सटाॅर्शनच्या जाळ्यात अडकला आहात, पोलिसांशी संपर्क साधा. 

कारण काय होत बघा…

केसमध्ये आरोपींकडून पैशांची मागणी झाली, आणि तुम्ही जर पैसे दिले तर कशावरुन ते तुमच्या  लैंगिक कृत्याचा व्हिडिओ किंवा फोटो डिलीट करतील. काय सांगावं पुन्हा तो व्हिडीओ दाखवून तुमच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली जाईल.

त्यामुळे अजिबात संवाद साधू नका. कारण कसंय ना, आरोपीकडून येणाऱ्या धमक्यांना तुम्ही प्रतिउत्तर देत राहिलात, तर आरोपींना असं वाटू शकतं की, तुमच्याकडून आणखी पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्हाला ते सारख्याच धमक्या देऊन पैसे उकळतील.

त्यामुळे सरळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा. तुमच्या बाबतीत जे घडलं आहे, ते सविस्तर सांगा. आणि समजा, तुमचं वय १८ वर्षांच्या खाली असेल, तर घरातील मोठ्या लोकांशी संवाद साधा. प्रसंगी घरच्यांचा मार खावा लागला तरी चालेल. पण आपल्या घरातल्या लोकांना सोबत घेऊन पोलिसांकडे तक्रार करा.

पण हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही एक करू शकता बघा,

बुलाती है मगर जाने का नही 

हे तत्व पाळा. लै फायदा होईल बघा.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.