बॉलिवूडला घाम फोडणारी एनसीबी नेमकी आहे तरी काय…

आर्यन खानसह इतर काहींना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अर्थात एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर  छापा टाकून अटक केली होती. या सर्व प्रकारानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एक-एक करत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थितीत केले आणि मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनाच आरोपीच्या कटघऱ्यात उभे केले.

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर देशात सर्वाधिक चर्चा होतीये ती एनसीबीची. यानंतर अनेकांकडून प्रश्न विचारण्यात येतो की, ही एनसीबी नेमकी काय आहे, हिची स्थापना कधी झाली, नेमकं कुठले काम या संस्थेला असते, या संस्थेचा प्रमुख कोण असतो.

याचा बोल भिडूने घेतलेला आढावा.

सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात एनसीबी स्थापन कधी झाली

१७ मार्च १९८६ रोजी एनसीबी या केंद्रीय संस्थेची स्थापना करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत ही संस्था काम करत करते.  केंद्र आणि राज्यात समन्वय ठेवण्याची जबाबदारी एनसीबीवर असते. १९६१ मध्ये अमली पदार्थ विरोधी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारला होता. त्यानुसार एनसीबीची स्थापना करण्यात आली आहे.

देशभरात एनसीबीचे कामकाज हे झोन ​​आणि सब-झोन्सद्वारे चालते. हे झोन अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, इंदूर, जम्मू, जोधपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पाटणा येथे आहेत. तर सब-झोन अजमेर, अमृतसर, भुवनेश्वर, डेहराडून, गोवा, हैदराबाद, इंफाळ, मंदसौर, मदुराई, मंडी, रायपूर, रांची आणि कोची येथे आहेत.

एनसीबीची कार्ये

  • केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय साधून अमली पदार्थाचा बेकायदेशीर व्यापार करणाऱ्यांवर कारवाई करणे.
  • आंतरराष्ट्रीय करारानुसार अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी इतर देशातील आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मदतीने ड्रग्सचा व्यापार, त्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करणे.
  • ड्रग्सचे सेवन करणाऱ्यांना पकडून जेल मध्ये पाठवणे हेच एकमेव काम एनसीबीला नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इतर मंत्रालये आणि विभागद्वारे अंमली पदार्थांच्या गैरवापराशी संबंधित प्रकरणांवर केलेल्या कारवाईचे समन्वय करण्याचे काम एनसीबी करते.

एनडीपीएस कायद्या अंतर्गत कारवाईचे अधिकार

नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर वापर रोखण्याचे काम एनसीबी  करते. एनडीपीएस कायद्या अंतर्गत अमली पदार्थ म्हणजेच ड्रग्सचे उत्पादन, विक्री, खरेदी, ताबा, सेवन आणि ड्रग्जची तस्करी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येते. या नियमांचे  उल्लंघन करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. या कायद्यात आता पर्यंत तीनदा सुधारणा करण्यात आल्या आहेत.

एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत एनसीबी अमली पदार्थ शोधते, जप्त करते आणि ते वापरणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकारही एनसीबीला आहे. या कायद्याच्या अंतर्गत कारवाई केलेल्या व्यक्तींना शिक्षेबरोबरच आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

सध्या एनसीबीचे महासंचालक हे सत्य नारायण प्रधान असून ते १९८८ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. एनसीबी महासंचालक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील, भारतीय महसूल सेवा आणि निमलष्करी दलांमधील अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते.

 

एनसीबीचे ध्येय काय आहे?

“बुद्धीमत्ता, अंमलबजावणी, समन्वय” या ब्रीदवाक्यासह एनसीबी काम करते. भारतातील अमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध वाहतूक रोखणे आणि त्यांचा सामना करणे या मिशनद्वारे ‘ड्रगमुक्त समाज’ची संकल्पना एनसीबीची आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये एनसीबीने बुद्धिमत्तेच्या जोरावर आपले तगडे नेटवर्क उभे केले आहे. ज्यामुळे संघटितपणे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गटांना शोधणे सोपे झाले आहे. तसेच UNODC, INCB इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सीसह भारताची नोडल एजन्सी म्हणून देखील काम करते.

UNODC हे युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम आणि INCB म्हणजे इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड होय.अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात भारताच्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांच्या अंमलबजावणी आणि परदेशातील औषध कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना एनसीबी मदत करत असते.

एनसीबी ही इतर तपास यंत्रणांच्या  कर्मचार्‍यांना मादक पदार्थांच्या तस्करीशी लढण्यासाठी संसाधने आणि प्रशिक्षण देखील उपलब्ध करून देते. परदेशी तस्करांकडून अमली पदार्थांची तस्करी होत असलेल्या ठिकाणांचा मागोवा ठेवण्यासाठी ते सीमांवर लक्ष ठेवते असते.

एनसीबी कसे काम करते?

एनसीबी ही झोन आणि सबझोन्स ही अंमली पदार्थ जप्त करण्याशी संबंधित डेटा आणि तस्करांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करते, गुप्त माहिती गोळा करतात आणि ती प्रसारित करण्याचे काम सुद्धा एनसीबी नेहमी करत असते.

केंद्रीय गृह मंत्रालयाशी एनसीबी संलग्न आहे. एनसीबी औषध कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये गुंतलेल्या केंद्र आणि राज्य एजन्सीशी समन्वय साधते.

हे ही वाच भिडू: 

 

Leave A Reply

Your email address will not be published.