इंदिरा गांधींनी जशी अटकेची खेळी उलटवली होती तसं सोनिया, राहूल गांधींना जमेल का..?

राहूल गांधींच्या पाठापाठ सोनिया गांधींची देखील ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. त्याविरोधात देशभरात कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. पण मुद्दा आहे तो या चौकशीला आणि या गोष्टीचा सोनिया गांधी आणि राहूल गांधींना राजकीय फायदा घेता येवू शकतो का?

कारणच सांगायचं तर अशाच प्रकारे शरद पवार यांना देखील ED ने चौकशीसाठी बोलवल्याची बातमी आली होती. तेव्हा शरद पवार स्वत:हून ईडीच्या कार्यालयात हजर राहणार होते. या दबावाच्या राजकारणाचं रुपांतर शरद पवारांनी उत्तम राजकीय फायद्यात केलं. 

इतिहासात असाच डाव इंदिरा गांधींनी देखील फिरवला होता.

इंदिरा गांधींना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. ठरल्याप्रमाणे अटक देखील झाली. पण या गोष्टींचा फायदा इंदिरा गांधींनी असा घेतला की इंदिरा गांधींच अटक प्रकरण जनता पक्षावर चांगलच शेकलं.. 

त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाला इतिहासात ऑपरेशन ब्लंडर म्हणूनच ओळखलं जातं.. 

ही संपूर्ण घडामोड झाली होती ती तारिख होती ३ ऑक्टोंबर ची.

आणिबाणी नंतर देशात जनता पक्षाचं सरकार आलं होतं. तेव्हा देशात मोरारजी देसाई पंतप्रधान होते तर गृहमंत्री होते चौधरी चरणसिंग. आणिबाणीच्या काळात अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. तेव्हा या गोष्टीचा बदला घेण्याच्या हिशोबात अनेक नेते होते. जॉर्ज फर्नांडिस, अटलबिहारी वाजपेयी, चौधरी चरणसिंग या सर्वांच्या मते इंदिरा गांधींना एकदा जेलची हवा काय असते ते दाखवालाच हवं अस ठाम मत होतं. 

इंदिरा गांधींनी नेमके कोणते भ्रष्टाचार केले आहेत ते शोधून काढण्यासाठी जनता पक्षाकडून शाह आयोग नेमण्यात आला होता. शहा आयोगाकडे अनेक केसेस होत्या. यातलीच एक केस होती, 

तथाकथित जीप स्कॅम ची

रायबरेली येथे प्रचार करण्यासाठी 100 जीप विकत घेण्यात आल्या होत्या. या 100 जीप गाड्यांची किंमत त्या काळात एकूण 40 लाख इतकी होती.

राजनारायण यांचा आरोप होती की या सर्व जीप गाड्या सरकारी पैशातून आणि उद्योगपतींकडून विकत घेण्यात आल्या होत्या. या प्रकरणावरूनच इंदिरा गांधींना अटक होणार होती. त्यासाठी शनिवार 1 ऑक्टोंबर ही तारीख फिक्स करण्यात आली. पण दूसरा दिवस हा गांधी जयंतीचा होता. या दिवशी सर्व घडामोडी छापून येतील व जनता पक्षाला नाराजी सहन करावी लागेल असा अंदाज बांधून 3 ऑक्टोंबर ही तारिख ठरवण्यात आली.

मोरारजी देसाईंनी परवानगी देताना एक अट टाकली. इंदिरा गांधींना हातकडी घालू नये. अटक ही रात्रीच्या सुमारास करावी जेणेकरून इंदिरांना त्या दिवशी जामीन मिळणार नाही..  

तीन ऑक्टोबर 

CBI चीफ एन के सिंह यांना फोन करून तयारी विचारण्यात आली. त्यांनी 4 वाजता ऑफिसमधून टिम तयार होईल व पाच पर्यन्त इंदिरा गांधींच्या निवासस्थानावर पोहचेल अस उत्तर दिलं. 

तेव्हा इंदिरा गांधी खासदार देखील नव्हत्या. त्यामुळे सरकारी बंगला त्यांना सोडावा लागलेला. त्या विलिंग्डन क्रीसेंट इथल्या बंगल्यात रहात होत्या. 

CBI ने स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. हे स्थानिक पोलीस CBI ची टीम पोहचण्यापूर्वीच बंगल्यावर आले. या वेळी मेनका गांधी आणि संजय गांधी लॉनमध्ये टेनिस खेळत होते. त्यांना संपूर्ण घटनाक्रमाचा अंदाज आला. मेनका गांधींनी मिडीया गोळा करण्याची जबाबदारी घेतली तर संजय गांधींनी कॉग्रेसचे कार्यकर्ते गोळा करण्यास सुरवात केली. 

पावणे पाच च्या सुमारास संपूर्ण CBI टिम बंगल्यावर पोहचली. इकडे घडामोडींना सुरवात झाल्यानंतर चौधरी चरणसिंग यांनी FIR वाचण्यास सुरवात केली. FIR वाचायला सुरवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या केसमध्ये इंदिरा गांधींना लगेच जामीन मिळू शकतो. या केसमध्येच दम नाही. त्यांनी तात्काळ फोन फिरवून CBI चीफ यांच्याकडे निरोप पाठवला, इंदिरा गांधींना अटक करायला जावू नका.. 

पण तोपर्यन्त वेळ झाला होता. संपूर्ण टिम इंदिराजींच्या बंगल्यावर पोहचली होती. 

मेनका गांधी त्या काळात सुर्या मासिक काढायच्या. त्यांनी सुर्या मासिकच्या संपादकांना फोन करून प्रत्येक आंतराराष्ट्रीय माध्यमाच्या प्रतिनिधीला इंदिराजींच्या बंगल्यावर बोलावून घेतलं. इकडे इंदिरा गांधींनी एक तासाचा वेळ मागवून घेतला आणि संजय गांधी व मेनका गांधींना आपला टास्क पुर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळाला.. 

एक तासामध्ये सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, पक्षाचे दिल्लीतले कार्यकर्ते, नेते इंदिरा गांधींच्या बंगल्यावर गोळा झाले. 

केस वीक असल्याची माहिती चौधरी चरणसिंग यांनी CBI चीफ एनके सिंग यांना दिली होती. आत्ता हा खेळ आपल्यावरच उलटणार असल्याची जाणीव एकंदरित इंदिरा गांधींच्या हालचालीवरून टिपता आली होती. म्हणूनच एन के सिंग यांनी जागेवर जामीन प्रक्रिया मंजूर करण्याची ऑफर देवू केली.. 

पण आत्ता संपुर्ण खेळी आपल्या हातात आल्याची जाणीव इंदिराजींना झाली होती. ६ वाजता इंदिरा गांधी बाहेर आल्या व हातकडी लावण्याची मागणी करू लागल्या. कोणत्याही परिस्थितीत हातकडी लावायची नाही यावर CBI चीफ ठाम होते. इंदिरा गांधींना हातकडी सहीत फोटो हवा होता. वर्तमानपत्रांसाठी असा फोटो सात साडेसात पुर्वी देणं आवश्यक होतं. त्यानंतर प्रिटिंगला जाणं त्या काळात अशक्य होतं. 

सुमारे साडेसात पर्यन्त इंदिरा गांधी हातकडीचा आग्रह करत राहिल्या. पण ते शक्य झालं नाही. 

या काळात बंगल्याबाहेर पुरेसे कार्यकर्ते जमा झाले होते. ८ वाजता इंदिरा गांधीना पोलिस व्हॅनमधून घेवून जाण्यास सुरवात करण्यात आली. इंदिरा गांधींनी अचूक डाव साधत या व्हॅनमधूनच लोकांना संबोधित करण्यास सुरवात केली. 

दरम्यानच्या काळात कॉंग्रेस नेत्यांना देखील योग्य ते आदेश मिळाले होते. एकएक करुन प्रत्येक नेता या व्हॅनसमोर झोपू लागला. पोलीस बळाचा वापर करुन या नेत्यांना बाजूला सारण्यात आलं. 

दूसऱ्या गाडीत संजय आणि राजीव गांधी बसले. मागोमागं कॉंग्रेस कार्यकर्ते गाड्याचा ताफा दिल्लीच्या रस्त्यांवरून हरियाणाच्या रोडला जावू लागला. 

इंदिरा गांधींच्या लक्षात आलं की पोलीस त्यांना हरियाणाच्या बडखल लेक गेस्ट हाऊसला घेवून चालले आहेत. इंदिराजींना हा ताफा तिहार जेलच्या दिशेने वळवायचा होता.  

दरम्यान रेल्वे फाटक बंद लागलं आणि हा ताफा थांबला. संधीचा फायदा घेवून एका छोट्या पुलावर इंदिरा गांधींना ठाण मांडली.  मला दिल्लीतच कैद्य करा असा आग्रह त्यांनी धरला. विनंत्या करून अखेर रात्री दहा च्या सुमारास हा ताफा किंग्जवे कॅम्प पोलीस लाईनच्या ऑफिसर्स मेसमध्ये पोहचला. 

दूसऱ्या दिवशी इंदिरा गांधींना न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आलं. बाहेर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दंगा सुरू केला. पोलीसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. कोर्टाकडून त्यांना तात्काळ जामीन देण्यात आला कारण केसच तशी होती.. 

या घटनेमुळे इंदिरा गांधींच्या विरोधात असणारं आणिबाणीचं वातावरण निवळण्यास आणि त्यांची जागा सहानभुतीच्या लाटेनं घेण्यास इंदिरा गांधी यशस्वी ठरल्या.

राजकीय विश्लेषक सांगतात की परिस्थितीचा पुर्ण फायदा इंदिरांनी घेतला म्हणूनच या फसलेल्या ऑपरेशनला ऑपरेशन ब्लंडर अस नाव पडलं.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.