प्रस्थापितांच्या राजकारणाची झिट आलेय पर्याय काय..? “आप, शेकाप, जनता दल..”
राजकारण, सत्ताकरण, राजकीय नाट्य, बंडखोरी हे शब्द ऐकले तरी किळस येतोय. आज निष्टेच्या गप्पा मारणारा उद्या पक्ष सोडतोय. जे विरोधात बसलेत ते उद्या थेट सत्तेत असणार आहेत. बरं आमदारांचंच नाही तर पक्षांचं धोरण पण काय वेगळं नाहीये.
धनुष्यबाणावर निवडून आलेले आज सत्तेत आणि विरोधात दोन्ही ठिकाणी आहेत. भाजप तर एवढा ‘सर्वसमावेशक’ झालंय की कोणताही पक्षातील आमदार भाजपात सहज प्रवेश करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षाशी ‘स्थिर’ आणि ‘मजबूत’ सरकार देण्यासाठी युती करू शकते. काँग्रेस पक्ष म्हणून भाजपाला विरोध करत असला तरी नेते आणि कार्यकर्ते मात्र कधीही भाजपात जाऊ शकतात ही परिस्तिथी.
त्याचबरोबर हे पक्ष बदलणं, अनैसर्गिक युती करणं काही चूक नाही, सत्तेच्या राजकारणात सगळं माफ आहे असं म्हणणारे ‘चाणक्य’ पण आहे.
पण मग जर तुम्ही पक्षाच्या नावावर, जाहीरनाम्यावर जर मतं मागत असला आणि निवडून आल्यानंतर स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करत असाल तर ते चूकच आहे अशीही एक दुसरी बाजू पुढे येते.
त्यामुळं आजच्या सर्वच प्रस्थापित पक्षांच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेतुन सर्व पक्ष सारखेच अशी प्रतिक्रिया जनतेत पाहायला मिळते. त्यामुळं या प्रस्थापितांना पर्याय कोण याचं उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर भूतकाळात आणि भविष्यात असं दोन्ही ठिकाणी डोकावून पाहावं लागेल.
सुरवात करायचीच झाल्यास पाहिलं थोडं मागे जाऊन बघू.
यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, भाकप आणि माकप हे डावे पक्ष यांचा समावेश होईल. कधीकाळी महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष ठरलेले हे पक्ष आज अस्तित्वसाठी झगडताना दिसतात. मात्र कधी काळी या पक्षांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी एक अजेंडा देण्याची ताकद या पक्षात होती. सामान्य जनतेबरोबर कष्टकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांकांना एक मजबूत ऑप्शन या पक्षांनी दिला होता.
शेतकरी कामगार पक्ष
काँग्रेसमध्ये असताना शेतकरी, कामगार आणि समजतील इतर वंचित घटकांसाठी काम करणे आणि काँग्रेसची धोरणं डाव्या विचाराकडे झुकती ठेवणे या उद्दिष्टांसाठी एक गट स्थापन झाला. पुढे हा गट काँग्रेसमधून बाहेर पडला आणि शेतकरी कामगर पक्षाची स्थापन झाला.
सुरवातीच्या काळापासूनच काँग्रेसवर भांडवलदारांचे त्यांचे मुनीम असल्याचा आरोप करत शेकापने वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न केला.
ज्याला लोकांचाही चांगल्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. १९६२ मध्ये जेव्हा महाराष्ट्राच्या पहिल्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद शेकपाककडे आलं तेव्हा ज्यांच्याकडे घालायला चांगले कपडे नाहीत ते विरोधात बसणार का? अशा शब्दात काही काँग्रेसचे नेते शेकापची खिल्ली उडवत होते.
मात्र तत्वाला धरून फक्त समाजाच्या विकासाचं राजकारण करायचं हे उद्धिष्ट डोळ्यासमोर आलेल्या शेकापच्या नेत्यांकडून मात्र एक प्रमुख विरोध पक्ष म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न लावून धरण्याचा काम नेटानं करण्यात येत होतं.
स्वहित न बघता राजकारण हे फक्त जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठीच करावं याचा आदर्श शेकापच्या नेत्यांनी घालून दिला होता.
उदाहरणच घ्यायचं झाल्यास शेकाप नेते शंकरराव मोरे यांचं घेता येइल.
46 वर्षे राजकारणात मोठमोठी पदे भूषवूनदेखील शंकरराव मोरे अखेरपर्यंत भाड्याच्या घरात राहत होते. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना स्वत:च्या जेवणाचा डबा घरून घेऊन जात. एकदा कुणी तरी गाडी घेण्याचा विचार बोलून दाखवताच ‘आपण एक गरीब समाजाचे नेतृत्व करतो, बहुजनासाठी धडपडतो. आपणाला कशाला हवी गाडी?’ असा प्रतिप्रश्न शंकररावांनी त्या हितचिंतकाला विचारला होता.
नेत्यांचा आदर्शवाद दाखवण्यापुरताच होता असं नाही. जरी महाराष्ट्रात पॉकेट्समध्ये असली तरी हे नेते लोकप्रिय होते. त्यामुळेच सांगोल्यातून गणपतराव देशमुख ११ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते.
शेतकरी कामगार पक्ष परफेक्ट होता अशातलाही भाग नव्हता. आजच्यासारखं तेव्हाही स्थानिक राजकारण, मतदारसंघाचा विकास आणि राजकीय भविष्य अशी कारणं देत अनेक शेकापचे नेते वेळोवेळी काँग्रेसमध्ये दाखल होत होते. त्यांना पुढे आवर्जून साखर कारखाने, मंत्रीपदे मिळाली. त्यात यशवंतराव मोहिते, शंकरराव मोहिते पाटील आदींचा समावेश करता येइल.
पण त्याचबरोबर मरेपर्यंत पक्षात असणारे भाऊसाहेब राऊत, दाजीबा देसाई, एन. डी. पाटील, शेषराव देशमुख, नरसिंगराव देशमुख काटीकर, त्र्यं. सी. कारखानीस, शरद गव्हाणे, गणपतराव देशमुख, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, विठ्ठलराव हांडे ही सगळी नावे शेतकरी कामगार पक्ष कसा होता हे समजण्यासाठी पुरेशी आहेत.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमा लढा, रोजगार हमी कायद्यासाठी लढा या लढ्यांबरोबरच महाराष्ट्र सहकार कायदा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी, महिलांना ५० टक्के आरक्षण, प्राथमिक शाळा स्थापना, कापूस एकाधिकार योजना, शेतमाल हमीभाव कायदा यासारख्या अनेक कायद्यांची अंमलबाजवणी करण्यासाठी लाल बावटा हातात घेऊन हजारोंचे मोर्चे शेकापकडून काढले जात होते.
याचबरोबर ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक समाजाची पार्श्वभूमी असणारे नेते शेकापमध्ये असल्याने सुरवातीच्या काळात सामाजिक सुधारणांचे प्रश्नही हातात घेतले होते.
”सध्याचे राजकारणी ‘म्होतूर’ लावत फिरत असतात. ते कोणत्या पक्षात असतात, हे त्यांनाही माहीत नसते. त्यामुळे एक पक्ष आणि एकच झेंडा घेऊन फिरणाऱ्या आमच्यासारख्याचे फार बळ नसले तरी आम्ही लढत राहू, जय क्रांती म्हणत राहू.”
हे शेकापचे जेष्ठ नेते केशवराव धेंडंगे यांचं म्हणणं आजच्या राजकारणातील एका मजबूत शेकापच्या पार्यायाबद्दल बरंच काही सांगून जातं.
महाराष्ट्रात आजही शेतकऱ्यांचे प्रश्न काही कमी झालेले नाहीयेत. मात्र त्याचवेळी शेतमालाचे भाव, कर्जाचे डोंगर हे मुद्दे जरवर्षी चर्चेत येणंही कमी झाली आहे. शेतमालाचा योग्य भाव आजही मिळत नाही. लासलगावला एक रुपया दराने कांदा विकला गेल्याच्या बातम्या जरवर्षी येतात. शेतकऱ्यांची ही स्तिथी असताना कामगारांची स्थितीसुद्धा जास्त वेगळी नाहीये.
कॉन्ट्रॅक्टवर बेसिसवर काम करणाऱ्या कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात स्विगी, झोमॅटो,ओला यांसारख्या कंपन्यांच्या उदयामुळे गिग इकोनॉमीच्या नावाखाली कामगारांचे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत.
मात्र कामगार आणि शेतकरी यांच्या मुद्यांवर पॅन महाराष्ट्र अजेंडा सेट करू शकणार पक्ष सध्या राज्यात नाहीये तो शेकापच्या रूपाने तयार होऊ शकतो. शेकापचे रायगड, सोलापुरातील नांदेड आणि विदर्भातील काही ठिकाणे असणारं अस्तित्व यासाठीची चांगली सुरवात असू शकते. जर सामाजिक प्रश्न शेकापने पुन्हा उचलण्यास सुरवात केल्यास बहुजन समाजातील तरुणाला शेकापच्या रूपाने प्रस्थापितांविरोधात ऑप्शन भेटू शकतो.
जनता दल
जनता दल आपल्याला जनता दलामध्ये पडलेल्या फुटीमुळेच जास्त लक्षात आहे. मात्र समाजवादी विचारधारेवर तयार झालेला हा पक्ष कधी काळी महाराष्ट्रातील सर्वाधिक आमदार असणारा पक्ष होता हे मात्र विस्मृतीत गेलं आहे.
विशेष म्हणजे आणिबाणीनंतर काँग्रेसला एक मजबूत पर्याय उभा करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता दलाची स्थापना केली होती.
१९७८ च्या निवडणुकीत जनता पक्षाने महाराष्ट्रात ९९ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी बाकीच्या दोन प्रमुख पक्ष चव्हाण-रेड्डी काँग्रेसला ६९ आणि इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या होत्या.
मधू दंडवते, बापूसाहेब काळदाते, मृणाल गोरे, किसनराव बानखेले, ग.प. प्रधान, एस एम जोशी एकापेक्षा एक नेते असणारा हा पक्ष.‘राजकारण हे समाज बदलण्यासाठीचं साधन आहे’ असं मानणाऱ्या पिढीतील ही दिग्गज नावं.
आर्थिक समानतेबरोबरच राजकीय आणि सामाजिक समानता हा जनता पक्षाच्या विचारधारेचा पाय होता आणि ही तत्वे देशात रुजवण्यासाठी अविरत झटणाऱ्या नेत्यांची फळी जनता पक्षाकडे होती. आपल्या वक्तृत्वानेच नव्हे तर कामाने देखील या पक्षाच्या नेत्यांनी जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती.
किसनराव बानखेले यांचंच काम बघण्यासारखं आहे.
मंचरचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार- चारही सभागृहांत किसनराव बानखेले यांनी काम केलं होतं. समाजकार्यात बुडालेले किसनराव बानखेले यांची दिवसभर काम मतदार संघाची कामं केल्यानंतर मुक्कामाची गोष्ट थक्क करणारी आहे.
मुंबईवरून उशिरा पुण्याला आलेले आमदार बाणखेले हे पुणे शिवाजीनगरच्या एसटी स्टँडवर धोतर पांघरून निवांत झोपलेले अनेक वाहकांनी पाहिले आहेत. सकाळी वाहक-चालक त्यांना उठवायचे. चूळ भरायला पाणी द्यायचे. तिथंच चहा पिऊन अण्णा पुढच्या प्रवासाला जायचे. मंचरचं बस स्टँड तर त्यांचं ऑफिस असल्यासारख होतं.
गुवाहाटीच्या फाइव्ह स्टार हॉटेलात बसून काय झाडी, काय डोंगर म्हणणाऱ्या आमदार आता ट्रेंडिंग मध्ये असताना किसनराव बानखेले यांची कहाणी आपल्याला पचायला जरा जडच जाईल.
‘कोणतंही कृत्य करताना सर्वांत दरिद्रीनारायणाचा चेहरा समोर आणा’ हे गांधीजींचं तत्व जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी सत्यात उतरवलं होतं.
पुढे जनता पक्षाचा जनता दल मग जनता दलाचे युनाइटेड आणि सेक्युलर असे दोन भाग झाले आणि आज पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधिमंडळात नाहीये. पण संविधानाच्या चौकटीत राहून समाजाच्या उत्थानासाठी एक आदर्शवत राजकारण कसं करावं याचं उदाहरण जनता पक्षाने घालून दिलं आहे.
देशात आणि राज्यात जेव्हा एकाच पक्षाची एकाधेकरशाही वाढल्याच्या रोज बातम्या येत आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या आघाडीचा ऑप्शन देण्याचा विचारही अनेकदा पुढे येत असतो. अशावेळी जनता पार्टीचं मॉडेल एक फ्रेमवर्क म्हणून काम करू शकतंय.
डावे पक्ष
मागण्या टोकाच्या असल्या तरी त्या लोकशाही आणि अहिंसक मार्गाने कशा करायच्या याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे भारतातलं डाव्या पक्षांचं राजकरण. त्यामुळेच लोकशाही पद्धतीनं सत्तेत आलेलं पाहिलं सरकार भारतातच आलं होतं. सामाजिक, आर्थिक शोषणा विरोधात लढण्याचं तत्व डाव्या पक्षांनीच कायमच उचलून धरलेलं दिसतं.
अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा २००४ पर्यंत डावे पक्ष शिखरावर होते तेव्हा खाजगीकरण ते पेट्रोल-डिझेल दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनांची आजही आठवण काढली जाते.
त्याचवेळी डाव्यांवर महत्वाच्या प्रकल्पांना केवळ विरोधाला म्हणून विरोध करण्याचा आरोपही झाला. मात्र आज राज्यात आणि देशात एक प्रबळ विरोधी पक्षाची गरज असताना डाव्यांची गरज आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही.
आज राज्यात विधान परिषद, राज्यसभा आणि नंतर बंडखोरी यांमुळे आमदारांवर रोज घोडेबाजाराचे आरोप होत असताना राज्यातल्या सर्वात गरीब आमदारावर या दलदलीपासून कोसो दूर आहे.
तो आमदार म्हणजे डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले. निकोले यांचं हे उदाहरण डाव्यांच्या राजकारणातील वेगळेपणाबद्दल बरंच काही सांगून जातं.
भूतकाळ जरी आदर्शवादी वाटत असला तरी आज या पक्षांना पुनरुज्जीवन करणं अवघड आहे. पण त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं महत्व कमी होत नाही. त्याचबरोबर सध्याच्या प्रस्थापितांचं राजकारण रोजच असं तळ गाठत गेलं तर लोकांकडून या पक्षांकडेही गांभीर्याने पाहिलं जाईल ही शक्यताही धुडकावता येत नाही.
सगळे ऑप्शन भूतकाळातील पक्षांमध्येच आहेत असं ही नाही.
सध्या देशात काही प्रमुख पक्ष आहेत पण महाराष्ट्रात त्यांनी हात- पाय पसरले नाहीयेत त्यामध्ये प्रमुख नाव आहे आम आदमी पार्टी.
आज आम आदमी पक्षाचे देशात दोन मुखमंत्री आहेत. इतर राज्यातही विशेषतः शहरी भागात आम आदमी पक्ष पसरत आहे.
आम आदमी पक्षाचं राजकारण सध्या शहरी मध्यमवर्गाला आवडणारं आहे. त्याचबरोबर आमचं हिंदुत्व खरं की तुमचं, आम्ही खरी सेक्युलर की तुम्ही या राजकारणाला कंटाळलेल्या लोकांसाठी आम आदमी पक्षाचं विकास एक्के विकास हे राजकारण चांगला पर्याय ठरू शकतंय. शिक्षण, आरोग्य या दोन बाबतीत आम आदमी पक्षाने केललं काम लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
त्याचबरोबर फ्री इलेक्ट्रिसिटी , फ्री पाणी या फ्रीच्या गोष्टी लोकांच्या पसंतीत येऊ शकतात. त्याचबरोबर भ्रष्टाचार या एक शब्दाच्या जीवावर आम आदमी पार्टी उभी आहे त्याविरोधातही आपने कडक पाऊलं उचलली दिसतात.
मात्र एका बाजूला विकासाचं राजकारण असताना सामाजिक विषमता, धार्मिक तेढ या विषयांपासून आप सोयीस्कररीत्या लांब राहते या पक्षावर होत असतो.
पंजाबमध्ये आम आदमी पक्ष कसा काम करतो हे अजून बघावं लागेल. मात्र दिल्लीतल्या आपल्या कामांच्या जीवावर आप किमान मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या महानगरपालिकेत एंट्री करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकते. ‘दिल्ली बदली अब मुंबई की बारी’ अशी घोषणा करत याआधीच आपने मुंबई महानगरपालिकेतील सगळ्या जागा लढणार असल्याचं सांगितलं आहे.
मुंबईतलं अस्मितेचं राजकारण असं ही मागे पडत आहे त्यामुळे अशा परिस्तिथीत आम आदमी पक्षाचं विकासाचं राजकारण कॉस्मॉपॉलोटिन मुंबईमध्ये चालू शकतं असा अंदाजही जाणकार व्यक्त करतात. त्याचबरोबर मध्यंतरी शून्यातून सुरवात करण्यापेक्षा काँग्रेससारख्या पक्षातून काही प्रस्थापित नेते पक्षात आणून आप आपला विस्तार वाढवू शकते अशा बातम्याही आल्या होत्या. येत्या विधानसभा निवडणुकात गुजरात, छत्तीसगढमध्ये जर आपने समाधानकारक कामगिरी केली तर महाराष्ट्रातही आपला एक प्रबळ दावेदार बनण्यात बाळ मिळेल असं विश्लेषक सांगतात.
हे ही वाच भिडू
- ऑपरेशन ब्लंडर : इंदिरा गांधींना अटक करण्याची खेळी जनता पक्षावर अशी उलटली होती
- शिवसेनेने तेव्हाही युती मोडून शेकापबरोबर भगवा फडकवायचा निर्धार केला होता