जाणून घ्या जैनांचं “मिच्छामी दुक्कडं” म्हणजे काय ?
वर्षभरात आपण केलेल्या चुकांची, पापांची जाणीव ठेवून त्याची माफी मागण्यासाठी देखील काही खास सण असतात. त्यातला एक म्हणजे जैन धर्मातील पर्युषण पर्व होय. पर्युषण पर्व हा जगभरातील संपूर्ण जैन समाजासाठी सर्व सणांचा राजा आहे. अशा प्रकारे, याला पर्व धीरज म्हणूनही ओळखले जाते.
“मिच्छा् मी दुक्कडं” हि प्रथा या पर्युषण पर्वाची मुख्य प्रक्रिया असते. त्याचा अर्थ म्हणजे, वर्षभर आपल्याकडून कळत-नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी पर्युषण पर्वाच्या अंतिम दिवशी म्हणजे, संवत्सरीला मागितली जाते. त्यालाच “मिच्छा् मी दुक्कडं” असे म्हणतात.
प्रत्येक जैन या उत्सवादरम्यान जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, ते म्हणजे योग्य ज्ञान, योग्य विश्वास, योग्य आचरण होय.
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन प्रमुख संप्रदाय आहेत. या दोन्हीही संप्रदायात पर्युषण पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. श्वेतांबर संप्रदायात भाद्रपद महिन्यात पर्युषण पर्व येते. त्यांचे हे पर्व आठ दिवस चालते. आणि मग त्यानंतर दिगंबर संप्रदायाचे लोक हेच पर्व दहा दिवस साजरे करतात. त्याला ‘दसलक्षण’ असं म्हणतात.
पर्युषण म्हणजे काय?
पर्युषण पर्वाला जैन समाजातील सर्वात मोठं पर्व मानलं जातं आणि त्यामुळे याला पार्वधिराज असंही म्हटलं जातं.
पर्युषण म्हणजे काय थोडक्यात आणि सोप्यात सांगायचं झालं तर, आपल्या मनातली घाण साफ करण्याचा मुहूर्त. पर्युषण पर्व सुरू होण्यापूर्वीच जैन बांधव त्यांची सर्व मंदिर, धार्मिक स्थळ साफ करतात. सुशोभित करतात.
पर्युषणचा सोपा अर्थ म्हणजे, आपल्या मनातील सर्व वाईट विचार, लोभ, अपेक्षा, हिंसा, राग इत्यादी काढून टाकणे.
याच पर्युषण पर्वामध्ये जैन धर्माच्या पाच सिद्धांतांचं पालन केलं जातं. या पाच सिद्धांतांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह (गरजेपेक्षा अधिक धन जमा न करणे) यांचा समावेश आहे. या काळात जैन बांधव मनातील ह्या सगळ्या वाईट गोष्टी काढून वैराग्यापासून मुक्त होण्याचा मार्ग शोधतात. सगळ्या वाईट गोष्टी त्यागून स्वतःला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग बघतात.
हे पर्व साजरे करतांना हे जैन अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करतात.
तसेच या पर्युषण पर्वाच्या काळात अनुयायी ही प्रमुख कामे करतात,
- पर्युषण पर्वाच्या काळात सर्व भाविक धार्मिक ग्रंथांचं वाचन करतात.
- धार्मिक प्रवचन ऐकले जातात
- पर्युषण पर्वाच्या काळात भाविक उपवासही करतात. पुण्य लाभावे यासाठी दान देणं हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
- जैन मंदिरांची विशेषत: साफ सफाई करुन स्वच्छता केली जाते, सजावट केली जाते.
- पर्युषण पर्वाच्या काळात रथयात्रा किंवा मिरणवणुका काढल्या जातात.
- या काळात मंदिर किंवा सार्वजनिक ठिकाणी सामुदायिक भोजनाची व्यवस्था केली जाते.
पर्युषण हे केवळ आनंद आणि उत्सव साजरा करण्यासाठीचा सण नसून एक पर्व आहे.
पर्युषण हा काळ म्हणजे, ज्या काळात जैन बांधव स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असतात. आपण जितकं साधेपणाने जीवन जगू शकू तितका यांचा प्रयत्न असतो. थोडक्यात अन्नापासून ते राहणीमानापर्यंत त्यांच्या सगळ्या गोष्टी शक्य तितक्या साध्या असावेत असा ते प्रयत्न करतात. तसेच यात शुद्धता आणतात.
जैन बांधव कंदमुळ जसे कि, बीट वेगैरे खात नाहीत.तसेच सूर्यास्तानंतर जेवण टाळले जाते. लोक आपले आत्मा आणि शरीर शुद्ध करण्यासाठी वास आणि उपवास देखील करतात.
हे हि वाच भिडू :
- एका जैन माणसाने मुस्लिमांसाठी सत्यशोधक मंडळ सुरु करण्यात सिंहाचा वाटा उचलला.
- कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्याला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार जैनांसाठी विशेष का आहे ?
- जळगावची जैन ही आज आफ्रिकेतील सर्वात मोठी इरिगेशन कंपनी आहे.