ठाकरेंचं भाषण, सायमंड्सचं निधन यामुळे चर्चेत असलेलं स्लेजिंग सुरू कसं झालं माहितीये का..?
नुकताच अँड्र्यू सायमंड्स गेला, काही लोकांनी त्याच्या बॅटिंगची, तब्ब्येतीची आणि खेळाची आठवण काढली. तर काही लोकांनी त्याच्या स्लेजिंगची. सायमंड्स स्लेजिंग करायचा का, तर करायचा. पॉईंट किंवा सिली पॉईंटला हा उभा राहिला, तर बॅट्समनला ऐकू येणं हा शाप वाटायचा. बॉलिंग करत असला, तरीही स्लेज करायचा. एखाद्याची एकाग्रता तोडून त्याला चुका करायला भाग पाडण्यात सायमंड्स बाप होता.
म्हणून तो गेल्यावर लोकांना स्लेजिंग आठवलं.
कट टू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मास्टर सभा.
भाषण करताना त्यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादचा उल्लेख केला.
ते म्हणाले, “मियाँदाद जेव्हा मातोश्रीवर आला तेव्हा बाळासाहेबांनी विचारलं की, ‘तू इतकी चांगली बॅटिंग करतोस, मग अधेमध्ये माकडचाळे का करतोस?’
मियाँदाद म्हणला, ‘समोरच्या प्लेअरचं लक्ष विचलित करायला.’
असंही उद्धव म्हणाले.
पुढं त्यांनी मियाँदादच्याच स्लेजिंगचा एक किस्साही सांगितला आणि नाव न घेता विरोधकांना टोमणा मारला. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्याचा रोख होता, की ‘आम्ही सरकार म्हणून चांगलं काम करत असताना, विरोधक आम्हाला स्लेज करुन डिवचायचा प्रयत्न करतायत.’
उद्धव ठाकरेंनी राजकारणात स्लेजिंग आणलं, सायमंड्स गेल्यावरही लोकांना स्लेजिंग आठवलं, मात्र या स्लेजिंगचा इतिहास जावेद मियाँदादच्या माकडउड्या आणि सायमंड्सपेक्षाही मोठाय.
आता स्लेजिंग म्हणजे काय?
तर उत्तर लय सोपं आहे. गल्ली क्रिकेटमध्ये एखादा कार्यकर्ता बॅटिंगला आला की सगळं मंडळ बडबड सुरू करतं, ‘अरे याला काय खेळता येत नाही, घाबरलाय बघ, आरं घरी जा, घरी जा आई बोलवतेय,’ आपल्या बडबडीमुळं ते पोरगं डिस्टर्ब होतं आणि आऊट होऊन बसतं. आपली हीच बडबड म्हणजे स्लेजिंग.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या स्लेजिंगला एक वेगळीच धार येते. इथं एखाद्या बॅट्समनला विकेटकिपर, स्लिपमधले फिल्डर, सिली पॉईंट आणि फाईन लेगला असलेले खडूस कार्यकर्ते असे सगळे जण मिळवून बधीर करुन टाकतात. कधी कधी एकटा बॅट्समन बॉलरसकट समोरच्या टीमला बधिर करून टाकतो. याचा परिणाम म्हणून प्लेअर एकतर बिथरतो, नाहीतर आणखी चवताळून खेळतो.
स्लेजिंगचा शोध कुठं लागला?
लय सोपं उत्तर आहे ऑस्ट्रेलियात. फक्त कसा लागला याच्या दोन वेगवेगळ्या थेअरीज आहेत.
माजी क्रिकेटपटू इयान चॅपेलची थेअरी सांगते की,
‘ऑस्ट्रेलियात शेफील्ड शिल्डची मॅच सुरू होती. तेव्हा एका खेळाडूनं एका अपमानास्पद घटनेचं वर्णन करताना, त्या घटनेचा परिणाम स्लेज हॅमरसारखा झाला, असं वक्तव्य केलं आणि तेव्हापासून समोरच्या टीमला उद्देशून केलेल्या शेरेबाजीला स्लेजिंग असं नाव पडलं.’
थेअरी क्रमांक दोन बीबीसीच्या पॅट मर्फीची आहे,
तो म्हणतो, ‘६० च्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स संघात एक बॉलर होता, त्याच्या बायकोचं त्याच्याच टीममधल्या एका प्लेअरसोबत लफडं होतं. हा कार्यकर्ता बॅटिंगला आला की फिल्डिंगला आलेली टीम गाणं म्हणायची, When a Man Loves A Woman, the old Percy Sledge number, आणि त्यामुळंच या डिवचण्याला स्लेजिंग असं नाव पडलं.’
आता थेअरी लफड्याची असो किंवा बोलबच्चनची, स्लेजिंगचा शोध ऑस्ट्रेलियात लागला एवढं नक्की.
स्लेजिंगचे परिणाम यावर जरा ज्ञान पाजळतो-
कोणताही प्लेअर जेव्हा मैदानात खेळत असतो, तेव्हा त्याच्या डोक्यात भीती, दडपण या सगळ्या गोष्टी असतात. त्या परिस्थितीत त्याला खेळाकडे लक्ष द्यायचं असतं. स्लेजिंगमुळं त्याची एकाग्रता भंग होते आणि सपशेल बाजार उठतो. पण काही काही प्लेअर्स असे असतात, ज्यांना स्लेज केलं की ते आणखी पेटतात आणि समोरच्या टीमचा बाजार उठवून टाकतात.
स्लेजिंग करुन समोरच्याचं मानसिक संतुलन बिघडवायचं हा एवढाच उद्देश खेळाडूंचा असतो.
हे स्लेजिंग होतं कसं?
तर लई सिम्पल आहे. शिव्या देणं, उगाच चुका काढणं, समोरच्याला जिव्हारी लागेल असा अपमान करणं किंवा डायरेक्ट फॅमिलीवरुन टोमणे मारणं. ही असली बडबड ऐकली की समोरच्याचा बल्ल्या फिक्स.
स्लेजिंगचा आणखी एक पार्ट असतो, तो म्हणजे बँटर. हे जरा हलकंफुलकं असतंय. यात दोन्हीकडचे खेळाडू एकमेकांची मस्करी करतात, निवांत वातावरण असतंय, याचा काय कोणी लोड घेत नाय.
आता किस्से सांगितले नाहीत, तर तुम्ही नाराज व्हाल
स्लेजिंगचा द्रविड पॅटर्न सगळ्यात खतरनाक. शोएब अख्तर एखादा बाऊन्सर टाकायचा आणि त्याला वाटायचं आपण लय भारी आहोत. मग द्रविड पुढचे सगळे बॉल एकतर ठरवून सोडून द्यायचा नायतर, लांब मारला तरी रन काढायचा नाही. आधीच पळून आणि चिडून दमलेला अख्तर पार बेजार व्हायचा.
सचिनला स्लेज करायचात का?
असं एकदा ब्रेट ली ला विचारण्यात आलं होतं. तो म्हणाला, ‘If you sledge Sachin, You can see in his eyes, he changes. He locks in and you are there for the whole day bowling to Sachin. Because Sachin is Sachin, He is god.’ आणि एवढं करुन कुणी स्लेज केलंच तर सचिन त्याचे फिक्समध्ये हाल करायचा.
श्रीलंकेचा दिनेश चंडिमल एकदा बॅटिंग करत होता, जो रुट स्लिपमधून म्हणाला. ‘कम ऑन चंडी, थ्रो युअर विकेट अवे.’ चंडिमल तसा निवांत खेळत होता, पण त्याला वाटलं जो रुटला उत्तर द्यावं म्हणून तो पुढचाच बॉल उचलायला गेला आणि आऊट झाला.
ग्लेन मॅकग्रा आणि रामनरेश सरवान यांच्यातला किस्सा सगळ्यात वाढीव. आधी मॅकग्रानं सरवानला डिवचलं, म्हणून सरवाननं थेट मॅकग्राच्या बायकोचाच उल्लेख केला. मॅकग्रानं त्याला लय घाण शिव्या दिल्या. सरवान पण पेटलं, लय राडा झाला. मग नंतर त्याला समजलं की मॅकग्राच्या बायकोला कॅन्सर झालाय. माफी-बिफी मागितली, पण डॅमेज कंट्रोल काय झालं नाही.
रिषभ पंत आणि टीम पेनचा किस्सा काय जुना नाही, पण स्लेजिंग अंगलट कसं येतंय याचं उत्तम उदाहरण आहे.
बाकी ऑस्ट्रेलियात क्रिकेटपायी सुरू झालेली एक गोष्ट आता, महाराष्ट्राच्या राजकारणात आलीये. दुसऱ्या बाजूला इतकं भारी खेळूनही सायमंड्स फक्त स्लेजिंगमुळं लोकांच्या लक्षात राहिलाय. म्हणून स्लेजिंग म्हणजे नुसती बडबड नाही, तर डीप विषय असतोय.
हे ही वाच भिडू:
- वडील हॉस्पिटलमध्ये होते आणि तिकडं राहुल द्रविडनं ॲलन डोनाल्डचा माज मोडला…
- स्लेजिंग करणाऱ्या पार्थिव पटेलची स्टीव्ह वॉने पार इज्जत काढली होती..
- ना पॉन्टिंग, ना कोहली… खरा मवाली क्रिकेटर होता अँड्र्यू फ्लिंटॉफ