भाजपने ४० स्टार प्रचारक मैदानात उतरवले तर आपने २०, पण हे स्टार प्रचारक म्हणजे काय?

गुजरात निवडणुकीचा धुरळा चांगलाच रंगात आला आहे. भाजपने १६६ उमेदवारांची घोषणा केलीय. यात ४० जुन्या उमेदवारांना डच्चू देण्यात आला असून ४० नवीन उमेदवार घेण्यात आले आहेत. आजपर्यंत निव्वळ भाजप आणि काँग्रेस अशी दुहेरी लढत असणाऱ्या गुजरातमध्ये आता आपमुळे तिहेरी लढत रंगणार आहे.

या तिहेरी लढतीमध्ये भाजपने ४० स्टार प्रचारकांची फौज उतरवली आहे तर आपने २० स्टार प्रचारकांना मैदानात उतरवलंय.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा, स्मृती इराणी, राजनाथ सिंग अशा दिग्गज नेत्यांबरोबरच हेमा मालिनी, परेश रावल यांच्यासारखे अभिनेते सुद्धा आहेत. यासोबतच पूर्वी स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या नितीन गडकरी यांचं नाव सुद्धा या यादीत टाकण्यात आलंय.

तर दुसरीकडे आपकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, मनीष सिसोदिया यांसारख्या तगड्या नेत्यांसोबतच हरभजन सिंग यांचा समावेश आहे.

या दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारकांची नावं जाहीर झाली असताना, काँग्रेसने अजूनही स्टार प्रचारकांनी नावं घोषित केलेली नाहीत. त्यामुळे ही यादी कधी घोषित होईल याकडे विश्लेषकांचं लक्ष लागलंय.

भाजप आणि आप दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारक उतरवले आहेत. परंतु यामुळे एक प्रश्न पडतो की, हे स्टार प्रचारक म्हणजे नेमके कोण असतात?

तर सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास, ज्या व्यक्तीच्या भाषणाला लोकांची गर्दी होते, ज्यांना बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोकं जमतात, ज्यांच्या भाषणामुळे मतदार पक्षाकडे आकर्षित होऊन मतदान करतील असा अंदाज आहे अशा व्यक्तींना स्टार प्रचारक म्हणून घोषित केलं जातं. मग यात नेते, अभिनेते, खेळाडू, समाजसेवक, उद्योगपती किंवा आणखी कोणत्या क्षेत्रातील व्यक्ती स्टार प्रचारक असू शकते, यावर कोणतेही बंधन नाही.

आता स्टार प्रचारक कोण असावा यावर बंधन नाही मग स्टार प्रचारक किती असावेत आणि त्यांनी कसा प्रचार करावा यावर काही बंधनं घालण्यात आली आहेत.

कारण स्टार प्रचारक हे राजकीय पक्षांचा प्रचार करत असतात. त्यामुळे त्यांच्यावर होणार खर्च हा पक्षाच्या प्रचार खर्चात मोजला जातो. निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये स्टार प्रचारकांसाठी वेगळे कायदे करण्यात आलेले नाहीत. मात्र आदर्श आचार संहितेनुसार निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांसाठी काही नियम आखून दिलेले आहेत. 

याचे काही प्रमुख नियम असे आहेत. 

१) स्टार प्रचारक कोणत्याही विशिष्ट पक्षाचा प्रचार करू शकतात मात्र उमेदवाराचा प्रचार करू शकत नाहीत. तसेच कोणतीही व्यक्ती स्टार प्रचारक म्हणून काम करू शकते. यात नेते, अभिनेते, उद्योगपती यांपैकी कोणीही असू शकतो.

२) निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष कमाल ४० स्टार प्रचारक प्रचारासाठी उतरवू शकतो. तर मान्यता प्राप्त नसलेले पक्ष कमाल २० स्टार प्रचारक नेमू शकतो. या नियमामुळेच गुजरातमध्ये मान्यता प्राप्त नसलेल्या आपने २० स्टार प्रचारक मैदानात उतरवले आहेत तर भाजपने ४० जणांना स्टार प्रचारक घोषित केलंय.

३) निवडणुकीत जर उमेदवाराचा प्रचार केला गेला तर खर्च उमेदवाराच्या खर्चात मोजला जातो. मात्र स्टार प्रचारक हा उमेदवाराचा नाही तर पक्षाचा प्रचार करतो त्यामुळे स्टार प्रचारकांच्या खर्च पक्षाच्या खर्चात मोजला जातो. परंतु जर स्टार प्रचारकाने प्रचारात उमेदवाराचं नाव घेतलं तर मग सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चात मोजला जातो.

४) स्टार प्रचारक हे प्रतिष्ठित असतात, प्रचाराचा कालावधी कमी असल्यामुळे त्यांच्या प्रवासावर, सुरक्षेवर आणि सभांवर जास्त खर्च केला जातो. हा सर्व खर्च पक्षसाच्या प्रचार खर्चात मोजला जातो.

५) जर पंतप्रधान किंवा माजी पंतप्रधान स्टार प्रचारक म्हणून प्रचार करत असतील तर, त्यांच्या सुरक्षेवर होणारा खर्च हा प्रचार खर्च मानला जात नाही. कारण तो खर्च सरकारकडून केला जातो. परंतु पंतप्रधानांसोबत दुसरा कोणता स्टार प्रचारक प्रवास करत असेल किंवा त्यांच्या सुरक्षेचा फायदा घेत असेल तर, पंतप्रधानांच्या सुरक्षा खर्चातला अर्धा खर्च त्या स्टार प्रचारकांच्या खात्यात मोजला जातो.

६) जर अनेक उमेदवार आणि स्टार प्रचारक एकत्र रॅली किंवा सभा घेत असतील तर सगळा खर्च प्रत्येकामध्ये समसमान विभागला जातो. 

यासारखे आणखी काही नियम स्टार प्रचारकासाठी आखून देण्यात आले आहेत, या आधारावरच स्टार प्रचारकांना परवानगी दिली जाते.

स्टार प्रचारकांच्या प्रवासासाठी हेलीकॉप्टर, विमानाचा वापर केला जातो. सुरक्षा, प्रचार सभा, रॅली यांच्यावर सुद्धा प्रचंड खर्च केला जातो. त्यामुळे स्टार प्रचारकांवर केल्या जाणाऱ्या खर्चावर निवडून आयोगाची करडी नजर असते. तसेच स्टार प्रचारक निव्वळ पक्षाचाच प्रचार करतोय ना यावर सुद्धा आयोगाचं लक्ष असतं.

उमेदवारांच्या प्रचारावर खर्चाची मर्यादा असल्यामुळे पक्षांकडून तगड्या नेत्या अभिनेत्यांना स्टार प्रचारक म्हणून नियुक्त केलं जातं. पक्षाने ज्या स्टार प्रचाराची निवड केली आहे त्यांची यादी पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडे सादर करून परवानगी मागितली जाते मग प्रचाराची रणधुमाळी सुरु होते. या नियमांमुळेच राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने ४० स्टार प्रचारक उतरवले आहेत तर आपने फक्त २० जणांना स्टार प्रचारक बनवलंय.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.