म्हणून दारू, गुटखा, तंबाखूची जाहिरात नसते इलायची,सोडा, म्युझिक सिडीज् ची जाहिरात असते

२०१२ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात गुटखा बॅन करण्याची घोषणा केली होती. राज्यानं तेव्हा १०० करोडच्या महसुलावर लाथ मारत तरुणाईच्या कल्याणासाठी गुटखाबंदीचा हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं होतं आणि बॅन लागल्यावर रातोरात गुटका मिळणं बंद झालं होतं.

काय वाटतं? झालं असेल असं? बिलकुल नाही….

उलट त्यामुळं दोन परिणाम झाले होते.

एका रात्रीत ५ ते १० रुपयांना मिळणाऱ्या पुड्या ७० ते ८० रुपयांच्या घरात गेल्या होत्या. आणि विक्री चढ्या भावाने होऊनदेखील त्यातून कोणतंच उत्त्पन्न राज्याला मिळत नव्हतं.

हळूहळू वर्षे लोटली. गुटख्याच्या किंमती पण स्थिर होत २० ते २५ ला एक पुडी अशा झाल्या. आता तर जी नवीन पिढी गुटखा खायला सुरवात करतेय, त्यांना तर विमल बॅन आहे एवढं सुद्धा माहित नाहीये.

पहिल्यासारख्या गुटखाच्या माळा तुम्हाला टपरीवर दिसणार नाहीत. पण शोधून अशी पानटपरी सापडणार नाही, तिथं तुम्हाला गुटखा मिळणार नाही.

मग बॅन असूनही गुटख्याचा वापर इतक्या सर्रासपणे चालण्यामागचं कारण काय तर याच कारण आहे लाखो रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या जाहिराती.

विषय निघालाच आहे तर विमलचं उदाहरण घेऊ.

‘बोलो जुबां केसरी’ ही त्यांची जाहिरात आपल्या सगळ्यांना तोंडवळणी पडलीये. आधी अजय देवगण मग शाहरुख आणि आता अक्षय कुमार अशी तगडी स्टारकास्ट घेऊन या ऍडव्हर्टाइझ बनवल्या जातायेत. हे तिन्ही सुपरस्टार एकत्र आणण्यासाठी कंपनीनं किती पैसा ओतला असेल, याचा तुम्हीच विचार करा.

आता हे हिरो किंवा कंपन्या नेमका आकडा बाहेर येऊ देणार नाहीत. पण याचा अंदाज काढता येऊ शकतो, ते इतर जाहिरातींसाठी किती चार्ज करतात यावरून. उदाहरणार्थ शाहरुख खान जाहिरात शूट करण्यासाठी एका दिवसाचे ३- ४ करोड रुपये घेत असल्याचं ऐकायला मिळतं. पण रेट आहे नॉर्मल जाहिरातींसाठी.

विमलाच्या जाहिराती ज्या कायदेशीर दृष्ट्या ‘ग्रे’ कॅटेगरीत येतात त्यासाठी निश्चितच ही अमाऊंट जास्त असणार. तर अगदी करोडोंच्या घरात हा आकडा गेला तरी पान मसाला कंपन्यांना तो आरामात परवडण्यासारखा आहे.  

बिझनेस स्टॅंडर्डच्या एका रिपोर्टनुसार,

भारतात पान मसाल्याचं मार्केट आहे ४५,००० करोडोंचं. एवढंच नाही तर २०२६ पर्यंत पान मसाला पुड्यांचा खप ६९,५१८ पर्यंत जाईल, असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे या कंपन्यांना मोठमोठ्या स्टार्सना घेऊन अगदी प्राइम टाईमला ऍड्स दाखवणं आरामात परवडतं.

पण सिन असा आहे की तंबाखू, दारू एवढंच काय तर महाराष्ट्रात सुगंधित सुपारीची जाहिरात करणं सुद्धा बॅन आहे.  

केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा १९९५ नुसार मद्य, सिगारेट आणि तंबाखू उत्पादनांच्या थेट जाहिरातींवर बंदी घालण्यात आलीये. त्याचबरोबर गुटखा जे एक तंबाखू उत्पादन आहे त्याच्या जाहिरातीला सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम अंतर्गत बॅन केलेलंय.

त्याचबरोबर इंडियन ऍडव्हर्टायझिंग आणि स्टॅंडर्ड काउन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेलिब्रिटीजना ज्या उत्पादनांवर हेल्थ वॉर्निंग लिहलीये, त्याची जाहिरात करता येत नाही. मग आता प्रश्न पडतो की,

आपल्याला या ऍड दिसतात कशा..?

तर या जाहिराती दाखवल्या जातात त्या सरोगेट ऍडची मेथड वापरून.

म्हणजे विमलची जी तुम्हाला जाहिरात दिसते ती विमल इलायचीची असल्याचं दाखवली जाते. बरं यात नुसते पानमसालावालेच आहेत असं नाहीये. रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्लू यांच्या जाहिराती म्युझिक सिड्या विकण्यासाठी असल्याचं दाखवलं जातात. कार्ल्सबर्ग बियरवाले तर ग्लासच्या नावाखाली जाहिरात चालवतात. 

यामुळं काय होतं.. तुमचा ब्रँड तर पब्लिकपर्यंत पोहचतो. पण त्याचवेळी इलायची, सोडा, ग्लास या नावाखाली जाहिरात केल्यानं ती कायद्याच्या कचाट्यात पण सापडत नाही. आणि यालाच सरोगेट जाहिरात म्हणतात.

बरं ह्या सगळ्या सरोगेट ऍड्सना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं ते, किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून अजूनही आपल्या लक्षात राहिलेल्या विजय माल्यानं. त्यासाठी त्यांनी डायरेक्ट विमान कंपनीचं नावंच किंगफिशर ठेवलं होतं. आणि अगदी बिअरच्या बाटलीवर दिसतो तोच किंगफिशरचा लोगो विमानांवर झळकत होता.

आता प्रश्न राहतो या जाहिराती बॅन करता येत नाहीत का?

तर उत्तर हो, असं आहे. तंबाखूच्या ब्रॅण्डच्या जाहिराती तुम्हाला शक्यतो पाहायला मिळणार नाहीत. कारण सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३, तंबाखू उत्पादनांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी घालतो. हा कायदा तंबाखू उत्पादनांचं ब्रँड नाव वापरून इतर वस्तूंच्या जाहिरातींना सुद्धा परवानगी देत ​​नाही. त्यामुळं असाच कडक कायदा करून या जाहिरातींवर बंदी देखील घालता येऊ शकते. 

त्यासाठी २०१७ मध्ये राज्यसभेत सरोगेट जाहिरात (प्रतिबंध) विधेयक २०१६ हे बिल पण आणलं होतं मात्र ते पास करण्यात आलं नाही. तेव्हा यामागं या दारू, गुटखा आणि पानमसाला लॉबीची किती ताकद असेल, हे वेगळं सांगायची गरज नाहीये.

त्यामुळं कायदा येईपर्यंत अशी जाहिरात करणाऱ्या कलाकारांना आरसा दाखवण्याचं काम मात्र आपल्यातले काही जण करताना दिसतात. जसं की अक्षयकुमारची एवढी ट्रॉलींग झाली की काल त्यानं गुटख्याच्या जाहिरातीसाठी माफी मागितलीये. त्याचबरोबर अमिताभने पण जनमतापुढं झुकत अशीच जाहिरातीतून माघार घेतली होती.

असं आहे गुटखा विक्री कंपन्यांचं जाहिरात मॉडेल ज्याच्या जोरावर सर्रास ते कमाई देखील करतात आणि कायद्याला देखील चुना लावतात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.