जगात कितीही राडा होऊ द्या, आपला न्यूट्रल राहण्याचा स्टॅन्ड स्वित्झर्लंड कधीच सोडत नाही

स्वित्झरलँड आल्प्सच्या पर्वतरांगात वसलेला निवांत देश. आल्प्सची ती बर्फाची पांढरी शिखरं आणि पायथ्याला मग नजर जाईपर्यंत पसरलेली हिरवळ आणि या हिरव्या कुरणांवर चरणाऱ्या काळ्या पांढऱ्या ठिपक्यांच्या जर्सी गया. आता मी पण तुमच्यासारखा कधी स्वित्झर्लंडला गेलो नाहीये मग हे सगळं कुठं बघितलं तर तुमच्यासारखंच टीव्हीवर. यशराज बॅनरच्या चांदणी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मोहब्बतें, वीर झारा या चित्रपटात चोप्रा पिता पुत्रांनी आपल्याला स्वर्गासारखा स्वित्झर्लंड दाखवला.

आणि मागच्या जवळपास दोन शतकांपासून स्वित्झर्लंडच्या लोकांनी खरंच स्वर्ग अनुभवाला आहे. अगदी दोन विश्वयुद्धात युरोप बेचिराख होत असताना, वर्ल्ड वॉर मधले प्रमुख देश इटली,ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स हे देशांशी बाउंड्री असताना देखील स्वित्झरलँडचा कारभार निवांत चालू होता.

एवढंच काय महाराष्ट्रापेक्षाही ४-५ पटीने बारका असणारा स्वित्झर्लंडचा १८१५ पासून कोणत्याच युद्धात अडकलाय ना परकीय आक्रमणाला बळी पडलाय. 

..आणि असंही नाहीये कि स्वित्झर्लंड जागतिक घडामोडींपासून अलिप्त आहे. आज जगातली सर्व प्रमुख संस्थांची हेडक्वार्टर्स स्वित्झर्लंडमध्ये आहेत. अनेकवेळा मोठया काँफरन्स स्वित्झर्लंड मधेच भरतात. 

मग एवढं सगळं स्वित्झर्लंड ला कसं जमतं तर एका परराष्ट्र नीतीच्या जोरावर आणि हे परराष्ट्र धोरण आहे २०० वर्षांपासूनची स्वित्झरलँडची स्विस न्यूट्रॅलिटी.

आता तुम्ही म्हणाल इतक्या वर्षांची जुनी परंपरा आहेत मग भिडू तू आता मधेच इतिहासाचा तास का चालू केला. तर स्वित्झरलँडने २०७ वर्षांची परंपरा तोडत रशियावर निर्बंध लादले आहेत. “स्वित्झर्लंडसाठी हे एक मोठे पाऊल आहे” असं म्हणत स्विस अध्यक्ष इग्नाझियो कॅसिस यांनी युरोपियन युनिअनप्रमाणेच स्वित्झरलँड सँक्शन्स टाकेल असं म्हटलं आहे. त्यामुळं ही फेमस स्विस न्यूट्रॅलिटी पुन्हा चर्चेत आली आहे.

नक्की काय आहे स्विस न्यूट्रॅलिटी ?

स्विस न्यूट्रॅलिटी म्हणजेच स्विस तटस्थता हे स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र धोरणाच्या मुख्य तत्त्वांपैकी एक आहे. ज्यानुसार स्वित्झर्लंडने इतर राज्यांमधील सशस्त्र किंवा राजकीय संघर्षात सहभागी न होण्याचं बंधन घालून घेतलं आहे. हे धोरण स्वित्झर्लंडने स्वत:च स्वतःवर लादलेले आहे. बाह्य सुरक्षा सुनिश्चित करण्याबरोबरच आणि देशांतर्गत शांतता वाढवण्यासाठी हे धोरण डिझाइन केलेले आहे.

त्याचबरोबर बाकीच्या देशांनीही स्वित्झरलँडची तटस्थता मान्य केली आहे.

बाह्यसुरक्षा कशी राखली जाईल तर स्वित्झर्लंड ना कोणाची बाजू घेइल ना कोणाच्या विरोधी एकाद्या गटात समाविष्ट होईल. आणि अंतर्गत शांतता कशी तर… स्वित्झरलँडच्या ४ ऑफिशियल भाषा आहेत. त्यामुळे जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि रोमांश या भाषा बोलणाऱ्या लोकांच्यात युनिटी राहायची असेल तर बाजूच्या सर्वच देशांपासून समान अंतर ठेवणं स्वित्झरलँडला भाग आहे.

१८१५ च्या व्हिएन्ना काँग्रेसने स्वित्झर्लंडच्या तटस्थतेला औपचारिकपणे मान्यता देणाऱ्या घोषणेवर स्वाक्षरी केली आहे आणि म्हटले की ते,

 “स्वित्झर्लंडचं न्यूट्रॅल संपूर्ण युरोपच्या हिताचे आहे.” 

मोठ्या, बलाढ्य शक्तींनी वेढलेल्या – पश्चिमेकडे फ्रान्स, उत्तरेकडे जर्मनी आणि दक्षिणेकडे इटली – या  लहान अल्पाइन राष्ट्राला विशेष आंतरराष्ट्रीय कार्ये सोपवण्यात आली आहेत, ज्यात संघर्षांमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणे हे प्रमुख काम समाविष्ट आहे.

याचबरोबर स्वित्झर्लंडचे लष्करी तटस्थतेचे धोरण हे जगातील सर्वात जुने धोरण आहे. १८१५ मध्ये पॅरिसच्या कराराद्वारे तटस्थतेची स्थापना झाल्यापासून त्यांनी परदेशी युद्धात भाग घेतला नाही.

स्वित्झर्लंड न्यूट्रॅल राहतं म्हणजे नेमकं काय करतं…?

स्वित्झर्लंड हा युरोपातल्या २७ राष्ट्रांचा समूह असलेल्या E.U.म्हणजे युरोपियन युनिअनचा सदस्य नाहीये. १९४५ मध्ये युनायटेड नेशन्सच्या स्थापनेनंतर, स्वित्झर्लंडने सदस्यत्व नाकारले होते.  शेवटी मग  २००२ मध्ये पाच दशकांनंतर स्वित्झर्लंड या आंतरराष्ट्रीय संस्थेत सामील झाले.

ज्या नाटोचं कारण देऊन रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे त्याचाही स्वित्झर्लंड सदस्य नाहीये.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या सशस्त्र तटस्थतेच्या जीवावर हा देश दोन्ही महायुद्धांमध्ये आपली तटस्थता राखण्यात यशस्वी ठरला होता.

पण कसा… ?

पहिले महायुद्ध 

पहिल्या महायुद्धा दरम्यान, स्वित्झर्लंडने दोन सेंट्रल पॉवर्स (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) आणि दोन मित्र राष्ट्रे (फ्रान्स आणि इटली) यांच्याशी सीमा तटस्थतेचे धोरण कायम ठेवले. स्वित्झर्लंडमधील जर्मन भाषिक बहुसंख्य सामान्यत: दोन सेंट्रल पॉवर्सना अनुकूल होते, तर फ्रेंच-भाषिक आणि इटालियन-भाषिक लोकसंख्येनच मात्र मित्र राष्ट्रांच्या बाजूने जायची इच्छा होती. यातून अंतर्गत तणावाची ठिणगीही  पडली होती तरीही कुणाच्या अज्ञात ना मद्यात ना पडता स्वित्झर्लंड तटस्थ राहिलाच.

दुसरे महायुद्ध

दुसऱ्या महायुद्धात मात्र स्वित्झरलँडच्या धोरणाचा चांगलाच कस लागला. युद्धात सुरवातीपासून स्वित्झरलँडने आम्ही तठस्तच आहोत असं सांगता होता मात्र हिटलरला मात्र जग जिंकायचा होतं. आणि मग त्यानुसार स्वित्झरलँडला रोखण्यासाठी नाझी आक्रमणाचा सामना करण्याची पूर्ण तयारी केली होती.  आल्प्स ने वेढलेल्या स्वित्झर्लंडने  या पर्वतात मोक्याच्या ठिकाणी चौक्या उभारून ठेवल्या होत्या. आणि आपला सगळं प्लॅन पुढे आणून स्वित्झरलँडला जिंकणं कसं अवघड आहे हे छापून आणलं.हिटलरनं पण मग ऐन टाईमला प्लॅन चेंज करत स्वित्झरलँडवर हल्ला केला नाही.

मात्र मित्र राष्ट्रांनी जर्मनी समजून केलेल्या हल्यात स्वित्झरलँडला काही प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागली होती. या युद्धात स्वित्झरलँडने दोन्ही साइडच्या जखमी युद्धकैद्यांना आपल्या देशात आसरा दिला होता.

मात्र तटस्थ राहण्याच्या नादात स्वित्झरलँडने कधी कधी मातीपण खाल्ली आहे.

दुसऱ्या महायुद्धात ज्यू शरणार्थ्यांना प्रवेश नाकारणे, ज्यूंकडून नाझी सैन्याने लुटलेलं सोनं आपल्या बँकांमध्ये ठेवण्यास परवानगी देणं अशी कामही स्वित्झरलँडने न्यूट्रॅलिटीच्या नावाखाली केली आहेत. तसेच पूर्ण जग अपार्टहेड सिस्टिम असलेल्या साऊथ आफ्रिकेवर बंधन घालत असताना स्वित्झर्लंड मात्र व्यापार करत राहिला.

एवढाच नाही

बाकी स्वित्झर्लंड तसा शांतताप्रिय देश आहे पण भोळा नाहीये. 

जरी कोणत्या युद्धात भाग घेत नसले तरी स्वित्झरलँडचं सुसज्ज अशी आर्मी आहे आणि प्रत्येक पुरुष नागरिकाला देशाच्या आर्मीत काम करणं कंपलसरी आहे.

पण न्यूट्रॅलिटीचा स्वित्झरलँडला फायदाही तितकाच झाला आहे…

आज जागतिक आरोग्य संघटना, जागतिक व्यापार संघटना ते अगदी ऑलीम्पिक संघटना आणि फिफा यांची मुख्य कार्यालये स्वित्झरलँडमध्ये आहेत. त्याचबरोबर वोइल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या संघटना आपल्या कॉन्फरन्स स्वित्झरलँडमध्येच आयोजित करतात. तसेच स्वित्झरलँडमध्ये असलेलं हे  सुरक्षित वातवरण तिथल्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येण्याचं मोठं कारण आहे.

आणि असही कोणाची साइड घेऊन स्वित्झरलँडला महासत्ता वगैरे तर बनायचं नाहीये. बाकी कोणत्या देशानं कसं वागयचं हे त्यांच्या देशातील लोकं ठरवतात. 

२०१८ मध्ये जेव्हा स्वित्झरलँडने असंच तठस्थ राहवं का यावर सर्व्हे घेण्यात आला तेव्हा ९५% लोकांनी आपण असंच कोणाच्या भांडणात पडू नये असं म्हटलं होतं.

त्यामुळं ह्या सगळ्या परंपरा मोडीत काढत रशियावर जे स्वित्झरलँडने निर्बंध टाकले आहेत त्याला देशांतर्गत कसं स्वीकारला जातं हे पाहण्यासारखं असणार आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.