लेखणी स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपतींची बदनामी करण्याचे हे कुठले धाडस..?

गिरीश कुबेर. एका प्रस्थापित वृत्तपत्राचे संपादक. अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर पुस्तकाचे लिखाण करणारे सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत. ओळख एवढी स्पष्ट आणि वजनदार असेल तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपसूकच ‘अभ्यासू व्यक्ती’ बनून जातो.

पण अशा अभ्यासू म्हणवणाऱ्या व्यक्तीने कोणताही अभ्यास न करता मत ठोकून देणे याला कोणती वैचारिकता म्हणायची?

‘Renaissance State’ हे श्री. कुबेर यांचे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं आहे.

मागील दोन-तीन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात या पुस्तकाविरोधात जोरदार निषेध नोंदवला जातोय. त्यात चुकीचे काहीच नाही. कारण, श्री. कुबेर यांच्या मते ‘छत्रपती संभाजी महाराज’ मराठ्यांच्या इतिहासात होऊन गेलेलं अतिशय अविवेकी व्यक्तिमत्त्व.

या पुस्तकाच्या पान क्रमांक ७६ वर लेखक महोदय म्हणतात,

“शिवाजीच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला. संभाजीने सोयराबाई आणि शिवाजीच्या हयातीत तयार झालेल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री ठार केले. या चुकीमुळे स्वराज्यातील कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा त्याला पुढे भोगावी लागली.”

एवढेच करून श्री. कुबेर थांबले नाहीत. याच पानावर पुढच्या पॅरामध्ये म्हणतात,

“शिवाजीच्या सैन्याने प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत पण संभाजीच्या सैन्याने केले. संभाजी कडे शिवाजीएवढी सहनशीलता नव्हती, परराष्ट्रविषयक धोरणही नव्हते.”

वरील सर्व विधान नेमके कोणत्या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे केले गेले? संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळी अष्टप्रधान मंडळातील एकाही मंत्र्याचा मृत्यू झालेला नव्हता. ऑगस्ट 1680 मध्ये एका पुजाऱ्याला दिलेल्या दानपत्रात संभाजी महाराज सोयराबाई राणीसाहेबांना ‘स्फटिकाहुन निर्मळ माता’ असे म्हणतात.

मग संभाजी महाराजांनी सोयराबाई राणीसाहेबांचा खून केला, हे मांडण्याचे कारण काय?

अण्णाजी दत्तो आणि मंडळी स्वराज्याच्या होणाऱ्या छत्रपतींना कैद करायला गेली तरीसुद्धा संभाजी महाराजांनी राजाचा क्षमाशीलता गुण दाखवत या सर्व मंत्र्यांना माफ केले. राज्याभिषेकाप्रसंगी सर्वांना हुद्याचे वाटप केले, स्वराज्याची जबाबदारी पुन्हा एकदा सोपवली. तरीसुद्धा या कुटील मंडळींनी संभाजी महाराजांच्या जीवाला परत एकदा धोका उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.

पण ही घटना राज्याभिषेकानंतरची आहे. जेव्हा युवराज संभाजी ‘छत्रपती संभाजी महाराज’ म्हणून स्वराज्य रक्षण्याचे काम करत होते. या घटनेनंतर स्वराज्यद्रोह्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी शासन केले.

मग राज्यप्राप्तीसाठी मंत्र्यांचा खून केला, ही मांडणी का रेटायची?

हे सगळं खोटं-नाट खोडून काढण्यात इतिहासाचे भीष्माचार्य ‘वा. सी. बेंद्रे’ यांची हयात गेली. कमल गोखले, सदाशिव शिवदे, जयसिंगराव पवार या संशोधकांनी संशोधन करून खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला.

मागच्या 60-70 वर्षात एवढं मोठं संशोधन होऊन सुद्धा त्याची पुसटशी कल्पना नसलेले श्री. कुबेर आंतरराष्ट्रीय राजकारणावर मोठ्या फुशारकीने गप्पा मारत असतात, लिहीत असतात. ह्या गोष्टीला काही अर्थ आहे? महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणत्याही मुलाला संभाजी महाराजांवर कोणते पुस्तक वाचावे असं विचारलं असत तर निदान खरा इतिहास सांगणारे बेंद्रे, शिवदे, गोखले, पवार यांची पुस्तके भेट म्हणून दिली असती.

वर हे लेखक महाशय म्हणतात,

‘संभाजीकडे शिवाजीसारखी सहनशीलता नव्हती, परराष्ट्रधोरण नव्हते.’

पोर्तुगीजांनी लिहिलेली कागदपत्रे भाषांतरित करून मोठा ऐतिहासिक ठेवा उपलब्ध करून देणाऱ्या श्री. पांडुरंग पिसुरलेकर’ यांच्या पोर्तुगीज-मराठे पुस्तकावर लेखकांनी नजर जरी फिरवली असती, तर हे लिहायला त्यांचे हात धजावले नसते.

संभाजी महाराजांचा राजदूत जर पोर्तुगीजांना भेटायला आला, तर त्याच्या स्वागताला वजीर दर्जाच्या मंत्र्याची रवानगी केली जाई. सारे पणजी शहर सजवले जाई. त्या मराठ्यांच्या राजदूतास राहायला प्रत्येक वेळी नवीन घर बनवण्यात येत असे.

जोवर संभाजी महाराज होते, तोवर पोर्तुगीजांनी कधीही डोके वर काढले नाही.

गोव्याच्या बाहेर पोर्तुगीजांना हातपाय पसरता आले नाहीत, त्याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांचा उल्लेख प्रत्येक वेळेस ‘छत्रपती संभाजी’ असाच केला आहे.

पण श्री. कुबेर यांना कदाचित शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना ‘छत्रपती’, ‘राजा’, ‘महाराज’ असे संबोधित करायला लाज वाटत असावी. पुणे विद्यापीठाने प्रकाशित केलेला हा पोर्तुगीज मराठे संबंधातील ग्रंथ विद्वान कुबेर सरांना कधी पाहण्यात आला नसावा.

थोरल्या शाहू छत्रपतींमध्ये ‘दूरदृष्टीचा अभाव’ होता असे म्हणत त्यांनी दिल्ली न जिंकण्याचे खापर शाहू महाराजांच्या माथी फोडले. पण हे करत असताना थोरल्या बाजीराव पेशव्यांना मात्र ‘दिल्लीस जाऊन जरीपटका फडकवणारा पहिला मराठा योद्धा’ घोषित केले.

थोरल्या शाहू महाराजांनी आपल्या आईच्या सुटकेसाठी लाखभर सैन्य दिल्लीत घुसवून, फारुखसियार बादशाहचे भर दरबारात डोळे, हात पाय तोडून मारल्याची गोष्ट बहुदा श्री. कुबेर यांना माहीत नसावी.

ही मोहीम सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली निघाली होती. या मोहिमेत दाभाडे सरदारांच्या हाताखाली थोरल्या बाजीरावांनी पहिल्यांदा दिल्ली पाहिली. थोरल्या बाजीरावांवर नितांत प्रेम करणाऱ्या थोरल्या शाहू छत्रपतींचा इतिहास या महाशयांना माहीत तरी असेल का, हा प्रश्न पडतो.

जेव्हा पुण्यातील थोर विद्वानांनी बाजीरावांना त्रास दिला, तेव्हा थोरले शाहू छत्रपतींनी साऱ्या कुटील मनोवृत्तीच्या लोकांना दम भरला होता. पिता-पुत्राप्रमाणे वास्तल्यपूर्ण नाते असणाऱ्या बाजीरावांच्या खांद्यावर बंदूक ठेवून छत्रपती शाहू महाराजांवर निशाणा साधणारी पिढी जाऊन एक दशक उलटले आहे, याची कल्पना श्री. कुबेर यांना नसावी। त्यांनी पुन्हा तसा प्रयत्नही करू नये.

आपल्या पुस्तकासाठी दुसऱ्यांचे ब्लॉग चोरून लिखाण करण्याएवढे हे विषय सोपे नाहीत. वा. सी. बेंद्रे, सेतुमाधव राव पगडी, गजानन भास्कर मेहेंदळे, ग. ह. खरे, जयसिंगराव पवार, प्रमोद मांडे सर यांसारख्या कित्येक इतिहास संशोधकांचे संपूर्ण आयुष्य केवळ मराठ्यांच्या इतिहासात प्रामाणिक संशोधन करण्यात आणि पुस्तकरूपाने लोकांसमोर मांडण्यात व्यतीत झाले.

पण यांच्यातील कोणत्याही एका व्यक्तीने लिहिलेले आणि ‘प्रमाण’ समजले जाणारे ग्रंथ चाळण्याचे कष्ट कुबेरांनी का घेतले नसावेत, हा प्रचंड मोठा प्रश्न आहे.

महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या छत्रपती घराण्यात जन्मलेले महान व्यक्तिमत्त्व ‘राजर्षी शाहू छत्रपती’. पण त्यांच्याविषयी एक ओळ लिहिण्याचे कष्ट का घेतले नसावेत? त्यांचे कर्तृत्व या महाराष्ट्रासाठी प्रेरणास्त्रोत आहे, तुमच्या एका चुकीच्या उल्लेखाने किंवा अनुल्लेखाने या महापुरुषांच्या उंचीला कणभरसुद्धा धक्का लागणार नाही.

पण आपल्यासाठी देह झिजवणाऱ्या महापुरुषांप्रती उपकृत होण्याची भावना मनात नसेल, तर त्यास काय म्हणावे?

गिरीश कुबेर सर, आम्हाला तुमची माफी नको. जेम्स लेन प्रकरणात इतिहासाची मोडतोड झाल्यावर ना कुठल्या नेत्याला झळ लागली, ना लेखकाला ना त्या विकृत इतिहासाची माहिती पुरवणाऱ्यांना. होरपळला तो इथला तरुण. तेव्हापासून आजतागायत हा सामान्य तरुण झगडतोय.. महाराष्ट्राला सुगीचे दिवस दाखवणाऱ्या भोसले घराण्याच्या तीन पिढ्यांच्या इतिहासाला न्याय देण्यासाठी.

पण तुमच्यासारखे वैचारिक लोक जर अशा मेखा मारून ठेवणार असतील, तर त्या उपटण्यातच या पिढीचे संपूर्ण आयुष्य खर्ची पडणार आहे की काय, अशी भीती वाटते. मागच्या शंभर वर्षात चुकीच्या इतिहासाने ग्रासलेला महाराष्ट्र आता कुठे रुळावर येतोय. त्यातच तुम्ही ही बौद्धिक दिवाळखोरी दाखवून विकृतीचे कळस गाठत आहात..

शिवरायांच्या ज्या पुत्राने संपूर्ण आयुष्य केवळ लोकसंरक्षणासाठी घालवले त्या संभाजी महाराजांना खुनी ठरवत आहात, त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर शंका उपस्थित करत आहात. इराणचा बलाढ्य बादशाह ‘नादिरशाह’ केवळ थोरल्या शाहू छत्रपतींचे नाव ऐकून भारतातून पळून जातो, जाता जाता ‘हिंदुस्थानाचा सांभाळ करण्यास हिंदुपती शाहू हेच योग्य व्यक्ती आहेत’ असं ठामपणे सांगतो त्या शाहू छत्रपतींच्या पराक्रमी करकीर्दीला तुमच्या लेखणीच्या न्यायाची अपेक्षा अजिबात नाही.

लेखणी स्वातंत्र्याच्या नावाखाली छत्रपतींची बदनामी करण्याचे हे कुठले धाडस?

महाराष्ट्राच्या कर्त्या-धर्त्या मालकांच्या पराक्रमावर शंका उपस्थित करण्याची शक्ती तुम्हाला याच शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि दोन्ही शाहू छत्रपतींच्या अतुलनीय कार्यामुळे मिळाली आहे, याची जाणीव तुम्हाला नसली म्हणून काय झालं. महाराष्ट्रात या महान राजांची कीर्ती ‘यावतचंद्रदिवाकरो’ तळपत राहील, सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट..

  •  भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. MANOJ GHATAGE says

    जर कोणी छत्रपती घराण्यातील व्यक्ती विषयीची चुकीची माहिती प्रकाशित करून संपुर्ण हिंदूस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती थोरले शाहु महाराज, छत्रपती शाहू महाराज , करवीर व सातारा गादी चा अपमान सहन केला जाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.