कबर, मकबरा, मजार अन् दर्गा यात काय फरक असतो ?

प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीच्या बाजूचं अनाधिकृत बांधकाम  पाडण्यात आलं आहे. कराड, वाई, सातारा, प्रतापगड इथे जमावबंदी लागू करून तब्बल १,५०० पोलिसांच्या बंदोबस्तात ही कबर पाडण्यात आली.

या कबरीवर बांधकाम करून याचं उदात्तीकरण केलं जात आहे म्हणून यावर अनधिकृत रित्या केलेलं बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी गेल्या १९९० पासून करण्यात येत आहे. 

हिंदुत्ववादी संघटनांनी यासाठी अनेकदा मागणी केली होती. गेल्या ३२ वर्षात या मागणीने अनेकदा हिंसक वळण सुद्धा घेतलं होतं. २००६ मध्ये स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या कबरीचं उदात्तीकरण थांबवण्यात यावं अशी मागणी केली होती. या मागणीला पाचवड येथे हिंसक वळण लागलं होतं त्यामुळे गेल्या १६ वर्षांपासून या कबरीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पण आज छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याच्या ३६३ व्या दिनी राज्य सरकारने हे अतिक्रमण पाडलं आहे. 

अफजलखानाचा वध केल्यानंतर स्वतः शिवाजी महाराजांनी याठिकाणी ही कबर बांधली होती. त्यानंतर ३२६ वर्ष या कबरीवरून कोणताच वाद झाला नाही. नंतर १९८५ पासून या कबरीवर अनधिकृत बांधकाम करणे आणि त्या ठिकाणी उरूस भरवणे या प्रकारांमुळे ही कबर वादात सापडायला लागली होती. अखेर या कबरीवरचं सगळं अनधिकृत बांधकाम आज पाडण्यात आलंय त्यामुळे हा वाद मिटेल असं म्हटलं जात आहे.

पण यानिमित्ताने एक मुद्दा उपस्थित होतो की, मुस्लिम धर्मातील कबर, मकबरा, दर्गा आणि मजार यामध्ये नेमका काय फरक आहे.

कारण मजार आणि दरगाह मध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोकं जातात आणि सुफी संतांचं दर्शन घेतात. तर मोठमोठ्या शाही मकबऱ्यांना बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. त्यामुळे या चारही ठिकाणांमध्ये नेमका काय फरक असतो ते बघुयात. 

तर मकबरा, दरगाह आणि मजार या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे कबर.

मुस्लिम धर्मातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाला जमिनीमध्ये पुरण्यात येतं. इस्लाम धर्मामध्ये सर्व मुस्लिम व्यक्तींना सामान मानलं जातं त्यामुळे हे मृतदेह कब्रिस्तानात पुरले जातात. इस्लामी शिकवणीनुसार मृतदेह पुरल्यानंतर त्यावर कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यात येऊ नये असं सांगितलं गेलं आहे.

पण राजेरजवाडे, श्रीमंत लोकं आणि सुफी पंथातील पीर, फकीर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना पुरलेल्या जागी बांधकाम करण्यात येतं.

यात पहिलं बांधकाम केलं जातं ते कबरीचं.

मुस्लिम व्यक्तीचा मृतदेह ज्या ठिकाणी पुरण्यात येतो त्या जागेला कबर असे म्हणतात. आर्थिक सुबत्तेनुसार लोकं यावर चबुतरा किंवा ओटा बांधतात. या चबुतऱ्याला सुद्धा कबर असंच म्हटलं जातं. सामान्यपणे या कबरी समाधीइतक्याच छोट्या असतात तर काही कबरी मोठ्या आकाराच्या सुद्धा असतात. नंतर याच कबरीवर मकबरा, दरगाह किंवा मजारीचं बांधकाम केलं जातं.

कबरीवर कोणत्याही प्रकारचं बांधकाम केलं गेल्यास त्याला मकबरा असं म्हटलं जातं.

पूर्वीच्या काळात धनाढ्य किंवा महत्वाच्या लोकांचे मृतदेह कब्रिस्तानात पुरण्याऐवजी त्यांना वेगळ्या आणि प्रशस्त जागेत पुरलं जात होतं. त्यानंतर त्यावर संगमवरी किंवा चांगल्या दगडांचा वापर करून त्या व्यक्तीची कबर बांधण्यात येत होती. तसेच कबरीवर महल किंवा छत्रीसारखं बांधकाम केलं जायचं. या बांधकामालाच मकबरा असं म्हटलं जातं. 

यातले काही काही मकबरे साध्या स्वरूपाचे आहेत तर काही मकबरे हे अतिशय आलिशान स्वरूपाचे आहेत. यात हुमायूं का मकबरा, ताजमहल, बीबी का मकबरा अशा काही प्रसिद्ध मकबऱ्यांचा समावेश होतो. या मकबऱ्यांना आलिशान महलांप्रमाणे बांधण्यात आलंय. या मकबऱ्यात लोकांना राहण्यासाठी वेगवगेळ्या खोल्या आणि हॉलचं बांधकाम केलं गेलंय. 

निधन झालेल्या महत्वाच्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यावर हे मकबरे बांधलेले जायचे. फक्त संपत्तीचं प्रदर्शन करणे आणि स्मृती जपणे हेच या मकबऱ्यांमागचं कारण होतं. 

मकबऱ्याचा आणखी एक प्रकार असतो तो म्हणजे दरगाह किंवा मजार.

ज्याप्रमाणे राजेरजवाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मकबऱ्यांच बांधकाम केलं जायचं, त्याचप्रमाणे सुफी पंथातील संत, वली, दरवेश, पीर आणि फकिराच्या स्मृती जपण्यासाठी दर्गे किंवा मजारीची निर्मिती केली जाते. तसेच महत्वाच्या धार्मिक नेत्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुद्धा मांजरी बांधल्या जातात.

इस्लाम धर्मातील शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथांपेक्षा सुफी पंथाच्या मान्यता वेगळ्या आहेत. इस्लाममध्ये व्यक्तिपूजा आणि मूर्तीपूजेला विरोध करण्यात आला आहे. मात्र सुफी पंथामध्ये व्यक्तिपूजा केली जाते. सुफी संतांचे मोठ्या प्रमाणावर अनुयायी असतात. संतांच्या मृत्यूनंतर हेच अनुयायी त्यांच्या कबरीवर दर्गा बांधतात. 

या दर्ग्यामध्ये संतांच्या कबरीवर फुलाच्या, कापडाच्या चादरी चढवल्या जातात. इत्तर टाकला जातो, उद किंवा उदबत्त्या जाळल्या जातात आणि संताची आराधना केली जाते. या आराधनेलाच जियारत असं म्हणतात. यामध्ये अजमेरचा ख्वाजा गरीब नवाज यांचा दर्गा आणि फतेहपूर सिक्रि येथे असलेला शेख सलीम चिश्ती यांचा दर्गा भारतभर प्रसिद्ध आहे. तर महाराष्ट्रात मेहकरचे सैलानी बाबा, नागपूरचे ताज बाबा यांचे दर्गे सुद्धा प्रसिद्ध आहेत. 

तर अफगाणिस्तानात असलेली मजार ए शरीफ, पाकिस्तानात असलेली मुहम्मद अली जिन्ना यांची मजार सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे.  

अशाप्रकारे कबरीवरच मकबरा, दर्गा किंवा मजारिंची निर्मिती केली जाते 

याच कबरी, मकबरे, दर्गे आणि मजारींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन तांबोळी यांच्याशी संपर्क साधला. 

ते सांगतात की, “मुळात कबरीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये अशी शिकवण इस्लाम धर्मात देण्यात आली आहे. त्यामुळे मृतदेह कब्रिस्तानात एका रांगेत पुरले जातात. कालांतराने जेव्हा कब्रिस्तानातली जागा संपते तेव्हा पुन्हा जुन्या कबरी खोदून त्याजागी नवीन मृतदेह पुरले जातात. मात्र श्रीमंत लोक आणि पूर्वीच्या राजेरजवाड्यांनी यावर मोठमोठे स्मृतिस्थळ बांधण्यास सुरुवात केली आणि म्हणूनच मकबऱ्यांच बांधकाम सुरु झालं.”

पुढे बोलतांना ते सांगतात की, “सुफी पंथातील संतांच्या कबरींवर दर्ग्यांची निर्मिती केली जाते. कारण सूफींमध्ये व्यक्तीची पूजा करणे आणि त्याची आराधना करणे याला महत्व आहे. मात्र कट्टर मुसलमान या पद्धतीला विरोध करतात. या दर्ग्यांवर हिंदू आणि मुसलमान असे दोन्ही धर्मातील लोकं जातात, असं शमशुद्दीन तांबोळी यांनी सांगितलं.

अशाप्रकारे मुस्लिम धर्मात कबर, मकबरे आणि दर्गा असे वेगवगेळे प्रकार आहेत. अफजलखानाच्या कबरीवर सुद्धा दर्ग्याप्रमाणे बांधकाम करून त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु त्यावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे सरकारने त्यावरच सगळं अनधिकृत बांधकाम पडून टाकलं आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.