पंजाबमध्ये शिवसेना नेत्याची हत्या झाली, पण तिथे एक नाही तर अनेक शिवसेना आहेत…
पंजाबच्या अमृतसरमध्ये मंदिराबाहेर निदर्शनं करत असताना शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यांची प्राणज्योत मावळली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असली, तरी त्यांच्या हत्येमुळं वातावरण तापू नये यासाठी पंजाब पोलिस दक्षता घेत आहेत.
पण राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सध्याही शिवसेनाच आहे, त्यात शिवसेना कोणाची हा वाद आहेच मग साधा प्रश्न पडला की, पंजाबमध्ये असलेले हे सुधीर सूरी नेमके कोणत्या गटाचे ? त्यांच्या शिवसेनेचा महाराष्ट्राच्या शिवसेनेशी काही संबंध आहे का ?
सगळ्यात पहिले लक्षात घ्या की, पंजाबमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेनेची शाखा आहे. मात्र पंजाबमध्ये ज्या इतर शिवसेना आहेत त्या सगळ्या शिवसेनांना कोणतीही ओळख नाहीये, यांची नोंदणी नाही किंवा…
ज्यांचा मुंबई कार्यालयाशी म्हणजेच महाराष्ट्राच्या शिवसेनेशी काहीही संबंध नाही.
पण तरी ते शिवसेनेचं नाव वापरतात.
का?
याचं उत्तर त्यांच्या स्थापनेच्या घटनाक्रमात आहे…
१९८० च्या दशकाच्या मध्यात जेव्हा खलिस्तानी दहशतवादाचा गदारोळ सुरु होता त्याच काळात राम जन्मभूमीचा मुद्दाही जोर धरू लागला होता. उत्तर भारतातील दोन भिन्न राजकीय प्रवाह हिंदू अस्मितेभोवती एकत्र येत होते. अशात १९८६ दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात सर्वत्र तेच हिंदूंचा आवाज असल्याचा दावा केला होता.
फक्त पंजाबमधील शिवसेनेने स्वत:ला या भूमिकेत असल्याचं सांगितलं होतं. ही शिवसेना १९६६ साली बाळसाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्रातील शिवसेनेपेक्षा अगदी वेगळी होती.
मात्र दोन्ही शिवसेनांनी कडवी हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेतली तर त्यांच्या पंजाबच्या साथीदारांनी स्वत:ला भगवान शंकराचे सैनिक म्हणून तयार केलं. १९८० च्या दशकात महाराष्ट्र शिवसेनेने प्रामुख्याने मुस्लिम आणि बाहेरच्या लोकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती, तर पंजाब शिवसेनेने मोठ्या प्रमाणात शिखांना लक्ष्य केलं.
या पंजाबच्या शिवसेनेत सुरुवातीपासूनच अनेक गट पडले होते. आणि हे सगळे स्वयंघोषित होते.
महाराष्ट्रातील शिवसेना हा एक राजकीय पक्ष आहे… पण पंजाबमध्ये शिवसेनेचं असं कोणतंही राजकीय ब्रँडिंग नाही. राज्यातील सर्व शिवसेना या ‘जातीयवादी संघटना’ असून त्यांना कोणतीही राजकीय वैधता नाही किंवा ते निवडणुका लढवत नाहीत.
शीख गटांशी संघर्ष भडकविण्याशिवाय दुसरा कोणताही त्यांचा उद्देश नाही.
पण तरीही, ते नाव कमावत आहे आणि बऱ्याच ‘संघटनांनी’ त्यांना हाताशी धरलं आहे, ज्यामुळे पंजाबमधल्याच ‘मूळ’ शिवसेनेशी त्यांचे संबंध आहेत का? यावरही संभ्रम निर्माण होतोय.
मग इतक्या सगळ्या शिवसेना आहेत त्यांना ओळखलं कसं जातं? तर या शिवसेनांच्या पुढे एखादा शब्द लावलेला असतो.
जसं की, शिवसेना (हिंदू), शिवसेना (पंजाब), शिवसेना (टाकसाळी), शिवसेना (हिंदुस्थान), शिवसेना (शेरे हिंद), आणि शिवसेना (समाजवादी) वगैरे वगैरे.
पण पक्षाच्या नावानंतर एखादा शब्द जोडण्याची गरज काय?
या प्रश्नावर पंजाबमधील मुख्य शिवसेनेचे पक्षप्रमुख योगराज शर्मा यांनी ‘द प्रिंटला’ सांगितल्याप्रमाणे, राज्यात अनेक असंबंधित शिवसेना असल्याने तसं करणं आवश्यक होतं. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या शिवसेनेचा आम्ही एक भाग आहोत, हे विशेषत्वानं सांगावं लागतं.
या इतर शिवसेनांमुळे पंजाबमध्ये अनेक समस्यांना देखील सामोरं जावं लागतंय. पंजाबमधील हे तथाकथित शिवसैनिक लोकांसाठी काहीही करत नाहीत, ते फक्त त्यांचा अहंकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वास्तविक शिवसैनिक जनतेचे प्रश्न मांडतात, मग ती दरवाढ असो किंवा वीज तोडणी, पण हे लोक निरुपयोगी मुद्द्यांबद्दल नाराजी पसरवतात आणि वादग्रस्त विधाने करत राहतात, असंही शर्मा यांनी सांगितलंय.
या सर्व शिवसेनांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे, १९८० च्या दशकापासून ते १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत एक ज्वलंत मुद्दा राहिलेल्या खलिस्तान फुटीरतावादी चळवळीच्या विरोधात त्यांचं सततचं वक्तृत्व. त्यांच्या फेसबुक पेजेसमधूनही हेच मुद्दे समोर येतात.
एक म्हणजे, खलिस्तानचा निषेध करणं ज्यात बऱ्याचदा खूप शिवीगाळ केली जाते आणि त्यानंतर स्थानिक बातम्यांचे लेख शेअर करणं ज्यात शीख अतिरेक्यांकडून धमक्या मिळाल्याबद्दल बोललं जातं. या दाव्यांच्या सत्यतेची कोणतीही शाश्वती नसते.
२०१७ मध्ये अशाच धमक्यांच्या खोट्या गोष्टी बनवल्याच्या आरोपाखाली शिवसेना (हिंद) च्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली होती.
तेव्हा प्रश्न निर्माण होतो की, हे लोक असं करतात का?
याचं उत्तर म्हणजे, अधिक पोलिस संरक्षण मिळवणं.
आधी ते शीखांविरूद्ध ओरडतात, नंतर म्हणतात आम्हाला धमकावलं जातंय आणि नंतर त्याचा वापर पोलिसांकडून संरक्षण मिळविण्यासाठी करतात. आणि हो, यातील अनेकांना राज्यमान्य संरक्षण आहे देखील.
उदाहरणार्थ, मागे एका घटनेत हरीश सिंगला नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली त्यावेळी एक्स-श्रेणीची सुरक्षा त्यांना होती.
राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे की, यामुळे त्यांना आपला दबदबा दर्शविण्यास मदत होते. जेव्हा ते लोकांत बाहेर पडतात आणि त्यांच्याबरोबर १०-१५ पोलीस फिरत असतात, तेव्हा त्यांच्या मताला वैधता मिळते.
भक्कम सुरक्षा कवच असल्याने शिवसैनिकांना लोकांना भडकावण्याचं आणि चिथावणी देण्याचं अधिक स्वातंत्र्य मिळतं आणि ते भडकाऊ विधाने करत राहतात. ते विचार न करता कोणावरही हात उगारू शकतात पण इतक्या पोलिसांमुळे कुणीही मागे वळून त्यांच्यावर हात उगारू शकत नाही.
अशाप्रकारे पंजाबमध्ये या शिवसेनांनी गोंधळ पसरवला आहे. मागच्या आठवड्यात तिथलेच शिवसेना नेते अश्वनी चोप्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता आणि आता सुधीर सूरी यांच्यावर गोळीबार झाला, मात्र त्यांना वाचवण्यात यश मिळालं नाही.
तुम्हाला पंजाबच्या या शिवसेनांबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा…
हे ही वाच भिडू :
- उपपंतप्रधानाची गाडी अडवली आणि शिवसेना नावाच्या वादळाची ओळख संपूर्ण देशाला झाली…
- इंडियन आयडॉल ते शिवसेना असा भन्नाट प्रवास असलेला अभिजित सावंत कुठं गायब झाला ?
- तोट्यात गेलेल्या पंजाबला ३०० युनिट वीज फ्री देणं कसं जमणारेय, समजून घ्या…