घनिष्ट मैत्री ते राजकीय विरोधक, एकनाथ शिंदे-राजन विचारे या कारणांमुळे वेगळे झाले…

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या पिक्चरमधला सिन, आनंद दिघे ठाणे महानगर पालिकेच्या सभागृह नेत्याला अगदी अर्जंट बोलावतात. तो नेताही धावतपळत येतो,

त्यानंतर आनंद दिघे विचारतात, “तू सभागृह नेता आहेस ना ?”
समोरुन उत्तर येतं “हो साहेब.”
“समजा मी म्हणालो की सोड हे नेतेपद तर ?”

यावर उत्तर येतं, “साहेब श्वास घेणं सोड म्हणलात, तर तेही सोडेन, पद तर तुम्हीच दिलंय ना.”

यानंतर आनंद दिघे ही जबाबदारी एकनाथ शिंदेंना द्यायला सांगतात आणि हे जुने सभागृह नेते आपली गाडी एकनाथ शिंदेंच्या घरी लाऊन येतो असं सांगतात.

त्यानंतरचा आनंद दिघेंचा डायलॉग दाखवलाय, “असेच आयुष्यभर एकत्र रहा, संघटना वाढवा.” या सिनमध्ये आनंद दिघेंसोबत असणारा सभागृह नेता म्हणजे राजन विचारे. सध्याचे ठाण्याचे खासदार आणि लोकसभेतले शिवसेनेचे प्रतोद राजन विचारे.

एकनाथ शिंदेंचं बंड झालं, त्या दरम्यानच चर्चा सुरू झाली होती, ती म्हणजे खासदारांचं काय ? तेव्हा अनेक जणांकडून सांगण्यात येत होतं की शिवसेनेचे दोन खासदार हमखास शिंदे गटात जाणार, श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे.

कारण श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांचे पुत्र तर राजन विचारे हे अगदी जुने मित्र. पण तसं झालं नाही, राजन विचारे हे शिंदे गटात न जाता, उद्धव ठाकरेंसोबत राहिले. 

त्यानंतर उद्धव ठाकरेंसाठीचा ठाण्याचा किल्ला अजूनही ते लढवताना दिसत आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेला खिंडार पाडलं असताना उरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू राजन विचारे यांनी लावून धरली आहे.

मात्र आज त्यांनी कधीकाळी त्यांचे मित्र आणि साथीदार असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राजन विचारे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. तसेच आपली पोलीस सुरक्षा कमी करण्यात आली असून जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असंही विचारे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र शासनाकडून व प्रशासनाकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल गुन्हे अनेक कार्यकर्त्यांना नोटीसा तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वर्षानुवर्षे ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत सुरु असल्ले्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागावरे हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे. इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथित स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. असा आरोपही राजन विचारे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

त्यामुयलॆ आनंद दिघेंचे शिष्य असणाऱ्या विचारे आणि यांच्यातला वाद अजूनच चिघळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. याची सुरवात झाली होती एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विचारेही गुवाहाटीला असल्याच्या बातम्या आल्या, मात्र नंतर त्यात तथ्य नसल्याचं समोर आलं.

स्वतः राजन विचारे यांनी आपण अमरनाथ यात्रेला गेलो असल्याचं सांगितलं. जेव्हा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांची बैठक बोलावली, तेव्हाही विचारे तिथे उपस्थित होते. सोबतच भावना गवळी यांच्या जागी लोकसभेत प्रतोद निवडण्याची वेळ आली, तेव्हा उद्धव ठाकरेंनी राजन विचारे यांना संधी दिली. तेव्हा एकनाथ शिंदेंच्याच जवळच्या मित्राला शिवसेनेनं लोकसभेत मोठी जबाबदारी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

कनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या  ठाण्यातून शिवसेनेचे ६७ पैकी ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील झाले, एक नगरसेविका मात्र उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिल्या, त्या म्हणजे राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे. 

राजन विचारे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच शिवसेनेपासून केली. आनंद दिघे यांचे अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. १९८१ मध्ये विचारे यांना शिवसेना शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांचं नाव आणि काम चांगलंच गाजत होतं, १९९२ मध्ये विचारे पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत निवडून गेले. 

सलग ४ टर्म विचारेंनी नगरसेवक म्हणून काम पाहिलं. १९९८ ते २००१ या काळात त्यांनी महानगरपालिकेत सभागृह नेता म्हणून काम पाहिलं, तर २००५ ते २००७ मध्ये विचारे ठाण्याचे महापौरही होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी ठाणे मतदारसंघातून अवघ्या अडीच हजार मतांनी बाजी मारली होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते ठाणे लोकसभा मतदार संघातून चांगल्या मताधिक्यानं निवडून आले आणि २०१९ मध्येही त्यांनी याचीच पुनरावृत्ती केली. मात्र आता एकनाथ शिंदेंनी बंड केलेलं असताना, ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या या मित्रानं त्यांची साथ दिलेली नाही, असं आतापर्यंत तरी पाहायला मिळतंय.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा पिक्चर आल्यानंतर, ठाण्यातल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत्या.

त्यातली एक चर्चा होती, की सभागृह नेतेपद एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय झाला तेव्हा राजन विचारे फारसे खुश नव्हते. मात्र आनंद दिघे यांचा आदेश अंतिम मानत त्यांनी पदाचा त्याग केला. आनंद दिघे यांचं निधन झाल्यानंतर ठाण्यातल्या शिवसेनेची सूत्र एकनाथ शिंदेंच्या हाती गेली. हळूहळू त्यांचं महत्त्वही वाढत गेलं आणि राजन विचारेंचं खच्चीकरण झालं, असं ठाण्यात बोललं जातं.

याबाबत माहिती घेण्यासाठी बोल भिडूनं मुक्त पत्रकार रविंद्र पोखरकर यांच्याशी संपर्क साधला, 

ते म्हणाले, “एकनाथ शिंदे आणि राजन विचारे हे दोघंही आनंद दिघेंचे कार्यकर्ते आणि कट्टर शिवसैनिक. दोघंही मित्र, पण या दोघांमध्ये फारसं सख्य आहे असं नाही. एकनाथ शिंदेंचा जास्त ओढा पहिल्यापासून आनंद दिघेंकडे, तर राजन विचारेंचा ओढा मातोश्रीकडे जास्त आहे. बाळासाहेबांशी विचारेंचे स्नेहाचे संबंध होते, त्यांच्या पत्नी नंदिनी आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी यांच्यातही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या सगळ्या गोष्टी ते शिंदे गटात न जाण्यास कारणीभूत असू शकतात.”

सोबतच आणखी एक महत्त्वाचा किस्सा पोखरकर यांनी सांगितला,

आनंद दिघेंनी टेंभी नाक्यावर दहीहंडी, नवरात्र आणि शिवजयंती सारखे उत्सव सुरू केले. तेच ठाण्यात शिवसेनेचे प्रमुख उत्सव होते. मात्र आनंद दिघे यांचं निधन झाल्यानंतर टेंभी नाक्यापासून अगदी शंभर-दीडशे मीटरवर असलेल्या जांभळीनाक्यावर राजन विचारे यांनी स्वतंत्र उत्सव सुरू केले. त्यामुळं तेव्हा एकनाथ शिंदे आणि राजन विचारे यांच्यात मतभिन्नता असल्याची चर्चाही झाली होती.”

त्यामुळं पाहायला गेलं तर, हे दोन्ही नेते एकमेकांच्या कार्यक्रमात, प्रचारात दिसत असले, तरी त्यांच्यात अगदी घनिष्ट संबंध आहेत, असं निदर्शनास येत नाहीत. 

काही राजकीय जाणकार असंही निरीक्षण नोंदवतात की, ‘एकनाथ शिंदेंच्या या नव्या राजकीय भूमिकेमुळं ठाण्यात राजन विचारेंना स्पेस मिळू शकेल. त्यांच्या निवडून येण्यात एकनाथ शिंदेंची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. आताही ते एकनाथ शिंदेंसोबत गेले, तर निवडून येण्याची शक्यता पूर्ण आहे; पण विचारे झाकोळून जातील हे सुद्धा नाकारता येणार नाही. आजवर आपलं खच्चीकरण झालं आणि आता पक्षाच्या वाईट काळात आपण एकनिष्ठ राहून लढाई देतोय, हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी विचारेंकडे आहे. असं झालं तर ते ठाण्यात शिवसेनेचा चेहराही बनू शकतात.’

पण दुसऱ्या बाजूला मात्र राजन विचारेंसमोर आव्हानंही तितकीच असतील, दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांना मोठं मताधिक्य मिळालं असलं, तरी त्यातला सेना-भाजप युतीचा आणि एकनाथ शिंदेंच्या करिष्म्याचा वाटा वगळून चालणार नाही. 

विचारेंनी संविधानिक पदं भूषवली असली, ते निवडणुकीच्या राजकारणात तरबेज असले, तरी संघटनात्मक पातळीवर त्यांच्यापुढं ठाण्यातली शिवसेना शून्यातून उभी करण्याचं मोठं आव्हान आहे. उद्धव ठाकरेंनी करायला घेतलेली पक्षाची पुर्नबांधणी, लोकांमधली सहानुभूतीची भावना आणि राजन विचारेंचे कष्ट यावर त्यांचं राजकीय भविष्य अवलंबून आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.