इंग्लंडमध्ये हिंदू-मुस्लिम समुदायात उसळलेल्या दंगलीमागचं नेमकं प्रकरण असं आहे…

२८ ऑगस्ट २०२२. एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होती. मोठ्या स्क्रीनवर लाऊन ही मॅच फक्त भारत किंवा पाकिस्तानच नाही, तर इंग्लंडमध्येही पाहिली जात होती. इंग्लंडची राजधानी लंडनपासून साधारण १६५ किलोमीटर लांब असलेल्या लेसिस्टरमध्येही ही मॅच मोठ्या स्क्रीनवर पाहिली जात होती. मॅच सुरु असतानाच काही जणांमध्ये बाचाबाची झाली, या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं, एका माणसाला मारहाण झाली, त्याचा टीशर्ट फाडण्यात आला आणि या सगळ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

लेसिस्टरमध्ये हिंदू आणि मुस्लिम नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. तिथं मुख्यत्वे भारत आणि पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं आहे. त्यामुळं ही मॅच बघायला चाहते एकत्र आले आणि मॅचवरुन सुरु झालेल्या वादानं हिंसक वळण घेतलं.

२० सप्टेंबर २०२२. लेसिस्टरमधल्या हिंदू आणि मुस्लिम नागरिकांनी एकत्र येत महिनाभरात घडलेल्या घटनांचा निषेध केला आणि दोन्ही समुदायांना शांततेचं आवाहन केलं. ‘आम्ही वर्षानुवर्ष इथं एकत्र राहत आलोय, अनेक संकटांचा सोबत सामना केला आहे. वर्णभेदासारख्या गोष्टीलाही एकत्रपणे छेद देत लेसिस्टरमधली एकता टिकवली आहे. निष्पाप व्यक्तींवरचे हल्ले आणि संपत्तीचं नुकसान करणं याच्या आमही विरोधात आहोत, आमची धार्मिक श्रद्धाही अशा गोष्टींना मान्यता देत नाही.’ असं या दोन्ही समुदायाच्या नागरिकांनी एकत्रितपणे काढलेल्या पत्रकात म्हणलं आहे.

आधी हिंसा आणि आता शांततेचं आवाहन या सगळ्या गोष्टी इंग्लंडमध्ये महिनाभराच्या आत घडत आहेत. या प्रकरणाची चर्चा इंग्लंडच्याच नाही, तर जागतिक मीडियामध्ये होत आहे. त्यामुळं नेमकं प्रकरण काय आहे ? या महिन्याभरात काय काय घडलंय ? हे जाणून घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.

भारत पाकिस्तान मॅचच्या दरम्यान एका तरुणाला मारहाण करण्यात आली आणि याचा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हे मारहाणीचं प्रकरण शांत झालं, मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या स्थानिक व्हॉट्सऍप ग्रुप्सवर फिरत राहिला.

त्यात मॅचमध्ये पाकिस्तान हरल्यानंतर काही भागांमध्ये पाकिस्तान विरोधी नारे देण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आणि या घटनेचाही व्हिडीओ सोशल मीडियामुळं वेगानं लोकांपर्यंत पोहोचला.

लेसिस्टरच्या पोलिस प्रवक्त्यांनी ब्रिटिश माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ‘काही हिंदू तरुण एका मुस्लिम तरुणाला मारहाण करत असल्याचा दावा करत हा व्हिडीओ व्हायरल झाला होता, पण प्रत्यक्षात ही मारहाण एका शीख तरुणाला होत होती आणि तो सुद्धा मारहाण करणाऱ्यांच्याच टीमचा चाहता होता. चुकीच्या माहितीसकट हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि शहरातलं वातावरण तापलं.’

हा मॅचच्या दिवशीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्या प्रकरणाला धार्मिक रंग मिळाला.

लेसिस्टरमध्ये अनेक ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समुदायाची लोकं एकत्र आली. त्यांनी घोषणाबाजी करत मोर्चे काढले. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेपही करावा लागला. मात्र पुन्हा एकदा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि वातावरण शांत होण्याऐवजी पुन्हा एकदा तापलं.

या व्हिडीओमध्ये काही चेहरा झाकलेले तरुण हिंदूबहुल भागात तोडफोड करताना आढळले. एका तरुणानं घरावरचा भगवा झेंडाही काढून फेकला, एक तोडफोड करणारा तरुण हातात चाकू घेऊन फिरत होता आणि हिंदूविरोधी घोषणाही देण्यात आल्या. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. आता रस्त्यावरचं वातावरण तापलंच, पण सोशल मीडियावरही कहर झाला. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही बाजूंनी सोशल मीडियावर परस्परविरोधी पोस्ट लिहिल्या गेल्या. या पोस्टमुळं आधीच पसरलेल्या द्वेषात वाढ झाली.

मग दिवस आला १७ सप्टेंबरचा…

लेसिस्टरच्या पूर्व भागात दोनशेपेक्षा जास्त नागरिक जमले होते. यात हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही समुदायातल्या लोकांचा समावेश होता. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

बघता बघता या जमावानं हिंसक रुप धारण केलं, हातातल्या काचेच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या, गाड्यांची तोडफोड करण्यात आली आणि अक्षरश: राडा सुरु झाला. याचवेळी एका तरुणानं जवळच्या मंदिरावर चढून झेंडा फाडला, दोन्ही गटांमधली मारामारी इतकी वाढत गेली की, पोलिसांना जादा कुमक मागवावी लागली.

ब्रिटनची राणी एलिझाबेथ हिच्या अंत्यसंस्कारासाठीच्या बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसांनाही पुन्हा बोलावून घेण्यात आलं, आजूबाजूच्या शहरांमधूनही लेसिस्टरमध्ये पोलिस दाखल झाले. पोलिसांनी एकूण ४७ लोकांना अटक केली.

अमोस नोरोन्हा नावाच्या एका व्यक्तीला शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली दहा महिन्यांची शिक्षाही सुनावण्यात आली.

या १७ सप्टेंबरला झालेल्या राड्यामुळं लेसिस्टरचं वातावरण आणखीनच चिघळलं, आता २० सप्टेंबरला दोन्ही समुदायातल्या नेत्यांनी एकत्र येत केलेल्या शांततेच्या आवाहनामुळं तरी हा तणाव निवळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लंडनमधल्या हाय कमिशन ऑफ इंडियानंही या प्रकरणाचा निषेध केला आहे.

‘भारतीय समुदायासोबत झालेली हिंसा, हिंदू प्रतिकांची आणि त्यांच्या आवारात झालेली तोडफोड यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही हे प्रकरण तातडीनं युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेलं असून, जे या हल्ल्यात सहभागी आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोबतच ज्यांना या हिंसेचा फटका बसला आहे, त्यांना संरक्षण पुरवण्यात येईल अशीही आशा आम्हाला आहे.’ असं हाय कमिशन ऑफ इंडियानं काढलेल्या पत्रकात म्हणलेलं आहे.

तर लेसिस्टरमधल्या फेडरेशन ऑफ मुस्लिम ऑर्गनायझेशनचे प्रमुख सुलेमान नगादी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “याआधी कधीच या दोन समुदायांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं नव्हतं. काही असंतुष्ट तरुणांनी हा प्रकार घडवून आणला आहे. पालकांनी आपल्या तरुण मुलांशी बोलत लवकरात लवकर हे प्रकरण शांत करावं, असं आवाहन आम्ही करतो.”

लेसिस्टरच्या पोलिसांनी सध्या ४७ जणांना ताब्यात घेतलं असलं, तरी या सगळ्या घटनांमागे नेमकं कोण आहे ? याचा शोध घेण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल, असं लेसिस्टर पोलिसांनी नमूद केलं आहे. त्यामुळं नेमकं काय घडलं ? हे जरी समजलं असलं, तरी कुणामुळं घडलं ? हे समजायला काही महिने जाणार आहेत.

या काळात लेसिस्टरमध्ये शांतता ठेवण्याचं आव्हान दोन्ही समुदाय आणि पोलिसांना पेलावं लागणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.