#metoo म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

भारतात सध्या #metoo आंदोलनाने जोर पकडलाय. या आंदोलनाच्या माध्यमातून दररोजच लैंगिक शोषण झालेल्या विविध क्षेत्रातील महिला आपलं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींची नावे उघड करताहेत. या आंदोलनामुळे वेगवेळ्या क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठितांची नावे धक्कादायकरित्या समोर येताहेत.

साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपाने सुरुवात झालेल्या या आंदोलनामुळे आतापर्यंत अनेकांची नावे समोर आलीयेत ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झालेत. ही यादी थांबता थांबायला तयार नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात अजून कुणाकुणाची नावे यात येतील, हे ही सांगता येत नाही.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात की जगात सर्वात आधी हे आंदोलन कुणी आणि कधीपासून सुरु केलं..?

आंदोलन सुरु करण्यामागे नेमकी काय कल्पना होती..?

आंदोलन कुणी सुरु केलं..?

MeToo  आंदोलन सर्वात प्रथम २००६ साली अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील तराना बुरके या आफ्रिकन-अमेरिकन मानवाधिकार कार्यकर्तीने सुरु केलं.

४५ वर्षीय तराना बुरके या ब्रुकलीन येथील लैंगिक समानतेसंबंधी काम करणाऱ्या संस्थेच्या वरिष्ठ संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या MeToo आंदोलन आणि महिलांच्या संबंधातील इतरही कामांचा ‘टाईम’ या जगप्रसिद्ध मासिकाने २०१७ साली ‘टाईम पर्सन ऑफ द इअर’ म्हणून निवड करत गौरव केला आहे.

आंदोलनाची सुरुवात नेमकी कशी झाली..?

२००३ तरुण मुलीसंबंधी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेत असताना एका मुलीने बुरके यांना आपल्या आईचा बॉयफ्रेंड आपला लैंगिक छळ करत असल्याचं सांगितलं. यावर काय बोलायचं हेच न कळलेल्या बुरके यांनी त्यावर फक्त Me Too असं उत्तर दिलं.

त्यानंतर बुरके यांनी लैंगिक शोषणाचा सामना कराव्या लागणाऱ्या महिलांना धैर्य देण्यासाठी त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात केली. “हे फक्त तुमच्या एकटीसोबतच घडलेलं नाही, मला सुद्धा  (me too) अशा प्रकारांचा सामोरे जावं लागलंय” अशा आशयाचा मेसेज त्यांनी या सगळ्या शोषित महिलांना द्यायला सुरु केला आणि इथेच MeToo आंदोलनाचा जन्म झाला.

२००६ साली सुरु करण्यात आलेलं बुरके यांचं हे आंदोलन जगभरात मोठ्या प्रमाणात पसरलं ते २०१७ साली. हे आंदोलन जगभरात पसरायला मदत झाली ती प्रख्यात हॉलीवूड अभिनेत्री अॅलिसा मिलानो हिने ऑक्टोबर २०१७ साली केलेल्या ट्वीटमुळे. मिलानोच्या ट्वीटमुळे हे आंदोलन जगभरात पसरलं.

आंदोलन का सुरु करण्यात आलंय..?

जगभरातील  लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांना  मदत करणं, अशा प्रकारच्या घटनांचा सामना करायला लागलेल्या महिलांना याविरोधात लढण्यासाठी त्या एकट्या नाहीत हा आत्मविश्वास देणं, लैंगिक शोषण करणाऱ्यांचा खरा चेहरा समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने हे आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.

अनेक महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी आणि इतरत्रही आपल्या वरिष्ठांकडून लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. परंतु समाजातील बदनामीच्या भीतीने या प्रकारची वाच्यता त्या कुठेही करत नाहीत. एकतर महिला अशा प्रकारांना बळी पडतात किंवा मग शांत राहून सगळं काही सहन करत राहतात. अशा वेळी आपल्या अधिकारांचा वापर करून महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्यांना मात्र मोकळं मैदान मिळत.

हे सगळं थांबविण्यासाठी आपण जे भोगलंय ते दुसऱ्या कुठल्या महिलेला भोगायला लागू नये, यासाठी लैंगिक शोषण करणाऱ्यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची गरज ओळखून MeToo आंदोलन सुरु करण्यात आलं.

महिलांचं हे आंदोलन पुरुषविरोधी आहे का…?

लैंगिक अत्याचारांच्या किंवा शोषणाच्या घटनांचे प्रमाण महिलांविरोधात अधिक आहे. त्यामुळे महिलांचं हे आंदोलन पुरुषांविरोधी आहे, असा एक विचार समोर येतोय. पण या गोष्टीत फारसं तथ्य नाही. लैंगिक शोषण आणि अत्याचाराचा सामना करावा लागलेले पुरुष देखील या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला जे काही सहन करावं लागलं त्याविरोधात आवाज उठवू शकतात.

भारतातल्याच सध्या उघडकीस येऊ लागलेल्या MeToo आंदोलनातील एका प्रकरणावर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल की हे काही फक्त महिलांचं पुरुषविरोधी आंदोलन नाही. १० ऑक्टोबर रोजी कॉमेडीअन कनिझ हिने आपली सहकारी कॉमेडीअन अदिती मित्तल हिच्यावर २ वर्षांपूर्वी तिने आपल्याला जबरदस्ती किस केल्याचा आरोप केलाय. एखाद्या महिलेने दुसऱ्या महिलेविरोधात अशा प्रकारे लैंगिक शोषणाचा आरोप करण्याची या आंदोलनातील भारतातील ही पहिलीच घटना होती.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.