योगी आदित्यनाथ मुंबईत आले, अक्षय कुमारला भेटले, युपीतल्या फिल्मसिटीचा नेमका प्लॅन काय…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यावर त्यांचा रोड शो होणार आहे, उद्योगपतींशी भेटीगाठी होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमधल्या दिग्गजांशी मिटींग्सही. नुकतीच अभिनेता अक्षय कुमारनंही योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि एक मुद्दा अधोरेखित झाला तो म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या नियोजित फिल्मसिटीचा.

अक्षय कुमार आदित्यनाथ यांना भेटल्यानंतर म्हणाला की, ‘उत्तर प्रदेशमध्ये तयार होत असलेल्या नव्या फिल्मसिटीच्या उदघाटनासाठी आम्ही सगळेच आतुर आहोत. या फिल्मसिटीमुळं एक नवा पर्याय उभा राहील.’

तर योगी आदित्यनाथ यांनीही माध्यमांशी बोलताना फिल्मसिटीच्या कामाबद्दल आणि नियोजनाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ‘मला माझ्या राज्यात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभी करायची आहे. मुंबईची फिल्मसिटी ५०० एकरमध्ये आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ १२०० एकर जागेत फिल्मसिटी उभी करण्यात येणार आहे. जगातल्या सगळ्यात उत्तम सुविधा या फिल्मसिटीमध्ये असतील आणि जागतिक दर्जाच्या फिल्म कंपन्याही तिथे असतील.’

‘मी मुंबईतली फिल्मसिटी पळवायला नाही, तर माझ्या राज्यात नवी फिल्मसिटी बनवायला आलो आहे,’ असं वक्तव्यही त्यांनी केलं.

पण उत्तरप्रदेश मधल्या फिल्मसिटीची घोषणाही नवी नाही आणि आदित्यनाथ यांचा प्लॅनही. उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यात येईल याची घोषणा त्यांनी सगळ्यात आधी सप्टेंबर २०२० मध्ये केली होती. मात्र २ वर्षांनंतरही त्याचं काम वेगवान पातळीवर सुरु झालेलं नाही.

उत्तर प्रदेशमधली फिल्मसिटी हा योगी आदित्यनाथ यांचा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो. योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या कार्यकाळातच फिल्म सिटी उभी करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. यासाठी गौतम बुद्ध नगर येथील ‘यमुना प्राधिकरण सेक्टर २१’ ही जागा निवडण्यात आली आणि  १ हजार एकरमध्ये ही फिल्म सिटी उभारण्यात येईल अशीही घोषणा झाली होती. 

जानेवारी २०२२ मध्ये या फिल्म सिटीचे कामकाज सुरु होईल सुद्धा सांगण्यात आले होते. या प्रोजेक्टच्या पहिल्या फेजसाठी १७ हजार कोटी इतका खर्च येणार होता. यातून १५ हजार लोकांना रोजगार मिळणार होता. ऑगस्ट २०२१ मध्ये सीबीआरई साउथ एशिया या कंपनीनं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट राज्य सरकारकडे दिला होता.

या कंपनीने जगभरातील फिल्म सिटींना भेट दिली होती. तसेच मोठ्या निर्मात्यांना फिल्म सिटीत काय हवे याची विचारणा सुद्धा केली होती. यानंतर सगळ्या नंतर सीबीआरई कंपनीने पुढच्या तीन आठवड्यात ग्लोबल टेंडर काढण्यात येईल अशी घोषणा केली होती.

यामुळे भारतातील आणि जगभरातील कंपन्यांना टेंडर भरता येणार होते. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत फिल्म सिटीसाठी कंपनी फायनल होऊन आणि कामाला सुरुवात होणार होती.

ही फिल्म सिटी ३ फेज मध्ये बांधण्यात येणार होती. यासाठी ९० टक्के जागा ताब्यात घेण्यात आली होती. त्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये ग्लोबर टेंडर काढण्यात आले होते. हे टेंडर ३० जून २०२२ पर्यंत भरता येणार होते.

दिवंगत कलाकार राजू श्रीवास्तव हे त्यावेळी उत्तरप्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष होते. डिसेंबर २०२० मध्ये राजू श्रीवास्तव म्हणाले होते की, ‘उत्तरप्रदेश मध्ये उभ्या करण्यात येणाऱ्या फिल्म सिटीमुळे मुंबईचे कुठलेही नुकसान होणार नाही. हैद्रराबाद येथील रामोजी फिल्मसिटीपेक्षा चांगली फिल्म सिटी उत्तर प्रदेशमध्ये तयार करण्याचा आमचा हेतू आहे.’

या संदर्भात एप्रिल २०२२ मध्ये राजू श्रीवास्तव यांना विचारण्यात आलं होतं की, उत्तरप्रदेशमध्ये तयार होणाऱ्या फिल्म सिटीचे काम कुठपर्यंत आले आहे ?

त्यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले होते की, ‘फिल्म सिटीसाठी जोरात काम सुरु आहे. उत्तरप्रदेश सरकारने बेसिक गोष्टी पूर्ण केल्या आहेत. फिल्मसिटी जवळ विमानतळ उभारणीचं काम सुद्धा सुरु आहे. मुंबईच्या फिल्म सिटी पेक्षा ही सिटी मोठी असणार आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून काम करण्यात येत आहे.’

४ जुलै २०२२ रोजी फिल्म सिटीचे टेंडर उघडण्यात आले. 

यात फक्त एका कंपनीने टेंडर भरलं होतं. त्या कंपनीचे नाव होते अंकित कन्स्ट्रक्शन. जरी अंकित कन्स्ट्रक्शन कंपनीने टेंडर भरलं तरीही त्यांनी टेंडर फी आणि प्रोसेसिंग फी जमा केली नव्हती. यामुळे पहिल्या टेंडरची प्रक्रिया बंद करण्यात आली.

यामुळे कन्सल्टंट कंपनीवर ताशोरे ओढण्यात आले होते. यासाठी कंपनीला ७० लाख रुपये सुद्धा देण्यात आले होते. मात्र कंपनीने काम चांगल्या प्रकारे केलं नसल्याने आता दुसरी कंपनी नेमण्यात येईल असेही सांगण्यात आले होते.

या सगळ्या प्रोजेक्टवर राज्य सरकार लक्ष ठेऊन होते. यामुळे पुन्हा एकदा निविदा काढण्यात येईल अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. 

यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २३ जुलै २०२२ ला एक उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन परत एकदा फिल्म सिटीसाठी ग्लोबल टेंडर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी टेंडरमधील काही अटी शर्थी कमी करण्याच्या सूचना दिल्या.

फिल्म सिटीचे काम करणाऱ्या कंपनीला वेळ वाढवून देण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आले. 

मोठा गाजा वाजा करत मुंबईतील फिल्म सिटी पेक्षा मोठी फिल्म सिटी उभी करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र दोन वर्षांनंतरही साधी टेंडर प्रक्रिया ही सरकार राबवू शकलेलं  नाही. आता योगी आदित्यनाथ यांनी प्रत्यक्ष मुंबईत येऊन घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात काम कधी पूर्ण होणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.