ट्रुथ ऑफ गुजरात पासून ते आताच्या पेगाससपर्यंत हेरगिरी करणाऱ्यांनी मोठी मजल मारली आहे. 

आज भारताच्या राजकारणात जिकडं तिकडं स्नूपिंग घोटाळ्यांमधलं पेगासस नावाचं वादळ घोंगावतय. त्याच वादळामुळं का काय एका मोठ्या माध्यम समूहावर म्हणजेच दैनिक भास्करवर आय टी रेड मारण्यात आलीय, असं खासगीत म्हंटल जातंय.

पण स्नूपिंग घोटाळे हे काही आत्ताच होतायत असं नाही.

तर पार इंदिरा गांधीच्या काळापासुन ही प्रकरण घडली आहेत. मग त्या घोटाळ्यांमध्ये सरकार पडली, काही ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिले, कुठं सीबीआयच्या चौकशीचे आदेश देण्यात आले तर कुठं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेली.

ही गोष्ट आहे १९८८ सालची. जनता पार्टीचे रामकृष्ण  हेगडे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

ते १९८३ आणि १९८५ च्या दोन्ही निवडणुकांत जिंकले होते. त्यावेळी त्यांना बिगर काँग्रेसी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून बघितलं जात होत. तेव्हा कर्नाटकात फोन टॅपिंगचा मोठा स्फोट झाला. केंद्रात असणाऱ्या राजीव गांधींचा जीव आधीच बोफर्स प्रकरणामुळे मेटाकुटीला आला होता, त्यात हे टॅपिंग प्रकरण काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात कोलीत म्हणून सापडलं.

केंद्राने या प्रकरणाची चौकशी लावली. यात कर्नाटक पोलीस दलातल्या डीआईजीने कमीतकमी ५० नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या फोन टॅपिंगच्या ऑर्डर्स दिल्या होत्या. यात हेगडेंचे विरोधक ही होते. या प्रश्नांवरुन हेडगेंच्या नावावर वादळ उठलं. ते आपली बाजू मांडतील इतक्यात सुब्रम्हण्यम स्वामींनी प्रेसमध्ये एक लेटरबॉम्ब टाकला. हेडगेंच्या डीआयजी बरोबर झालेल्या संभाषणाचं ते पत्र सर्व माध्यमांनी छापलं आणि यावरून हेडगेंना राजीनामा द्यावा लागला.

नीरा राडिया टेप कांड  : पॉलिटिकल लॉबिंग आणि कॉरपोरेट लॉबिंगचे आरोप 

२००९ -१० दरम्यान नीरा राडिया टेप कांड खास चर्चेत आलं होत. २००८ ते २००९ च्या दरम्यान आयकर विभागाने नीरा राडिया आणि काही वरिष्ठ पत्रकार, राजकीय नेते पुढारी, आणि कॉर्पोरेट अधिकाऱ्यांची संभाषण रेकॉर्ड केली होती. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार समोर आला होता.

सोबतच कंपन्यांना टेंडर मिळवून देण्याच्या बदल्यात वसुली करण्याच्या बातम्या आल्या. या टेप मध्ये टाटा या ब्रॅन्डचं नाव सुद्धा आलं होत. यात नीरा राडिया नामक महिलेवर पॉलिटिकल लॉबिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. या बाईचे जवळजवळ ३०० च्यावर कॉल टॅप केले होते.  यात तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा यांच नाव आलं होत. आणि त्यानंतरच टू जी स्पेक्ट्रम घोटाळा समोर आला होता.

अंतागढ टेप कांड : 

छत्तीसगढच्या राजकारणात अंतागढचं फोन टॅपिंग प्रकरण चांगलाच गाजलं होत. हे प्रकरण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर बाहेर आलं. भाजपने अंतागढ चे आमदार विक्रम उसेंडी यांना कांकेर मधून लोकसभेच तिकीट दिलं आणि उसेंडी निवडून आले. यानंतर अंतागढची सीट रिकामी झाली.

काँग्रेसने रिकाम्या झालेल्या या ठिकाणावर मंतूराम पवार यांना तिकीट दिल. तर भाजपने भोजराम नाग यांना. आता यात काँग्रेसचे उमेदवार मंतूराम पवार यांनी शेवटच्या दिवसात आपली उमेदवारी मागे घेतली आणि सीट भाजपच्या खात्यात गेली.

थोड्या दिवसांनंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यात मंतूराम पवार यांनी आपला उमेदीवरी अर्ज मागे घेण्यासाठी जवळजवळ ७ कोटी घेतल्याची बातमी समोर आली. या टेप मध्ये मुख्यमंत्री अजित जोगी, तत्कालीन मुख्यमंत्री रमन सिंह यांचे जावई डॉ. पुनीत गुप्ता यांचा आवाज असल्याचा दावा करण्यात आला. सध्या हा विषय कोर्टात आहे.

बीएस येदियुरप्पा यांच्यावर आरोप

२०१९ मध्ये कर्नाटक कांग्रेसने एक ऑडियो व्हायरल केली होती. यात भाजपने कर्नाटकात गैरमार्गाने पैसे आणून कर्नाटकातलं सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यावेळी घेतलेल्या प्रेस मध्ये काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी बीएस येदियुरप्पा यांच्यावर आरोप केले होते. ज्यात काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना करोडो रुपये देऊन भुलवल्याचा आरोप केला होता.

मनमोहन सिंगांनी डाव्यांचे फोन टॅप केले?

२००८ साली अमेरिका भारताबरोबर अणू तंत्रज्ञान हस्तांतरण व इतर गोष्टींचा करार करण्यास उत्सुक झाली होती. जेव्हा लोकसभेत हा करार चर्चेला आला तेव्हा डाव्या पक्षांनी याचा निषेध करत ९ जुलै रोजी मनमोहन सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. सरकार अल्पमतात आलं. मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. अंतरराष्ट्रीय पातळीवर बोलणी झाली होती.

कारगिल युद्धानंतर सर्व प्रकारची तांत्रिक गुप्त माहिती मिळवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आणि  नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेकडून (एनटीआरओ) काही विरोधकांचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. यात डावे नेते प्रकाश करात, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा समावेश होता.

संसदेमध्ये अविश्वास ठरावावर करात, डावे पक्ष आणि एकूण विरोधी पक्षतील खासदारांची भुमिका काय असणार आहे, त्यांची रणणिती काय राहिलं हे सगळं जाणून घेण्यासाठी सरकारनं जुलै २००८ मध्ये करात यांचा फोन टॅप केला असल्याचा दावा आऊटलूक मधून करण्यात आला होता.

आता या किश्श्यानंतर येतो २०१३ चा मोदींचा फोन टॅपिंग किस्सा, त्यामुळेच आज गंडांतर आलंय एका माध्यम समूहावर..

२०१३ च्या दरम्यान जेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात गुजरात च्या मोदी सरकार द्वारा एका ३५ वर्षीय आर्किटेक्ट युवतीसहित तिच्या घरच्यांचा फोन टॅप करण्यात आला होता.  त्या ऑडिओ क्लिप मध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री  शहा आणि नरेंद्र मोदींच संभाषण आहे. हि क्लिप ट्रुथ ऑफ गुजरातच्या नावे व्हायरल झाली होती.

१८ ते २३ ऑगस्ट २००९च्या दरम्यान गुजरात चे तत्कालीन गृहराज्य मंत्री अमित शाह यांच्या आदेशावरुन पोलीस अधिकारी जी एल सिंघल आणि आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी त्या मुलीचे फोन कॉल्स टॅप केले होते. यात गुलेल आणि कोबरापोस्ट या वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार,

किसी साहेब के कहने पर अमित शाह ने पुलिस अधिकारियों के जरिए एक बेकसूर युवती की अवैध तौर पर जासूसी करवाई थी।

त्यानंतर काँग्रेसने ‘साहेब’ हे दुसरे तिसरे कोणी नसून मोदीच असल्याचे आरोप केले होते.

अशाप्रकारे ट्रुथ ऑफ गुजरात पासून ते आताच्या पेगाससपर्यंत हेरगिरी करणाऱ्यांनी मोठी मजल मारली आहे. 

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.