या वैज्ञानिक प्रयोगामुळे लोकांच अजून ठाम मत आहे, आत्म्याचं वजन 21 ग्रॅम असतं..

” ये ढाई किलो का हाथ जब किसिपे पड़ता है ना.. तो आदमी उठता नहीं, उठ जाता है”

हा डायलॉग जेव्हा सनी देओलच्या तोंडून ऐकला तेव्हा प्रश्न पडला होता, या गडीने खरंच त्याच्या हाताचं वजन केलं असेल का? केलं असेल तर कसं? पण पुढच्याच क्षणी डोक्यात चमकलं की, भई आपल्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान आहे. शरीराचं वजन जसं करता येतं तसं त्याच्या वेगवेगळ्या अवयवांचं सुद्धा स्वतंत्रपणे वजन करता येत असेलच.

विषयात जास्त डिप मुद्दामच गेलो नाही कारण मला माझ्या हाताचं वजन करत कुणाला डायलॉग मारण्यात काही इंटरेस्ट नव्हता आणि महत्वाचं म्हणजे चित्रपट बघायचा होता.

पण चित्रपट संपल्यानंतर जेव्हा झोपायला म्हणून अंथरुणावर पडलो तेव्हा सोशल मीडियावर सहज स्क्रोल करताना एक पोस्ट बघितली आणि ती बघून डोक्याचे खटके उडाले. पोस्ट होती…

‘मानवाच्या आत्म्याचं वजन २१ ग्राम असतं’

आता हे काय नवीन! असं वाटलं आणि परत प्रश्न पडला… हे खरं असेल का?

म्हणून सहज गुगलवर ‘वेट ऑफ सोल’ सर्च केलं. पहिलाच रिजल्ट ‘२१ ग्राम’. आजवर आत्मा असतो असं ऐकलं होतं. माणूस जिवंत असतो कारण त्याच्यामध्ये आत्मा असतो आणि ज्याक्षणी माणूस मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडून जातो, हे ऐकलं होतं.

इतकंच काय आत्मा या संज्ञेपासून तयार झालेले अनेक ‘हॉरर कॅटेगिरी’ मधले चित्रपट सुद्धा बघितले होते. यात चांगल्या आत्मा – वाईट आत्मा असं पण ऐकायला मिळालं होतं. पण या आत्म्याचं वजन असतं हे अगदीच डोकं चोळायला लावणारं होतं. त्यात या फॅक्टला सायन्स बेस आहे, असं जेव्हा सर्चमधून समजलं तेव्हा अजूनच भुवया वाकड्या झाल्या.

त्या हाताच्या वजनात मला काही इंटरेस्ट आला नाही पण आत्म्याच्या वजनात लई इंटरेस्ट आला. झोप तर साहजिकच उडाली होती म्हणून नक्की काय मॅटर आहे? हे जाणून घ्यायला सुरुवात केली. जे घावलं ते मांडतोय..

सगळ्यात पहिले हा फॅक्ट मांडण्यात आला होता १९०७ मध्ये.

१९०७ मध्ये ‘जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी फॉर सायकिक रिसर्च’मध्ये एक शोध छापण्यात आला होता.  या शोधाचं नाव होतं – हापोथेसिस कन्सर्निंग सोल सबस्टन्स टुगेदर विथ एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स ऑफ द एक्सिस्टन्स ऑफ सच सबस्टन्स (Hypothesis Concerning Soul Substance Together with Experimental Evidence of The Existence of Such Substance)

या शोधात माणूस मेल्यानंतर त्याच्या आत्म्यावर करण्यात आलेल्या प्रयोगाबद्दल लिहिलं होतं. हा प्रयोग डंकन मॅकडॉगल नावाच्या एका अमेरिकन डॉक्टरने केलेला होता. असा प्रयोग करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात ते ज्याठिकाणी काम करत होते तिथल्या परिस्थितीवरून आलेला होता.

१८६६ मध्ये स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये डॉ. डंकन मॅकडॉगल यांचा जन्म झालेला. त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं होतं. हॅवरहील शहराच्या एका चॅरिटी हॉस्पिटलमध्ये लोकांचा उपचार ते करत होते. या रुग्णालयाच्या मालकाचा बराचसा व्यापार चीनसोबत होत होता. त्यातूनच त्यांनी चीनमधून अनेक वस्तू आयात केल्या होत्या आणि त्या रुग्णालयात ठेवल्या होत्या.

या वस्तूंमध्ये एक खास तराजू होता जो चीनमध्ये १८३० मध्ये बनवण्यात आला होता. या तराजूची खासियत म्हणजे कितीही मोठ्या वस्तू असल्या तरी त्यांचं वजन अगदी बरोबर यावर मोजल्या जायचं.

ज्या रुग्णालयात डॉ. डंकन काम करत होते तिथे एकाबाजूला ते खूप लोकांना मरताना बघत होते तर दुसरीकडे या तराजूला बघत होते. त्यातूनच त्यांच्या डोक्यात माणसाच्या आत्म्याचं वजन करण्याची आयडिया आली, त्यानुसार त्यांनी शोधाला सुरुवात केली…

सहाजिकच हा विषय डोक्यात आला म्हणजे ते आत्म्याचं अस्तित्व मानणारे होते. त्यांनी त्यांच्या शोधाची सुरुवातच या फॅक्टला गृहीत धरून केली होती की माणूस मेल्यावर त्याच्या शरीरातून आत्मा निघून जाते. याच गोष्टीला त्यांच्या शोधातून वैज्ञानिकदृष्ट्या मान्यता मिळवून देणं हा त्यांचा उद्देश्य होता, असं सांगितलं जातं.

या प्रयोगासाठी त्यांनी आपल्या सोबत अजून चार डॉक्टरांना घेतलं होतं. आत्म्याचं वजन करणं हा प्रयोग होता म्हणून त्यांनी एक तराजू सारखा सेटअप तयार केला. त्यांनी एक खूपच लाइटवेट बेड बनवला होता आणि त्याला त्यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या त्या चिनी तराजूवर फिट केलं होतं. याची अशी फिटिंग करण्यात आली होती की, २८ ग्राम पेक्षा कमी वजनाची वस्तूसुद्धा बरोबर मोजली जाईल. 

एक्सपेरिमेंटचा मुख्य घटक – आजारी लोक जे मरणाला टेकले आहेत.

त्यांच्या हॉस्पिटलमधील काही लोक ज्यांना खूप गंभीर आजार झालेला होता आणि काही क्षणात ते मारणार होते अशांना डॉ. डंकन त्या तराजूच्या बेडवर झोपवत होते आणि त्यांच्या मरण्याच्या प्रक्रियेचं खूप बारकाईने निरीक्षण केलं जात होतं. शरीरातील प्रत्येक बदल डॉ. डंकन आणि त्यांचे साथीदार स्वतंत्रपणे नोंदवून घेत होते.

त्यासाठी त्यांनी आधी त्या व्यक्तीच्या शरीराचं वजन केलेलं असायचं ज्यामध्ये व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या शरीरात पाणी, रक्त, घाम, मलमूत्र आणि ऑक्सिजन-नायट्रोजनच्या स्तरात बदल होऊन त्याचं वजन किती घटेल? हे देखील त्यांनी नोंदवून ठेवलं होतं. त्याव्यतिरिक्त जे वजन कमी होईल ते आत्म्याचं वजन राहील असा त्यांचा निष्कर्ष असणार होता.

या प्रयोगातून डॉ. डंकन यांनी असा दावा केला होता की, ज्या क्षणी माणूस शेवटचा श्वास घेतो आणि माणसाच्या शरीरातून आत्मा निघून जातो त्याक्षणी तराजूचा आकडा वेगाने खाली येतो. असं वाटतं की झटक्याने काहीतरी शरीरातून बाहेर पडलंय.

त्यांनी जवळपास सहा माणसांवर सहा वर्ष हा प्रयोग केला होता आणि मग त्याचे निष्कर्ष मांडण्यात आले होते. मात्र डॉ. डंकन यांचा हा प्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या मान्य करण्यात आला नाही. 

डॉ. डंकन यांचा प्रयोग अयशस्वी होण्याची काही कारणं होती. यातील पाहिलं कारण म्हणजे.. 

या प्रयोगात त्यांच्या सोबत असणाऱ्या दोन डॉक्टरांच्या निष्कर्षांना समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. एका डॉक्टरचं म्हणणं होतं की त्यांच्या तराजूची स्केल नीट फिट करण्यात आली नव्हती आणि सोबतच त्यांच्या या प्रयोगाला बाहेरचे लोक खूप विरोध करत होते.

तर दुसऱ्या डॉक्टरचं म्हणणं होतं की, हे प्रयोग योग्य प्रकारे करण्यात आले नव्हते. दोन रुग्णांना तराजूवर झोपवण्यात आलं त्याच्या ५ मिनिटांतच ते मेले होते. त्यामुळे तराजू नीट सेट करायला त्यांना वेळच मिळाला नाही. 

म्हणजे निष्कर्ष फक्त ४ लोकांवरील प्रयोगावर अवलंबून होते.

त्यातही ३ लोकांसोबत असा किस्सा झाला की मेल्यानंतर त्यांच्या शरीराचं वजन कमी झालं मात्र परत काही वेळानंतर ते वाढलं. तर उरलेल्या एका व्यक्तीबद्दल असं झालं की, मेल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीराचं वजन कमी झालं, थोड्यावेळाने वाढलं आणि थोड्यावेळाने परत कमी झालं. 

शिवाय एक मुद्दा म्हणजे… डॉ. डंकन यांनी १५ कुत्र्यांवर सुद्धा प्रयोग केला होता. मात्र कुत्रे मेल्यानंतर त्यांच्या शरीराचं वजन बिलकुल कमी झालं नव्हतं. जेव्हा डॉ. डंकन यांनी प्रयोगाचे  निष्कर्ष मांडले तेव्हा त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं ‘कुत्र्यांच्या शरीरात आत्मा नसते म्हणून त्यांचं वजन कमी झालं नाही’. एकीकडे ते मानवात आत्मा असल्याचं सांगत होते आणि कुत्र्यात आत्मा नाकारत होते म्हणून त्यांचं हे स्पष्टीकरण त्यांच्याच ‘सजीवांतील आत्म्याचं अस्तित्व’ याच धरणाच्या विरुद्ध होतं.

त्यांचे निष्कर्ष अजून एका गोष्टीमध्ये कमी पडले ते म्हणजे डॉ. डंकन आणि त्यांची टीम ठोसपणे सांगू शकले नाही की मृत्यूची एक्झॅक्ट वेळ काय होती? आणि सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा…

स्वतः डॉ. डंकन यांना त्यांच्या प्रयोगाच्या निष्कर्षांवर पूर्ण विश्वास नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की त्यांचा हा शोध फक्त सुरुवात आहे यावर अजून काम केलं गेलं पाहिजे, अजून ठोस निष्कर्षांसाठी पुढे शोध कायम राहिला पाहिजे. या सर्वांमुळे वैज्ञानिकांनी त्यांच्या या शोधाला प्रमाणित मानलं नाही. शिवाय त्यांच्या प्रयोगांना सुद्धा अवैध म्हटलं. 

पण डॉ. डंकन यांच्या शोधातील पहिल्या व्यक्तीचे शरीरात झालेले बदल आजपण चर्चेचा विषय आहे आणि त्यावरूनचं आत्म्याचं वजन २१ ग्राम असतं असं गुगलवर सापडतं आणि काही लोकही याला मानतात.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.