सत्तेत नसलेल्या मनसेने दुसऱ्या कोरोना लाटेत काय केलं?

सध्या राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेवर चांगलाच ताण आहे. कुठे बेडची कमतरता, कुठे ऑक्सिजनची चणचण, तर कुठे रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार आपल्या परीनं जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रात सत्तेत असलेला भाजप देखील आपल्या सरकारच्या मदतीनं या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे तीन पक्ष आणि केंद्रातील भाजप यांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात सत्तेत नसलेला पक्ष देखील कोरोना रुग्णांसाठी जशी जमेल तशी मदत करताना दिसत आहे. नुसता सत्तेतूनच बाहेर नाही तर त्या पक्षाचा संपूर्ण राज्यात अवघा १ आमदार आहे. अर्थात आपली चर्चा सुरु आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची.

पण जमेल तशी म्हणजे नक्की कशी? हे जाणून घेणं गरजेचं आहे.

सत्तेत नसलेल्या मनसेने दुसऱ्या कोरोना लाटेत काय केलं?

१. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडून ४० ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था : 

मनसेचे पुणेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी कात्रज भागात साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू केलं आहे. चारच दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः ट्विट करून हि माहिती दिली होती. सोबतच त्यांनी पुण्याच्या इतर १६८ नगरसेवकांना देखील कमीत कमी १० बेडच ऑक्सिजन हॉस्पिटल सुरु करण्याच आवाहन केलं होतं.

२. आमदार राजू पाटील यांनी स्वतःच हॉस्पिटल महापालिकेच्या हवाली केलं – 

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी गतवर्षी देखील आणि या वर्षी देखील आपले खाजगी आर. आर. हे रुग्णालय पालिकेच्या ताब्यात दिले आहे. या रुग्णालयात १५ ते २० व्हेंटिलेटर आणि १०० बेड असून त्याद्वारे रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गतवर्षी डोंबिवलीमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी एक खाजगी रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी चर्चा पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासोबत केली होती, आणि त्यासाठी आपले आर. आर. हे खाजगी रुग्णालय उपलब्ध करून देण्याबाबतही तयारी दाखवली होती.

३. ठाण्यात २४ तास हेल्प लाइन – 

ठाणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांसाठी मनसेकडून २४ तास कोव्हिड नियंत्रण मदत कक्ष स्थापन करण्यात आला. फक्त स्थापनच नाही केला तर या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मागच्या ४ दिवसांच्या काळातच बघायचं झालं तर २३५ रुग्णांना त्यांनी बेड मिळवून दिला आहे, ११० रुग्णांना इंजेक्शन मिळवून दिले आहेत. तर जवळपास ९० रुग्णांना ऍम्ब्युलन्स मिळवून दिली आहे.

https://www.facebook.com/295093600645339/videos/1638744549654279/

 

४. रिक्षावाल्यांची मोफत चाचणी – 

महाराष्ट्र सरकारनं कडक निर्बंध घोषित केल्यानंतर यात अत्यावश्यक वाहतुकीसाठी रिक्षा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेकडून शहरातील सर्वच रिक्षा चालकांची मोफत अँटीजेन कोरोना चाचणी करण्यात आली होती.

May be an image of one or more people, people standing, people sitting and text that says "ठाण्यात कोरोनाचा कहर वाढत असून दुसरीकडे टेस्टिंगचेपण प्रमाण वाढत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने ठाण्यातील सर्वच रिक्षाचालकांची मोफत अँटीजेन टेस्ट च्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या टेस्टिंगला रिक्षाचालकांच्या लांबचा लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले"

५. पुण्यात ३० दिवसांचे प्लाज्मा दान शिबीर :

कोरोना रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरत असलेल्या प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्मा डोनर अत्यंत कमी आहेत. हीच निकड लक्षात घेऊन मनसेचे शहर सचिव राम बोरकर यांनी ३० दिवसांच्या प्लाझ्मा दान शिबिराच आयोजन केलं आहे. ते स्वतः मागच्या जवळपास २८ वर्षांपासून रक्तदान शिबीर घेत आहेत. आता मागच्या वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानासह ते प्लाझ्मा दानाचाही उपक्रम राबवत आहेत.

६. बीड जिल्ह्यातील १०० गरजूंना मोफत किराणा साहित्य :

बीड जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या माध्यमातून नांदूरघाट मधल्या १०० गरजू आणि निराधार कुटुंबांना पक्षाकडून किराणा आणि इतर जीवनावश्यक साहित्याचं वाटप केलं होत.

May be an image of 3 people and people standing

७. राज ठाकरे देखील सातत्यानं विविध गोष्टींकडे सरकारच लक्ष वेधतात :

पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील स्वतः वेळोवेळी सरकारचं विविध गोष्टींकडे लक्ष वेधत असतात. अलीकडच्याच काळातील काही उदाहरण बघायची झाली तर,

मागच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी दहावी आणि बारावीच्या मुलांच्या परीक्षांच्या संदर्भांतून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. आणि या मुलांच्या जीवाला धोका निर्माण न करता त्यांच्या मनस्थितीचा विचार करून या विद्यार्थ्याना प्रमोट करण्याची मागणी केली होती. सरकारने यावर विचार करून प्रमोट नाही पण या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मागच्या आठवड्यात म्हणजे १३ एप्रिल २०२१ रोजी राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून काही मागण्या केल्या होत्या. 

  • यात लसींची संख्या वाढवण्यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना लस निर्मितीची परवानगी द्यावी
  • सर्व वयोगटातील नागरिकांचं लसीकरण
  • राज्यांना थेट लास खरेदी करण्याची परवानगी

अशा मागण्या केल्या होत्या. यातील जवळपास सगळ्या मागण्या केंद्राकडून मान्य झाल्या आहेत. ४ दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून हाफकिनला लास निर्मितीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच कालच्या निर्णयानुसार १ मे पासून १८ वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. आणि राज्यांना देखील लस खरेदी करण्याला परवानगी देण्यात आली आहे.

हे हि वाच भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.