एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्या व्यक्तीच्या पॅन, आधार कार्डचं काय करायचं माहितीये का?

माणूस गेला… म्हणजे, पृथ्वीलोकातून परलोकात गेला… म्हणजे अगदी सरळ सरळ शब्दात सांगायचं तर मेला की त्याचं काय होत असेल? त्याचा आत्मा जीवंत राहत असेल का? फक्त शरिराचा विनाश होतो का? माणसाचा आत्मा पुन्हा जन्माला येत असेल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आता यातलं आत्मा, पुन्हा होणारा जन्म वगैरे आपण कधी बघितलेलंही नसतं.

पण आपण ज्या गोष्टी बघितल्यात किंबहुना ज्या गोष्टी आपली ओळख आहेत अशा गोष्टी म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टींचं माणूस मेल्यावर काय होतं हा विचार कधी केलाय का?

आता तुम्ही म्हणाल काय होतं म्हणजे काय? ते कार्ड जिथे ठेवलेलं असतं तिथून कुणी काढलं नाही तर वर्षानुवर्षे तसंच पडून राहतं, काही काळाने मग ते कार्ड खराब होतं… असं झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही ओ, पण मेल्याल्या व्यक्तीचं पॅन कार्ड, आधार कार्ड हे जर चुकीच्या व्यक्तिच्या हाती लागलं तर, त्या डॉक्युमेंट्सचा गैरवापर होऊ शकतो.

गैरवापर कशाप्रकारे होऊ शकतो? तर, आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही डॉक्युमेंट्स आताच्या घडीला सगळ्यात महत्वाच्या डॉक्युमेंट्स पैकी एक आहेत. अगदी बँक अकाऊंट उघडण्यापासून ते पासपोर्ट मिळवण्यापर्यंत प्रत्येकच गोष्टीसाठी ही दोन डॉक्युमेंट्स लागतात. पॅन कार्डसोबत आपली सगळी बँक अकाउंट्स लिंक असतात. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असतं.

त्यामुळे, आधार आणि पॅन कार्ड वरून आपल्याबद्दलची माहिती एखादा व्यक्ती मिळवू शकतो किंवा मृत व्यक्तीचे डॉक्युमेंट्स वापरून चुकीची गोष्ट करू शकतो.

मग यावर उपाय काय? एखादी व्यक्ती मेल्यावर त्याच्या डॉक्युमेंट्सचं काय करायचं?

हे प्रश्न डोक्यात आले असतील तर, त्याचीच उत्तरं द्यायला येवढं लिहीलंय ओ.

आधार कार्डचं काय केलं जावं?

एखादी व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या डॉक्युमेंट्सचा गैरवापर होऊ नये असं वाटत असेल तर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड आणि डेथ सर्टिफिकेट एकमेकांना लिंक करणं गरजेचं असतं. सरकारी नियमांनुसार हे असं करणं गरजेचं असतं, पण अगदीच कमी लोक ही प्रक्रिया पार पाडतात.

आधार कार्ड बाबतीतली प्रक्रिया इतकीच लहान आणि सोपी आहे.

पॅन कार्डचं काय केलं जावं?

सर्वात आधी तर, एखादी व्यक्ती मेल्यास तिच्या पॅनकार्ड संदर्भात एखादी प्रक्रिया केलीच पाहिजे असा नियम नाही. म्हणजे तसं कम्पलसरी नाहीये. तरीही, मृत व्यक्तीच्या पॅन कार्डचा गैरवापर होऊ नये असं वाटत असेल तर, सरकारी प्रक्रिया ठरलेली आहे.

मृत व्यक्तीचा जो कोणी वारस किंवा उत्तराधिकारी असेल त्याने असेसमेंट ऑफिसरला एक पत्र लिहीणं अपेक्षित असतं. या पत्रात ते सदर व्यक्तीचं पॅन कार्ड सरेंडर करायचं आहे असं लिहावं लागतं. सोबतच पॅन कार्ड सरेंडर का करायचं आहे त्याचं कारणही सांगावं लागतं.

याशिवाय, पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी मृत व्यक्तीचं बँक अकाऊंट ही अतिशय महत्वाची गोष्ट मानली जाते. कसं असतं हे पॅन कार्ड सरेंडर करण्याआधी मृत व्यक्तीची सर्व बँक अकाउंट्स बंद करावी लागतात. शिवाय, इनकम टॅक्स संदर्भातील काही प्रकरणं बाकी असतील तर, ती ही मिटवावी लागतात. त्यानंतरच हे पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया करता येते.

आता ही पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया थोडी टाईम कन्झ्युमिंग, किचकट वाटत असली आणि करणं बंधनकारक नसलं तरी, मृत व्यक्तीच्या माहितीचा गैरवापर होऊ नये म्हणून ही प्रक्रिया करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

त्यामुळे, एखाद्या जिवीत व्यक्तीसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड गरजेचं आहे तसंच मृत व्यक्तीच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डसंदर्भातली ही प्रक्रिया करणंही गरजेचं असतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.